नवी दिल्ली : प्रतिनिधी : दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वरील ‘कॉकरोच जनता पार्टी‘ च्या अधिकृत खात्यावरील बंदी तातडीने उठवण्याचे आदेश दिले. हे खाते पुन्हा सुरू करण्यास सरकारची कोणतीही हरकत नाही, असे केंद्र सरकारने न्यायालयात स्पष्ट केल्यानंतर हा आदेश देण्यात आला.
न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीस आले होते. नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर हे सोशल मीडिया खाते तात्पुरते ब्लॉक करण्यात आले होते, असे केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने आदेश दिला. (The ban on CJP’s ‘X’ account was lifted)
म्हणे नीटच्या पार्श्वभूमीवर बंदी
मेहता यांनी न्यायालयात सांगितले की, “नीट परीक्षा होणार असताना लाखो विद्यार्थी त्यात सहभागी होत होते. सोशल मीडियावरील काही पोस्ट विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संभ्रम किंवा गोंधळ निर्माण करू शकत होत्या. आता परीक्षा पूर्ण झाली असल्याने सरकारला हे खाते पुन्हा सुरू करण्यास कोणतीही हरकत नाही.” (The ban on CJP’s ‘X’ account was lifted)
कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजित दिपके यांनी वकील नकुल गांधी यांच्या माध्यमातून दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या ब्लॉकिंग आदेशाला आव्हान दिले होते. सुरुवातीला गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीसह राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत, माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० मधील कलम ६९(अ) अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे खाते बंद करण्याचा आदेश दिला होता.
यापूर्वी २९ मे रोजी झालेल्या सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला होता. या प्रकरणाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, त्यामुळे सरकारची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही अंतरिम आदेश देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. (The ban on CJP’s ‘X’ account was lifted)