कोल्हापूर : प्रतिनिधी : कोणत्याही शहराचा विकास आणि वस्तार हा हद्दवाढीमुळे झाली आहे. कोल्हापूरचा विकास आणि विस्तारासाठी हद्दवाढ केलीच पाहिजे. स्थानिक नेत्यांनी एकत्रितपणे हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करावा. माझ्याकडे हद्दवाढीचा प्रस्ताव आल्यानंतर १५ मिनिटात सही केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे शहर हद्दवाढीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मुंबई बेंगळुरू औद्योगिक कॅरिडॉरमुळे कोल्हापुरला औद्योगिक इको सिस्टीम तयार होईल असेही मत व्यक्त केले. (Will sign the expansion proposal)
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी हॉटेल पॅव्हेलियन येथे मिसळ कट्टा या संकल्पनेतंर्गत जनसंवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. निमंत्रितासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शहर विकासाची कल्पना मांडली. बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी, अभिनेते स्वप्निल राजशेखर, कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. (Will sign the expansion proposal)
या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर खासदार धनंजय महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी आमदार प्रकाश आवाडे, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, जिल्हा समन्वयक सत्यजीत कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अदिल फरास यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी शहरातील रस्ते, हद्दवाढ, पंचगंगा प्रदूषण, महापूर, उद्योग, विमानतळ, खेळ आणि सांस्कृतिक परंपरा याबाबत आपली मते व्यक्त केली. (Will sign the expansion proposal)
शहरवासियांच्यावर पडणारा टोलचा बोजा पडू नये यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र निधी देऊन कोल्हापूर शहराला टोल मुक्त केल्याची आठवण सांगत मुख्ममंत्री फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी हद्दवाढ आवश्यक आहे अशी भूमिका मांडली. अनेक राजकीय नेत्यांनी हद्दवाढीस प्रखर विरोध केल्याने हद्दवाढ करता आली नाही. हद्दवाढीतील प्रस्तावित गावांना करवाढीची भिती वाटते. पण आता राज्य सरकारने निर्णय घेतला असून हद्दवाढीत समाविष्ठ झाल्यानंतर पाच वर्षे कोणतीही करवाढ होणार नाही असे सांगितले. (Will sign the expansion proposal)
पंचगंगा पदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर, इचलकरंजीसह ग्रामीण भागातील सांडपाणी नाल्याद्वारे नदीत मिळणारी पाणी रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे केले जाणार असल्याचे मुख्यमत्र्यांनी सांगितले. कोल्हापूर शहर आणि परिसराला होणारा महापुराचा विळखा सोडण्यासाठी नदीजोड प्रकल्पावर भर देण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून पावसाळ्यात वाया जाणारे पाणी मराठवाडा भागात वळवण्याचे प्रयत्न हाती घेतले आहेत, असेही त्यांनी सांगितले.