लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने पुढील पंचवीस वर्षांसाठी अदानी पॉवरसोबत दरवर्षी १,५०० वॅट वीजपुरवठ्याकरिता करार केला आहे. या विजेची निर्मिती राज्यामध्येच करण्यात येणार असून प्रतियुनिट ५.३८३ रु. या दराने उत्तर प्रदेश सरकार ही वीज खरेदी करेल. (Adani power)
उत्तर प्रदेशचे उर्जामंत्री ए. के. शर्मा यांनी मंगळवारी याविषयी माहिती दिली. “आम्ही १,५०० वॅट वीजखरेदीचा निर्णय घेतला असून त्याकरिता निविदा मागवल्या होत्या. सात कंपन्या या निविदाप्रक्रियेत सहभागी झाल्या असून अदानी पॉवर लिमिटेड या कंपनीची निविदा निवडण्यात आली. या कराराअंतर्गत उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी ८०० मेगावॅट क्षमतेचे दोन औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत,” असे शर्मा यांनी सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आगामी औष्णिक प्रकल्पांमधून वीजखरेदीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. (Adani power)
राज्याची वाढती उर्जागरज पूर्ण करण्यासाठी दीर्घकालीन नियोजनाचा भाग म्हणून हा करार करण्यात आला आहे. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशला २०३३-३४ पर्यंत अतिरिक्त १०,७९५ मेगावॅट उर्जेची गरज भासणार असल्याचा अंदाज आहे. अदानी पॉवरसोबतचा १,५०० मेगावॅट विजेसाठीचा करार ही भविष्यातील गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचेही शर्मा म्हणाले. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये नियोजित औष्णिक प्रकल्पांमधून वीजनिर्मिती करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. यामध्ये अदानीतर्फे प्रतियुनिट ३.७२७ रुपये आणि इंधनशुल्क प्रतियुनिट १.६५६ रुपये असे एकूण ५.३८३ रुपये प्रतियुनिट किमतीची निविदा भरण्यात आली. ही किंमत सर्वांत कमी ठरल्यामुळे अदानी पॉवरची निविदा निवडण्यात आली. (Adani power)
अदानी पॉवर कंपनीतर्फे २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये १०.२.२ अब्ज युनिट इतकी वीजनिर्मिती केली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत अदानीतर्फे करण्यात येणाऱ्या वीजनिर्मितीमध्ये १९.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२४-२५ मध्ये अदानी पॉवरचे एकूण उत्पन्न ५६,४७३ कोटी रुपये इतके होते. २०२३-२४ च्या तुलनेत सुमारे साडेपाच हजार कोटींनी अधिक आहे.
हेही वाचा :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यांच्या आत जाहीर करा
सरन्यायाधीशांकडे ५५ लाखाच्या ठेवी, दोन फ्लॅट