जमीर काझी : मुंबई : मिरा-भाईंदरमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्गमित्र असगरअली वोरा यांच्या जमीन वादाला आता नवे वळण मिळाले आहे. भाजपाचे आमदार व सेवन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागधारक असलेल्या नरेंद्र मेहता यांनी आता त्यातून काढता पाय घेतला आहे. महापालिकेला या जागेवरील बांधकाम करण्याची परवानगी सरेंडर करण्यात आल्याचे कळविले आहे
कंपनीचे संचालक प्रशांत केळुस्कर यांनी कंपनीची भूमिका स्पष्ट केली असून आमदार नरेंद्र मेहता यांचा या जमिनीशी कुठलाही संबंध नाही, तसेच असगरअली वोरा यांच्याकडून आम्ही ही जमीन खरेदी केलेली नाही,” असा दावा केला आहे. ( Narendra Mehta withdraws from land deal)
गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्गमित्र असल्याचा दावा करणारे असगर अली वोरा या ८१ वर्षीय व्यक्तीने पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन आपल्या जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप केला होता. मात्र ही जमीन मरविन जोजफ फर्नाडीस आणि मुकेश पारेख यांच्याकडून खरेदी केली आहे. नरेंद्र मेहता आणि सेवन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यातही या जमीन व्यवहारासंदर्भात कोणताही संबंध नाही. या जमिनीशी संबंधित सेवन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीनं केलेले सर्व व्यवहार आता रद्द करण्यात आले आहेत, असं कंपनीनं आपल्या अधिकृत खुलाशात म्हटले आहे. संबंधित बांधकाम परवानगी सरेंडर करण्यासाठी कंपनीने १५ सप्टेंबरला मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडे पत्र दिल्याचेही स्पष्ट केले आहे. या प्रकरणासंदर्भात असगरअली वोरा यांच्यासोबत बैठक घेण्यात आली असून, संपूर्ण वाद मिटवण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. ( Narendra Mehta withdraws from land deal)
मात्र, या प्रकरणात असगरअली वोरा यांनी यापूर्वी जमीन बळकावल्याचा आणि कागदपत्रांबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सेवन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीचा हा अधिकृत खुलासा आणि असगरअली वोरा यांचे आरोप, यामधील नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे संबंधित कागदपत्रं आणि न्यायालयीन प्रक्रियेतून स्पष्ट होणार आहे. ( Narendra Mehta withdraws from land deal)