कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठ्यांची राजधानी असलेल्या करवीरनगरीतील नवीन राजवाड्यात पारंपरिक आणि उत्साही वातावरणात ३५२ वा शिवराज्याभिषेकदिन सोहळा दिमाखात साजरा झाला. न्यू पॅलेसमधील मुख्य राजदरबारात सकाळी साडेनऊ वाजता शिवछत्रपतींच्या सुवर्ण मूर्तीवर यशराजराजे यांच्या हस्ते अभिषेक झाला. यानंतर खासदार शाहू महाराज, सौ. याज्ञसेनी महाराणी, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे यांनी शिवछत्रपतींच्या मूर्तीची आरती करून अभिवादन केले. (Shivrajyabhishek Day celebrated with enthusiasm at New Palace)
आझाद नायकवडींचा पोवाडा आणि इंद्रजीत सावंतांचे व्याख्यान
शाहिर विशारद आझाद नाईकवडी व पोवाडा पथकाने स्फूर्तीदायी पोवाड्याचे सादरीकरण केले. ” समतेचा विचार देई शाहूंची नगरी , शिवरायांच्या चरणी देतो मुजरा शाहिरी ! लोककल्याणकारी जाणता राजा, अखिल भारतात गाजावाजा, मराठी मातीचा खरा सर्जा हो जी..जी…” या कवनाने उपस्थितांची मने जिंकली. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा इतिहासाचे विवेचन केले. ते म्हणाले, रायगडावर आठ ते नऊ दिवस सुरु असणाऱ्या सोहळ्यासाठी तब्बल १ करोड ४० हजार होन (सुवर्ण नाणी) खर्च झाला होता. रयतेच्या भाजीच्या देठाला हात न लावणारा, काटकसरीने गडकोट निर्माण करणारा राजाने इतका खर्च करून सार्वभौमत्वाची लढाई जिंकल्याचे त्यांनी सांगितले. शिवछत्रपतींचा लोकल्याणकारी व समानतेचा वारसा करवीर छत्रपतींच्या माध्यमातून आजपर्यंत अखंड जपला असल्याचा अभिमान व्यक्त केला. (Shivrajyabhishek Day celebrated with enthusiasm at New Palace)
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मीन, सहदिवाणी न्यायाधिश शिवलिना शिंदे, पोलिस अधिक्षक निलोत्पल, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु आर.के. कामत, प्र-कुलगुरु डॉ. ज्योती जाधव, उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्ष नेते राजेश लाटकर, कर्नल विजयसिंह गायकवाड, कर्नल अमरसिंह सावंत, कर्नल नलवडे, ले.कर्नल विशाल रायजादा, कॅप्टन सनी कुमार,सुभेदार मेजर संतोष सकुंडे, नाईक सुभेदार रत्नाकर तिराळे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, सरदार घराण्यातील बाळ पाटणकर, नीलराजे पंडित-बावडेकर, ऋतुराज इंगळे, ॲड. राजेंद्र चव्हाण, धैर्यशील यादव आदींसह आजी-माजी नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर व शिवभक्त-इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Shivrajyabhishek Day celebrated with enthusiasm at New Palace)