कोल्हापूर : प्रतिनिधी : नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असून उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज मंगळवारी करवीर निवासिनी अंबाबाईची भीमादेवी रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली . असुरांना खाणाऱ्या रुपातील भीमादेवीची पूजेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. (Worship of Goddess Ambabai in the form of Bhimadevi)
अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त रोज देवीच्या विविध रुपातील पूजा बांधण्यात येतात. आज तिसऱ्या माळेला अंबाबाईची दुर्गा सप्तशतीच्या अकराव्या अध्यायात जगदंबेने सांगितलेल्या आपल्या भीमादेवी नावाच्या रूपात पूजा बांधण्यात आली आहे. या रुपाबाबत अभ्यासकांनी अशी माहिती दिली की, भक्तांच्या रक्षणासाठी मारणारी देवी तर अनेक रूपात आपण पाहतो पण ऋषीमुनींच्या रक्षणासाठी चक्क असुरांना खाऊनच टाकणारी जगदंबा म्हणजे भीमादेवी म्हणून ओळखले जाते. भीम याचा अर्थ उग्ररूप. देवीने हा अवतार हिमाचल क्षेत्रामध्ये धारण केला. ज्या वेळेला दैत्यांनी ऋषीमुनींना त्रास द्यायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन जगदंबा उग्ररूपात प्रगट झाली. हातामध्ये चंद्रहास नावाचे खड्ग, डमरू, पानपात्र आणि असुराचे मस्तक धारण करणारी ही देवी नीलवर्णा अशी आहे. तिच्या सुळे दाढा बाहेर आलेल्या असून तिच्या मोठ्या डोळ्यांची शत्रूंना भीती वाटते. अशीही भीमादेवी कालरात्री एकवीरा अशा नावांनी प्रसिद्ध असून भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून तिची प्रसिद्धी आहे. (Worship of Goddess Ambabai in the form of Bhimadevi)