Home » Blog » जागावाटपात काँग्रेसचा ‘हाथ’ खाली

जागावाटपात काँग्रेसचा ‘हाथ’ खाली

Congress : हरियाणातीसल पराभवाने काँग्रेसची ‘बार्गेनिंग पावर’ कमी; मित्रपक्ष शिरजोर

by प्रतिनिधी
0 comments
Congress file photo

नवी दिल्ली : ‘इंडिया’आघाडीचा भाग असलेल्या मित्रपक्षांनी काँग्रेसची जागावाटपात कोंडी करून कमी जागा घ्यायला भाग पाडले आहे. काँग्रेसला ‘विषाचा घोट पिऊन’ उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि झारखंडमधील जागांसाठी तडजोड करावी लागली आहे. कधी नव्हे, एवढी काँग्रेस लाचार झाली आहे. (Congress)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडी अर्थात महाविकास आघाडीच्या दोन दिवसांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यातील जागावाटप आधीच निश्चित झाले आहे. महाराष्ट्रापासून उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये जागावाटपाचा सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. उत्तर प्रदेशातील पाच जागांवर पोटनिवडणूक लढवण्याची आशा बाळगून असलेली काँग्रेस रिकाम्या हाताने परतली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने समसमान जागांवर निवडणूक लढविण्याचे मान्य केले आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात शंभर जागाही पदरात पाडून घेता आल्या नाहीत. झारखंडमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा कमी जागांवर लढावे लागत आहे. झारखंड आणि महाराष्ट्रात काँग्रेसने कधीच इतक्या कमी जागांवर निवडणूक लढवली नाही. आघाडीच्या राजकीय मजबुरीमुळे काँग्रेस आज कोणत्या स्थितीत उभी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Congress)

उत्तर प्रदेशात विधानसभेच्या दहा जागा रिक्त असून त्यापैकी नऊ जागांवर पोटनिवडणूक होत आहे. ‘इंडिया’ आघाडी अंतर्गत काँग्रेसने भाजप, आरएलडी आणि निषाद पक्षाच्या ताब्यात असलेल्या पाच जागांवर पोटनिवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. समाजवादी पक्ष काँग्रेसला गाझियाबाद आणि खैर या दोनच जागा देत होती. काँग्रेस या दोन्ही जागा आपल्यासाठी सोयीस्कर मानत नाही, कारण खैराची जागा ४४ वर्षांपासून जिंकलेली नाही आणि गाझियाबादची जागा २२ वर्षांपासून जिंकलेली नाही. समाजवादी पक्षाच्या दृष्टिकोनातूनही या दोन जागा कधीच चांगल्या ठरल्या नाहीत. अशा परिस्थितीत काँग्रेसने खैर आणि गाझियाबाद या जागांवर निवडणूक लढवण्यापासून आपली पावले मागे घेतली आणि समाजवादी पक्ष सर्व नऊ जागांवर पोटनिवडणूक लढवणार आहे.

समाजवादी पक्ष प्रमुख अखिलेश यादव यांनी ‘एक्स’वर लिहिले, की ‘इंडिया’ आघाडीचे संयुक्त उमेदवार सर्व ९ जागांवर ‘सायकल’वर निवडणूक लढवतील. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष खांद्याला खांदा लावून एकत्र उभे आहेत. या पोटनिवडणुकीत ‘इंडिया’ आघाडी विजयाचा नवा अध्याय लिहिणार आहे. काँग्रेस आघाडीच्या नेतृत्वापासून बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांपर्यंत एकत्र आल्याने समाजवादी पक्षाची ताकद अनेक पटींनी वाढली आहे. अशा प्रकारे पोटनिवडणुकीत काँग्रेस एकही जागा लढवणार नाही.

महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील एकूण २८८ जागांपैकी २५५ जागांवर महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा करार झाला आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भारतीय आघाडीचा भाग असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ८५-८५ जागांवर निवडणूक लढवण्याचा फॉर्म्युला ठरला आहे. मात्र, १५ जागांवर कोणताही निर्णय झालेला नाही. १८ जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी उत्साही झालेल्या काँग्रेसला महाविकास आघाडीत मोठ्या भावाची भूमिका बजावायची होती. परंतु, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राजकीय खेळीमुळे सर्व आशा धुळीला मिळाल्या. काँग्रेसने १०५ ते ११० जागांवर निवडणूक लढवण्याचे ठरवले असले. तरी, त्यांना शंभर जागांचा आकडाही पार करता आला नाही. २००९ मध्ये काँग्रेसने १७० जागांवर निवडणूक लढवली होती आणि २०१४ मध्ये २८७ जागांवर नशीब आजमावले होते. २०१९ मध्ये काँग्रेसने १४७ जागांवर निवडणूक लढवली होती. अशाप्रकारे काँग्रेस आपल्या राजकीय इतिहासातील सर्वात कमी जागांसह या वेळी महाराष्ट्राच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहे. (Congress)

झारखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला गेल्या वेळेपेक्षा कमी जागा लढवाव्या लागल्या आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसने विधानसभेच्या ३१ जागांवर निवडणूक लढवली होती; मात्र या वेळी काँग्रेसला ३० जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस गेल्या निवडणुकीपेक्षा एक जागा कमी लढवत आहे. झारखंडमध्ये जेएमएम मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे, तर काँग्रेस लहान भावाच्या भूमिकेत आहे. झारखंडमधील विधानसभेच्या एकूण ८१ जागांपैकी जेएमएम ४१ जागांवर, काँग्रेस ३० जागांवर, राष्ट्रीय जनता दल ६ जागांवर आणि ४ जागांवर भाकप लढणार आहे. झारखंडमध्ये काँग्रेसने इतक्या कमी जागांवर कधीही निवडणूक लढवली नाही.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00