Home » Blog » Artist Chandrajit Yadav : अनेक कलावंत मृत्यूचा पाठलाग करत आहेत!

Artist Chandrajit Yadav : अनेक कलावंत मृत्यूचा पाठलाग करत आहेत!

by प्रतिनिधी
0 comments
Artist Chandrajit Yadav

ख्यातनाम शिल्पकार चंद्रजित यादव यांचे नुकतेच (१० ऑगस्ट) वयाच्या ६३ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. या अगोदर शिल्पकार संजय तडसरकर यांचे ८ नोव्हेंबर २०२३ रोजी कोल्हापूर येथे वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी निधन झाले. तर  २५ डिसेंबर २०२३ रोजी शिल्पकार डॉ. उत्तम पाचारणे यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. हे तिघेही एकाच क्षेत्रातील शिल्पकार मित्र. कमी वयात झालेले तिघांचेही मृत्यू अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहेत. या तीनही कलावंतांचे लवकर निघून जाणे दृश्यकलेसाठी हानिकारक आहे. शिल्पकार म्हणून या तिघांचेही काम शिल्पाकृतीतून चिरंतन राहील, मात्र त्याहीपेक्षा त्यांनी केलेले संस्थात्मक काम कलाक्षेत्रासाठी पायाभूत ठरणारे आहे.

      – प्रा बाळासाहेब पाटील

दृश्यकलेच्या क्षेत्रात सध्या कमालीची स्पर्धा आहे. कामातील अनियमितता, आर्थिक ताणतणाव, अपुऱ्या साधन-सुविधा आणि भविष्याबद्दल अशाश्वतता यामुळे अनेक गुणी कलावंत वैफल्यग्रस्त झाले आहेत. तर काही व्यसनाधीन झाले आहेत. एकूणच ही बाब चिंतेची आणि  विचार करायला लावणारी आहे. दृश्यकलेचे क्षेत्र बाहेरून कितीही ग्लॅमरचे वाटत असले तरी आतील खदखद आणि अस्वस्थता आता लपून राहिलेली नाही. या क्षेत्रात नाव, प्रसिद्धी, पैसा एखाद्याला लवकर भेटते, तर अनेकांना मृत्यूनंतरही भेटत नाही. आयुष्यभर केवळ उपेक्षा आणि प्रतिक्षाच त्यांच्या नशिबी असते. शिल्पकलेचे क्षेत्र तर प्रचंड मेहनतीचे आणि आर्थिक गुंतवणुकीचे आहे. या सर्व संकटावर मात करीत या तिघांनीही एकूणच दृश्यकलेच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले होते. मात्र स्वत:च्या आरोग्याकडे त्यांनी कमालीचे दुर्लक्ष केले होते. कोल्हापूर येथे शिल्पकार संजय तडसरकर यांच्या श्रद्धांजली सभेत प्रा.गौतमीपुत्र कांबळे म्हणाले होते, ‘आपल्या अवतीभवती आजही हयात असणारे अनेक संजय तडसरकर मृत्यूचा पाठलाग करीत आहेत. त्यापैकी काहींना आपण वाचवू शकलो तर, हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.’ (Artist Chandrajit Yadav)

शिल्पकार चंद्रजित यादव यांचा जन्म १९६२ मध्ये कोतवडे, तालुका कडेगाव,जिल्हा सांगली येथे झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच झाले. पुढे कोल्हापूर येथील त्यावेळच्या स्कूल ऑफ आर्ट मधून फाउंडेशन तर कलानिकेतन महाविद्यालय, कोल्हापूर येथून एटीडी केले. त्यानंतर दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट कोल्हापूर, कलाविश्व महाविद्यालय सांगली असा प्रवास करीत शेवटी त्यांनी अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथून १९८४ साली जी.डी.आर्ट, पेंटिंग पूर्ण केले.१९८४ मध्येच त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथील शिल्पकला विभागात प्रवेश घेतला.१९८८ मध्ये शिल्पकलेचा पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या काळात बहुतांशी शिल्पकार प्रथम पेंटिंगचा पायाभूत किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करायचे आणि नंतर शिल्पकलेच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचे. शिल्पकार डॉ.उत्तम पाचारणे यांनी प्रथम १९७६ मध्ये अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथून एटीडी पूर्ण केले आणि त्यानंतर १९८१ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथून शिल्पकलेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. शिल्पकार संजय तडसरकर यांनी देखील १९८६ मध्ये पेंटिंगचा डिप्लोमा पूर्ण करून १९९० मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथून शिल्पकलेची पदविका प्राप्त केली आहे. या आठ-दहा वर्षाच्या पायाभूत व शास्त्रशुद्ध शिक्षणामुळे चित्र-शिल्पकलेचा तुलनात्मक आणि एकात्म अभ्यास होत असे. यामध्ये शरीरशास्त्र, रचना कौशल्य, माध्यम-तंत्र आणि कलात्मक दृष्टी प्रगल्भ होत असे. याशिवाय एकूणच दृश्य कलेचा इतिहास आणि वर्तमान अभ्यासला जायचा. कलाकृतीची समज व्यापक होण्याकरिता ही वर्षे आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरायची. साहजिकच याचा परिणाम प्रत्येक कामात उमटत असे. (सध्या महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या शिक्षण तज्ञांनी हा पाच वर्षाचा पदविका अभ्यासक्रम फक्त ‘ तीन ‘ वर्षाचा केला आहे!) (Artist Chandrajit Yadav)

   चंद्रजित यादव आणि संजय तडसरकर यांचे कला शिक्षण फक्त एकदोन वर्षांनी मागेपुढे होते. तसे दोघेही सांगली जिल्ह्यातील एकाच भागात जन्मलेले गुणी कलावंत. दोघांची ही वैचारिक जडणघडण आणि दृश्य कलेची बांधिलकी अगदी समांतर वाटावी अशी. दोघांचेही सामाजिक आणि सांस्कृतिक आकलन स्वतंत्र आणि ठाम होते. बहुतेक कलावंत स्वान्त: सुखाय किंवा एकटेपणात आनंद घेत असतात. मात्र हे दोघे याला अपवाद होते. दोघांभोवती सतत माणसांचा गोतावळा असायचा. त्यांच्याशी मैत्री करण्याकरिता तुम्ही कलावंत असला पाहिजे अशी अट नव्हती. वय, व्यवसाय यापलीकडे जाऊन त्यांचे सर्व स्तरातल्या सर्वांशी जुळायचे. कोणतेही संकट असो, या दोघांना मी कधीच गंभीर झाल्याचे पाहिले नाही. चंद्रजित यांचा स्वभाव तर हसण्या हसविण्यासाठीच होता!

चंद्रजित आणि संजय तडसरकर यांनी शिल्पकलेचा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर सुमारे दहा वर्षे प्रयोगशील वृत्तीने शिल्पकलेचा रियाज चालू ठेवला. या काळात त्यांनी कोणतीही व्यावसायिक कामे केली नाहीत. संजय तडसरकर ख्यातनाम शिल्पकार रवींद्र मेस्त्री यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करीत होते. तर चंद्रजित यांनी शिक्षणानंतर सुमारे दहा वर्षांनी १९९८ मध्ये इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम केले. २००३ मध्ये त्यांच्या शिल्पाकृतींचे पहिले एकल प्रदर्शन मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत झाले. या प्रदर्शनात त्यांनी त्यांचं बालपण शिल्पबद्ध केलं होतं. प्रदर्शनात गोगलगायीला एका काडीवर खेळवणारा मुलगा, बोकडाच्या गळ्यात घंटा बांधणारी मुले, बेडकाला पाण्यात सोडणारा मुलगा, कुत्र्याला कसरती करायला लावणारी  मुलगी, म्हशीच्या पाठीवर बसलेला मुलगा यासारखे विषय त्यांनी शिल्पबद्ध केले होते. चंद्रजित यांनी अनेक ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे पुतळे साकारले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजी नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आवारातील डॉ. आंबेडकरांचा पुतळा विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी अमरावतीचे राम मेघे यांचा नऊ फुटी पुतळा फक्त दोन महिन्यात केला होता. उद्योगपती आदित्य बिर्ला यांच्या कुटुंबीयांची त्यांनी अनेक कामे केली आहेत.

चंद्रजित यादव बॉम्बे आर्ट सोसायटीचे विद्यमान सेक्रेटरी होते. बॉम्बे आर्ट सोसायटीला १९८८ मध्ये मिळालेला भूखंड अनेक वर्षे बांधकाम न केल्यामुळे गमवावा लागला होता. चंद्रजित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तो पुन्हा मिळवून त्यावर सुसज्ज वास्तु उभी केली. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या जडणघडणीत चंद्रजित यांचे योगदान खूप मोठे आहे. (Artist Chandrajit Yadav)

प्रसिद्ध शिल्पकार डॉ. उत्तम पाचारणे या सोसायटीचे अनेक वर्षे चेअरमन होते. तर ते सुमारे साडेतीन वर्षे ललित कला अकादमीचे अध्यक्ष होते. डॉ.पाचारणे यांनी जे.जे.स्कूल ऑफ आर्ट, मुंबई आणि ललित कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने जेजेच्या प्रांगणात मार्च २०१८ मध्ये दृश्य कलाकारांसाठी खूप मोठा महोत्सव आयोजित केला होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अकादमीच्या वतीने त्यांनी देशातील निरनिराळ्या ठिकाणी दृश्य कलावंतांच्या कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्रातील चित्रकारांचा आणि शिल्पकरांचा सहभाग लक्षणीय होता. त्यांना ललित कला अकादमीचे महाराष्ट्रात विभागीय केंद्र उभारायचे होते. त्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. श्री पाचारणे अतिशय प्रेमळ, मनमिळावू आणि काहीसे गंभीर स्वभावाचे होते. त्यांनी स्वतःच्या पदाचा वापर स्वतःपेक्षा इतरांसाठी अधिक केला. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील अनेक कलावंतांना राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली. दिल्ली येथील ललित कला अकादमी मध्ये प्रथमच एका मराठी कलावंताचा आवाज ऐकला जात होता.

चंद्रजित यांचे दुसरे स्नेही शिल्पकार संजय तडसर त्यांच्याच तालुक्यातील तडसर गावचे. तडसरकर १९९० मध्ये मुंबईच्या सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिकत असताना जेजेचा ‘ जीएस ‘ होता. त्यावर्षीचा ” कलादीप – कलामेळा ” आजही अनेकांच्या स्मरणात आहे. १९९३-९४ मध्ये कोल्हापूर मधील कलामंदिर महाविद्यालयाचे पुनरुज्जीवन झाले आणि संजय तडसरकर यांच्याकडे या महाविद्यालयाची जबाबदारी आली. शिल्पकलाक्षेत्रात ‘ कलामंदिर ‘ स्थापित करण्यामध्ये संजय यांचे खूप मोठे योगदान आहे. सांगलीच्या ‘ कलापुष्प ‘ ग्रुपचा तो संस्थापक सदस्य होता. सांगली-कोल्हापूर मधील बऱ्याच कलाविषयक कार्यक्रम – उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. तो अत्यंत शिस्तप्रिय, कामाबद्दल निष्ठा असणारा आणि रोखठोक बोलणारा होता. ढोंगी लोकांच्या नजरेत तो ‘ व्हिलन ‘ ठरला होता. खोटं, नाटकी असण्यापेक्षा त्याचा स्पष्ट वक्तेपणा अनेकांना रुचला नाही. त्यामुळे संजयचा ‘ भक्त संप्रदाय ‘  नाही. चंद्रजित आणि संजय ही जोडी शिल्पकला क्षेत्रात सर्वांना परिचित होती.

या तीनही शिल्पकारांनी कला संस्थांच्या माध्यमातून अनेक नवोदितांना प्रेरणा आणि ऊर्जा दिली. आपल्या व्यावसायिक कामांबरोबरच कलाविषयक कार्यक्रम – उपक्रमांना त्यांनी नेहमीच बळ दिले.  त्यामुळे या तीनही कलावंतांचे यानिमित्ताने स्मरण करतांना अनेक आठवणी जाग्या झाल्या. तीन वर्षात तिघांचाही निरोप घ्यावा लागणे हे अतिशय दुर्दैवी आहे. माझ्यासारख्याला या तिघांचाही सहवास लाभला. चंद्रजित यांचा ‘ कलापुष्प ‘ च्या अनेक कार्यक्रम – उपक्रमात सहभाग असायचा. त्यांचे शिल्प प्रात्यक्षिक एखाद्या संगीत मैफली सारखे असायचे. चारचौघात खूप गप्पा मारायचे मात्र स्टेजवर अतिशय मोजक्या शब्दांत व्यक्त व्हायचे. (Artist Chandrajit Yadav)

शिल्पकार चंद्रजित यादव यांच्या निधनामुळे या तिघांच्याही कला प्रवासाचा, मैत्रीचा आणि त्यांनी केलेल्या संस्थात्मक कामाचा यानिमित्ताने हा छोटासा उजाळा! या तिघांमध्ये ‘ माणूस ‘ आणि ‘ कलावंत ‘ म्हणून अनेक समान धागे आहेत. त्यांच्या मैत्रीची वीण अखेरपर्यंत घट्ट होती. कलाक्षेत्राने या तिघांच्याही कार्याची फारशी नोंद घेतली नाही. या तिघांपैकी एकालाही कलाक्षेत्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कोणत्याही पुरस्काराने सन्मानित केलेले नाही. पद, पैसा आणि प्रसिद्धी यांच्या मागे धावण्याचा या तिघांचाही स्वभाव नव्हता. राज्य शासनाच्या कला संचालनालयाने शिल्पकार चंद्रजित यादव यांच्या कार्याची दखल घेऊन ‘ मरणोत्तर ‘ तरी त्यांना सन्मानित करावे अशी अपेक्षा! असे झाले तर, एकप्रकारे या तिघांनाही गौरविल्यासारखे होईल. चंद्रजित यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल!

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00