मुंबई : प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात तुमच्या आमदारांची बैठक घेऊन गद्दारांना प्रतिष्ठा का देता? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना केला आहे. काल बुधवारी शरद पवार महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नांवर चर्चेसाठी विधानभवनात आले होते. त्यानंतर पवारांनी आपल्या आमदारांची बैठक उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात घेतली. त्यावर राऊत यांनी पवारांवर टीका केली. या टीकेवरुन महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमधील मतभेद उघड्यावर आले आहेत. (Sanjay Raut questions Pawar)
शिंदेंच्या दालनातील बैठक शिवसेनेला दुखावणारी
खासदार राऊत म्हणाले, शरद पवारांनी शिंदे यांच्या दालनात बैठक घेणे हे गद्दारांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासारखे आहे. तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा का देत आहात. आम्ही तुमच्या पक्षांशी ज्यांनी गददारी केली आहे, त्यांच्या दालनात जाऊन बैठका घेणार नाही. ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं त्याच्यांच दालनात जाऊन बैठक घेणे या मोठ्या नेत्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होते. एकनाथ शिंदे हे यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण विलासराव देशमुख, मनोहर जोशी आहेत का असा सवालही केला. शिंदेंच्या दालनात राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतात ही बाब शिवसेनेला दुखावणारी आहे असेही राऊत म्हणाले. (Sanjay Raut questions Pawar).
बंडाळीबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार उरणार नाही
शिंदे यांच्या दालनात जाऊन बैठक घेण्याची अजिबात गरज नव्हती. यासाठी संपूर्ण विधान भवन किंवा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान उपलब्ध असताना, ज्यांनी सरकार पाडले त्यांच्या छताखाली जाणे म्हणजे त्यांना राजकीय प्रतिष्ठा बहाल करण्यासारखे आहे असेही राऊत म्हणाले. जर राज्यातील ज्येष्ठ नेतेच अशा बंडखोरांना आणि गद्दारांना अशी प्रतिष्ठा देणार असतील तर भविष्यात स्वत:च्या पक्षात झालेल्या बंडाळीबददल किंवा बेईमानीबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार उरणार नाही असा इशाराही राऊतांनी दिला.
शरद पवार एनडीए मध्ये जाणार नाहीत
शरद पवार एनडीए मध्ये जाणार नाहीत हे खात्रीने सांगतो असेही राऊत यांनी स्पष्ट केले. पवारांच्या विचारधारेवर मी शंका घेणार नाही. मात्र शिंदेंच्या दालनात राष्ट्रवादीच्या बैठकीच्या कृतीमुळे शिवसेना अस्वस्थ आहे असल्याचे राऊत म्हणाले, त्याचवेळी माझं त्यांच्यावर आणि पवारांचे माझ्यावर प्रेम आहे असेही संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut questions Pawar)