Home » Blog » विलासराव देशमुखांबद्दल वक्तव्य; रवींद्र चव्हाणांचा पत्रकार परिषदेतून काढता पाय    

विलासराव देशमुखांबद्दल वक्तव्य; रवींद्र चव्हाणांचा पत्रकार परिषदेतून काढता पाय    

by प्रतिनिधी
0 comments
Ravindra Chavan's statement about Vilasrao Deshmukh

छत्रपती संभाजीनगर : दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याने त्यांच्यावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी टीकेचा भडीमार केला. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी देशमुख यांच्यासंबधी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली पण लातूरच्या जनतेची माफी मागणार का या प्रश्नांवर उत्तर न देता पत्रकार परिषद अर्धवट सोडून गेले. चव्हाण यांच्या वक्तव्याचा फटका मराठवाड्यात बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रचाराला आले होते. यावेळी त्यांनी भाषणात लातूर शहरामधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही असे वक्तव्य केले. या वक्तव्याबद्दल चव्हाण यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे. आमदार अमित देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेते रितेश देशमुख यांनी एक्सवर पोस्ट करत लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावे मनात कोरलेली असतात. लिहिलेले पुसता येते, कोरलेले नाही अशा शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही टीका केली आहे.

दरम्यान आज संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. विलासरावांवर कोणतीही टीका टिप्पणी केलेली नाही. विलासराव फार मोठे नेते होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. माझ्या त्या वक्तव्याकडे राजकीय दृष्ट्या पाहू नका. त्यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या चिरंजीवांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. लातूरकरांची माफी मागणार का, असे विचारले असता, रवींद्र चव्हाणांनी हा प्रश्न टाळत पुढील प्रश्न.. असे म्हटले. त्यानंतर पत्रकारांनी पुन्हा एकदा विलासराव देशमुखांबद्दल तुम्ही केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागणार का, असे विचारले असता रवींद्र चव्हाण यांनी नमस्कार करत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00