Home » Blog » केशवराव भोसले नाट्यगृहाला निधी मिळवण्यासाठी प्रशासनाची कसोटी

केशवराव भोसले नाट्यगृहाला निधी मिळवण्यासाठी प्रशासनाची कसोटी

Keshavrao Bhosale Theatre : केशवराव भोसले नाट्यगृहाला निधी मिळवण्यासाठी प्रशासनाची कसोटी

by प्रतिनिधी
0 comments
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह

सतीश घाटगे; कोल्हापूर : कोल्हापूरचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या (Keshavrao Bhosale Theatre) पुनर्उभारणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ कोटींचा निधी जाहीर केला. पण तो निधी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महापालिकेच्या खात्यावर वर्ग करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाची कसोटी लागणार आहे. नाट्यगृह उभारणीचे काम वेगाने सुरू व्हावे, यासाठी कलाकार आणि जनतेचा रेटा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तांत्रिक बाबी पूर्ण करुन राज्य सरकारकडून निधी मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

आठ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री नाट्यगृहाला भीषण आग लागली. त्यात नाट्यगृह भस्मसात झाले. समस्त करवीरकर दु:खाच्या सागरात बुडून गेले. त्यानंतर नाट्यगृह उभारण्यासाठी दुसऱ्याच दिवशी लोकप्रतिनिधी, कलाकार, तंत्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी वज्रमूठ बांधली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोल्हापूरला तातडीने भेट दिली. नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीसाठी २५ कोटी निधी देण्याची घोषणा केली. खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, जयंत आसगांवकर यांनी प्रत्येकी १ कोटी निधी देण्याची घोषणा केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एक कोटीचा निधी जाहीर केला. कोल्हापूरची अस्मिता असलेले केशवराव भोसले नाट्यगृह उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आश्वस्त केले.

राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींकडून निधीची घोषणा झाली. मात्र महापालिका प्रशासनाकडून टेंडर नोटीस काढण्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यासाठी महापालिकेची दमछाक होत आहे. दुसरीकडे नाट्यगृहाला (Keshavrao Bhosale Theatre) लागलेल्या आगीबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणे, स्ट्रक्चरल ऑडिट, शॉर्ट टेंडर नोटीस काढणे आदी बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यासाठी विलंब होत असल्याने कलाकार आणि सामान्य जनतेकडूनही रेटा वाढत आहे. स्ट्रक्चरल ऑडिटचा प्राथमिक अहवाल आला आहे. मात्र नाट्यगृहातील मलबा हटवल्याशिवाय ऑडिट करता येणे शक्य नाही, असे स्ट्रक्चरल करणाऱ्या कंपनीने स्पष्ट केले आहे. मलबा हटवल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट पुन्हा नव्याने करण्यात येणार असून त्यानंतर अंतिम अहवाल येणार आहे.  सध्या मलबा हटवण्याचे काम सुरू झाले आहे.

दरम्यान, नाट्यगृह (Keshavrao Bhosale Theatre) उभारण्यासाठी आठ कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. या कंपन्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, आर्किटेक्ट, रंगकर्मींचे प्रतिनिधी यांच्यासमोर प्रेझेंटेशन केले आहे. त्यानंतर नाटगृह उभारणीसाठी एखाद्या कंपनीची निवड करावी लागणार आहे. त्यानंतर शॉर्ट टेंडर काढले जाणार आहे.
या तांत्रिक बाबी युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. पण विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दहा ते पंधरा दिवसांत लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यापूर्वी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करुन शॉर्ट टेंडर नोटीस प्रसिद्ध करावी लागेल. सांस्कृतिक विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. मंजुरीनंतर मंत्रिमंडळात निर्णय होऊन निधी महापालिकेच्या खात्यावर वर्ग होणार आहे. हा निधी लवकर वर्ग व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न होत आहेत. दुसरीकडे घाईगडबडीने प्रक्रिया झाली तर पारदर्शीपणे काम होणार नाही, अशी भीती तज्ज्ञांकडून होत आहे. कलावंत आणि कलारसिकही नाट्यगृह उभारणीचे काम लवकर सुरू करावे यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत. अशा कात्रीत सध्या महापालिका आणि जिल्हा प्रशासन आहे.

 

 

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00