मुंबई : प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असताना मनसेने शिवसेना शिंदे गटाला टाळी दिल्याने एका नवा ट्विस्ट आला आहे. मनसेने शिवसेनेला साथ दिली असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. तर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. मनसेच्या पाठिंब्याने खासदार संजय राऊत यांनी मात्र टीका केली आहे. (MNS extends support to the Shiv Sena Shinde group)
कडोंमपामध्ये शिवसेनेला ५३ तर भाजप ५० जागांवर विजय मिळवला आहे. ठाकरे गटाचे ११, मनसेच ५ तर शरद पवार गटाला १ जागा मिळाला आहे. काँग्रेसने दोन जागा जिंकल्या आहेत. मंगळवारी कोकण विभागीय आयुक्तांकडे पक्षाच्या गटाच्या नोंदणीसाठी ठाकरेंच्या नगरसेवकांना हजर राहण्यास सांगितले असता तेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ११ पैकी ७ नगरसेवक उपस्थित होते. ठाकरेंचे दोन नगरसेवक शिवसेना शिंदे गटात तर दोन नगरसेवक मनसेत गेल्याची चर्चा आहे. त्यातच आज मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदेची भेट घेतली आणि शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. (MNS extends support to the Shiv Sena Shinde group)
मनसेने दिलेल्या पाठिंब्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येत आहेत. त्यांनी एकत्र निवडणुका लढल्या आहेत. अशावेळेला कुणी एखाद्या चिन्हावर निवडून येऊन बेडूक उड्या मारत असेल तर पक्षाच्या नेतृत्वाने भूमिका घेतली पाहिजे. त्या पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्यावर कारवाई करुन महाराष्ट्राला दाखवायला पाहिजे की, या भूमिकेशी आम्ही सहमत नाहीत, असे राऊतांनी म्हटले. पण, राजू पाटील बोलत असताना त्यांच्या बाजूला त्यांच्या पक्षाचे एक नेते उपस्थित होते. ते मी पाहिले. आता शिंदे गटाचे लोकं म्हणतात, मनसे म्हणजे काय एमआयएम आहे का? पण आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट एमआयएम आहे. मराठी माणसासाठी शिंदे गट एमआयएम आहे. महाराष्ट्रद्रोही आहे. सत्ता मिळाली नाही म्हणून अशा प्रकारे बेईमानी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही. तुमची काही वैयक्तिक कारणे असू शकतात. ते तेवढ्यापुरतेच ठेवायला पाहिजे. काही लोकांच्या मागे तपासयंत्रणा लागल्या असतील. त्यासाठी कुणीही पक्ष वेठीस धरणं आणि महाराष्ट्राच्या गद्दारांशी हातमिळवणी करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे, असेही यावेळी खासदार संजय राऊत यांनी सांगितले. (MNS extends support to the Shiv Sena Shinde group)