मुंबई : प्रतिनिधी : भ्रष्टाचारावर बोट ठेवणाऱ्या जनतेला ‘भाडे के टट्टू’, ‘डॉग‘,“कुत्रे’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बुधवारी विधानसभेत मिसिंग लिंकवर दरड कोसळून झालेल्या घटनेवर विरोधकांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना विरोधकांना इशारा दिला होता. त्यावर आज खासदार राऊत यांनी फडणवीसांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. (CM should apologize to the public)
हे फक्त सुलतानाच्या राज्यातच होते…
खासदार राऊत म्हणाले, जनतेच्या कराच्या पैशातून उभारलेल्या प्रकल्पांना भगदाड पडत आहेत. त्यामुळे जनता समाजमाध्यमांवर, वृत्तपत्रात, टीव्हीवर व्यक्त झाली तर तिला भाडे के टट्टू कुत्रा म्हणून चेष्टा करायची. हे फक्त सुलतानाच्या राज्यात होते. आणि सुलतानाच्या आजूबाजूला बसलेले निजाम फिदफिदी हसत टाळ्या आणि बाकं वाजवत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील ही सुलतानशाही असून जनतेला भाडे के टट्टू आणि कुत्रा म्हणल्याबद्दल फडणवीसांनी माफी मागावी अशी मागणी केली. (CM should apologize to the public)
महाराष्ट्राची सर्वात जास्त बदनामी मोदी शहांनी केली
जनतेच्या कराच्या पैशातून मूळ किंमतीपेक्षा जास्त किंमतीने प्रकल्प करुन जेव्हा कोसळून पडतात त्यावर जनता व्यक्त होणारच असे संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला असला तरी महाराष्ट्राला सर्वात जास्त बदनाम मोदी शहांनी केले आहे, असा आरोप केला. महाराष्ट्रातील आमदार, खासदार ५० कोटींमध्ये विकत घेतले तेव्हा महाराष्ट्राची बदनामी झाली नाही का? असा सवाल राऊत उपस्थित केला. भ्रष्टाचारामुळे मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा फुलेपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जी वक्तव्ये केली त्यावेळी महाराष्ट्राची बदनामी होत नाही का? असा सवालही त्यांनी केला.
ही आणीबाणी उधळून लावली जाईल
विधानसभेत संविधानाच्या विरोधात जाऊन विधानसभा अध्यक्ष निकाल देतात तेव्हा राज्याची बदनामी होत नाही. पण महायुती सरकारच्या भ्रष्टाचारावर जनतेने बोट ठेवल्यावर ती जनता भाडे के टट्टू ठरते. ही आणीबाणी उधळून लावली जाईल. नेपोलियन, अलेक्झांडर, सिकंदर सुद्धा आले आणि गेले. स्वत:ला जगज्जेता म्हणणाऱ्या कुणीही या भूमीवर टिकला नाही असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. (CM should apologize to the public)