मुंबई : विधिमंडळ अधिवेशन काळात विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना बोलू न देताच अध्यक्षांनी सभागृह तहकूब केले. (Bhaskar Jadhav attacks)
संताप अनावर झालेल्या जाधव यांनी सभागृहाबाहेर येऊन उपमुख्यमंत्री शिंदे आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली.
शिंदे बोलत असताना आम्ही शांत होतो. एकही शब्द बोललो नाही. शिंदेंचे भाषण २९३ च्या प्रस्तावाचे नव्हतं. परभणी, ठाणे, शिक्षण, बांधकाम, पाणी योजना आदी विषयांवर शिंदे बोलले नाहीत. ते निव्वळ खोटे बोलतात. सभागृहातही ते खोटे बोलले. आम्हाला उत्तर देण्याचा अधिकार आहे, पण मला अध्यक्षांनी संधी दिली नाही. अध्यक्ष स्वत:ला सरकार समजतात. आम्ही सरकारला प्रश्न विचारतो. हे अध्यक्ष केवळ केवळ सरकार म्हणून वावरतात.”(Bhaskar Jadhav attacks)
तुमचे कर्तृत्व काय?, तुम्ही फक्त बॅगा घेऊन गेला
“उद्धव ठाकरे हे फक्त दोन वर्षे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे यांनी काम केले नाहीतर तुम्ही काय करत होता? नवी मुंबई विमानतळाबद्दल एकनाथ शिंदे यांचे कर्तृत्व काय आहे? मी नगरविकास राज्यमंत्री असताना तेथील नागरिकांना समजवून सांगितले. तुम्ही काय केले? तुम्ही फक्त बॅगा घेऊन सूरत- गुवाहाटीला गेला,” असा हल्लाबोल जाधव यांनी शिंदेंवर केला.(Bhaskar Jadhav attacks)
शिंदेंना लाज वाटली पाहिजे
कोरोना काळात खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप एकनाथ शिंदे नेहमीच करतात, पण त्याचं कंत्राट ज्याच्या नावावर होते तो संजय माशेलकर शिंदे यांच्या पक्षात आहे. तो शिंदे शिवसेनेचा पदाधिकारी आहे. त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही. अटल सेतू काय शिंदेंच्या काळात झाला का? १९६३ पासून अटल सेतूचा इतिहास आहे. काय तुमची लायकी आहे? तुमचं कर्तृत्व काय आहे? वरळी सी लिंक बांधल्याचे सांगतात, हे काय तुम्ही बांधला का? मेट्रो तुम्ही आणली म्हणून सांगता. पण, मी राज्यमंत्री असताना मेट्रोसाठी पहिली सही केली होती. तुम्ही तेव्हा कुठे होता? उठसूठ उद्धव ठाकरेंवर आरोप केले जातात. अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत,” असा संताप भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर व्यक्त केला.
अध्यक्ष दुतोंडी
“आपण सरकारला कसे वाचवतोय, हे दाखवून अध्यक्ष धन्यता मिळवतात. महाराष्ट्राच्या विधिमंडळाची परंपरा अध्यक्षांनी धुळीस मिळवली आहे,” असा हल्लाबोल आ. जाधव यांनी केला. “२०१४ पासून एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात आहेत. अध्यक्ष शिंदेंना पाठिशी घालतात. अध्यक्षांनाही अदानींना वाचवायचं आहे. भेटल्यावर वेगळे बोलतात आणि नंतर वेगळे बोलतात, अध्यक्ष दुतोंडी आहेत,” अशी टीका भास्कर जाधव यांनी नार्वेकरांवर केली आहे.