Home » Blog » राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शेतकरी रोखणार पुणे बेंगळुरू हायवे

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शेतकरी रोखणार पुणे बेंगळुरू हायवे

by प्रतिनिधी
0 comments
Farmers to block the Pune-Bengaluru highway on Tuesday

कोल्हापूर :  प्रतिनिधी :   ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे आणि ऊस दराकडे साखर कारखानदार व सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.  मंगळवारी ३ रोजी सकाळी ११ वाजता पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाका येथे लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ‘आरपारची लढाईसाठी’ रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी त्यांनी शिरोळ आणि हातकंणगले तालुक्यातील अनेक गावांत दौरे सुरू केले आहेत. (Farmers to block the Pune-Bengaluru highway on Tuesday)

राजू शेट्टी यांनी गेले दोन दिवस शिरोळ व हातकंणगले तालुक्यातील दत्तवाड, अब्दुललाट, आकिवाट, शिरटी, बुबनाळ, नांदणी, उदगांव, कोथळी, दानोळी, नरंदे, आळते आणि रुई या गावांमध्ये गावभेटी व कोपरा सभा घेतल्या. या सर्वच ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अभूतपूर्व गर्दी करत आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला.

ऊसाला वाढीव दर देण्यास कारखानदारांचा नकार का?

बैठकांमध्ये बोलताना राजू शेट्टी यांनी सरकार आणि साखर कारखानदारांच्या धोरणांवर कडाडून प्रहार केला. “सध्या खुल्या बाजारात साखरेचे दर वाढले आहेत, तसेच उपपदार्थ असणाऱ्या बगॅस आणि मोलॅसिसचे दर तर गगनाला जावून भिडले आहेत. साखर कारखान्यांना सर्व बाजूंनी मोठा नफा होत असताना, शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव दर देण्यास कारखानदार का नकार देत आहेत?”, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. साखर कारखानदार आणि सरकारने संगनमत करून शेतकऱ्याला कोंडीत पकडल्याचा आरोपही त्यांनी केला. (Farmers to block the Pune-Bengaluru highway on Tuesday)

शांत बसलो तर पिळवणूक सुरुच राहणार

शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “आज राज्यातील बळीराजा एका बाजूला भीषण महागाई आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळ सदृश परिस्थितीने होरपळून निघाला आहे. शेतीचा उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत आपण आपल्या हक्काच्या घामाचा आणि उसाच्या वाजवी दराचा जाब कारखानदारांना विचारलाच पाहिजे. जर आता आपण शांत बसलो, तर आपली पिळवणूक अशीच सुरू राहील.”

तीन नोव्हेंबर रोजी होणारे हे आंदोलन केवळ एक दिवसाचे नसून बेमुदत असल्याने ती शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची ‘आरपारची लढाई’ असेल, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. शिरोळ आणि हातकंणगले तालुक्यातील प्रत्येक घरातील शेतकऱ्याने मंगळवारी सकाळी ११ वाजता किणी टोल नाक्यावर पूर्ण ताकदीनिशी आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. (Farmers to block the Pune-Bengaluru highway on Tuesday)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!