जमीर काझी : मुंबई : अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक, मराठी भाषा भवनाची इमारतीचे काम रेंगाळले असले तरी मात्र भाजपच्या प्रदेश कार्यालयासाठीच्या जागेची फाईल राफेल पेक्षा अधिक वेगाने हलली आहे. हा भूखंड अत्यंत वेगाने कसा मिळवला? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला.
फाईल रातोरात हलवली
भाजपाच्या मरीन लाईन्स येथे बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते झाले.त्यापूर्वी सकाळी राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “सामान्य लोकांच्या फाईली पुढे हलत नाहीत. मात्र सत्ताधाऱ्यांनी या भूखंडाची फाईल रातोरात हलवली. या जमिनीखाली काय रहस्य आहे?, याचा शोध घ्यावा, अशी मागणी आपण अमित शाह यांना पत्र पाठवून केली आहे. (BJP office file)
अमित शाह खूप प्रामाणिक व्यक्ती
खासदार राऊत म्हणाले, देशभरात भाजपाने अशी फाइव्ह स्टार कार्यालये सुरु केली आहेत. दिल्लीतील त्यांचे कार्यालय ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसला लाजविणारे आहे. मुंबईत मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन होऊन सुद्धा अजून मराठी भाषा भवन होऊ शकलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक झाले नाही, मात्र राफेलच्या वेगाने या भूखंडाची फाईल पुढं गेली आहे. या कार्यालयासाठी भूखंड मिळावा, यासाठी किती वेगानं ही फाईल पुढं गेली. पण त्याच कार्यालयातून मराठी माणसांचे प्रश्न सोडवावेत, त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो,” असं संजय राऊत म्हणाले. तसेच “अमित शाह हे खूप प्रामाणिक व्यक्ती आहेत,” असं म्हणत संजय राऊत यांनी शाह यांच्यावर उपरोधिक टीका केली. (BJP office file)
फडणवीसांना खोटे बोलण्याचे व्यसन
महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळं साताऱ्यातील फलटण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी खासदार रणजित निंबाळकर यांना क्लीन चिट दिल्या बाबत खासदार राऊत म्हणाले, “फडणवीस यांना खोटे बोलण्याचं व्यसन जडले आहे. या प्रकरणावरुन जनतेमध्ये रोष आहे. तुम्हाला राजकारण महत्वाचं वाटतं म्हणून तुम्ही तिथं गेला. या राज्यात कायद्याची भीती राहिली नाही म्हणून त्या डॉक्टर मुलीला आत्महत्या करावी लागली. तुम्हाला विरोधकांचे फोन टॅप करायला वेळ आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. पण याचे गृहखात्याकडे लक्ष नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसंच पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट जागेच्या गैरव्यवहारावरून बिल्डर विशाल गोखले यांनी व्यवहार रद्द केला आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, “जनतेच्या दबामुळं आणि जनतेचं आंदोलन काय करु शकते, हे दाखवून दिलं आहे.” (BJP office file)