जमीर काझी : मुंबई : अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या, संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मी एक्सपोज करतो म्हणून भाजपाला माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही, भाजपाचा पर्दाफाश करतच राहणार, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी दिला .
टिपू सुलतान बाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपाकडून गेल्या दोन दिवसापासून राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाचा नौटंकी असल्याचे सांगून ते म्हणाले की, ‘भाजपा आमदार व नेत्यांनी माझी जीभ कापून आणणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे, माझी जीभ कापल्यानंतर जर भारतीय शेतकर्यांचे अमेरिकेतून होणार्या आयातीपासून संरक्षण होणार असेल, ही अन्यायकारक ट्रेड-डील रद्द होऊन शेतमालाला भाव मिळणार असतील, शेतकरी कर्जमुक्त होणार असेल, भाजप हिंदू-मुस्लिम द्वेषाला खतपाणी घालणार नसेल, चीनने बळकावलेला भूभाग परत मिळणार असेल तर माझी जीभ नक्की कापा. (Harshvardhan Sapkal’s warning to BJP)
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोललो नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची किर्ती महान आहे, चंद्र जसा वाढत जातो तशीच महाराजांची किर्ती आणखी वाढत जावी, याबाबत दुमत नाही. परंतु भारतीय जनता पक्षाने माझ्या विधानाचा “ध” चा “मा” करून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न केला, दंगली घडवण्याचा प्रयत्न केला, यामागचे कारस्थान समजून घेतले पाहिजे. एपस्टिन फाईल्समध्ये बरंच काही दडलेलं आहे, त्यावरून जनतेचे लक्ष विचलित करणे हा एक भाग आहे. तर अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारामुळे भारतातील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्थ होणार आहे, महाराष्ट्रातही अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. या सर्व मुद्द्यावर भाजपा सरकारकडे उत्तर नाही म्हणून या प्रश्नांवर भाजपाला पडदा टाकायचा आहे, यासाठी हा सर्व खटाटोप सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले. (Harshvardhan Sapkal’s warning to BJP)