Home » Blog » ‘मविआ’ला रोखण्यासाठी महायुतीची व्यूहरचना

‘मविआ’ला रोखण्यासाठी महायुतीची व्यूहरचना

Assembly Election : मनसे, वंचितच्या माध्यमातून कोंडीचे प्रयत्न

by प्रतिनिधी
0 comments
Maharashtra Government file photo

मुंबई; प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतील पिछाडी भरून काढण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून विविध लोकप्रिय निर्णयांबरोबरच महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठी विशेष व्यूहरचना आखली आहे. तिसरी आघाडी, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीची कोंडी करण्यामध्ये महायुतीला यश येत असल्याचे चित्र दिसत आहे. (Assembly Election)

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवताना ४८ पैकी ३० जागा जिंकल्या आणि महायुतीला अवघ्या १७ जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडी आणि महायुतीने जिंकलेल्या जागांमध्ये मोठी तफावत असली तरी मतांच्या टक्केवारीमध्ये अवघा दीड टक्क्यांचा फरक होता. हा फरक भरून काढून विधानसभेला परिस्थिती सुधारण्यासाठी महायुतीने निर्णयांचा धडाका लावला. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या माध्यमातून महिला मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न केला. या योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महायुतीच्या गोटात खुशीचे वातावरण आहे. तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे झंझावाती दौरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांचा आक्रमक प्रचार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे महाविकास आघाडीची हवा टिकून आहे. निवडणूक अटीतटीची होणार असल्यामुळे महाविकास आघाडीला नुकसान पोहोचवणा-या घटकांकडे महायुतीच्या नेत्यांनी विशेष लक्ष पुरवल्याचे सांगण्यात येते. (Assembly Election)

तिसरी आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा महाविकास आघाडीला फटका आणि पर्यायाने महायुतीला फायदा होणार असल्याचे मानले जाते. त्यामुळे या तिन्ही पक्षांना प्रोत्साहनाची भूमिका महायुतीकडून घेतली जात असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहिरातींच्या माध्यमातून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर करण्यामध्ये बाजी मारली असून पहिली अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुस्लिमबहुल मतदार संघांमध्ये अकरा मुस्लिम उमेदवार वंचितने दिले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या यशात मुस्लिम मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरली होती, त्यामुळे वंचितच्या पहिल्या यादीचा फटका कुणाला बसू शकतो, हे स्पष्ट आहे. याशिवाय तिस-या आघाडीमध्ये जे नेते आहेत, त्यातील बहुतेकांची पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाशी जवळीक आहे. त्यामुळे त्यांच्यामार्फतही महाविकास आघाडीला अडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. एकीकडे महायुतीकडून जोरदार फिल्डिंग लावली जात असताना महाविकास आघाडीचे नेते जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी आघाडीअंतर्गत संघर्षातच व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00