Home » Blog » Shaniwarwada : पुण्याची अब्रू टांगली शनिवारवाड्यावर

Shaniwarwada : पुण्याची अब्रू टांगली शनिवारवाड्यावर

0 comments
Shaniwarwada

पुण्यातल्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारवाड्यात जिथे कथित नमाजपठण झालं, ती जागा गोमूत्र शिंपडून शुद्ध करण्यात आली. या शनिवारवाड्यात मस्तानीचा अनेक वर्षे वावर होता, हे मेधा कुलकर्णींना ठाऊक नाही का या मेधा कुलकर्णी प्राध्यापक असल्याचं सांगितलं जातं, त्यांना प्राथमिक शाळेतला इतिहास ठाऊक नाही का, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाला आहे. आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन करण्याची आणि पुण्यात धार्मिक तेढ वाढवण्याची त्यांना एवढी हौस कशापायी आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

गौतमी पाटीलपासून सुरुवात

गणेशोत्सवाच्या काळात चर्चेत असणारे पुणे दिवाळीतही विविध कारणांनी देश-विदेशात उजळून निघाले आहे. एकापाठोपाठ घडणा-या घटनांमुळे पुणे शहर आपले मूळ रंग दाखवू लागले आहे. त्यामुळे पुण्याची, तिथल्या प्रवृत्तीची, त्या प्रवृत्तींना संरक्षण देणा-या सत्ताधा-यांची लक्तरे वेशीवर टांगली जाऊ लागली आहेत. (Shaniwarwada)

पुण्यातल्या प्रकरणांची चर्चा करताना सुरुवात करताना कुठून करावी असा प्रश्न पडण्याजोगी स्थिती आहे. गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघातापासून पुणे चर्चेत येऊ लागलं. म्हणजे गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघातापेक्षाही, गौतमी पाटीलला उचलणार की नाही, असा प्रश्न उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. त्यामुळं अपघाताचं हे प्रकरण अधिक चर्चेत आलं. ते योग्य रितीनं मिटलं.

प्रेम बिरहाडे प्रकरण

पाठोपाठ प्रेम बिरहाडे या तरुणानं मॉडर्न कॉलेजवर केलेल्या आरोपामुळं बराच धुरळा उडाला. आपण मॉडर्न कॉलेजचे माजी विद्यार्थी आहोत. लंडनमधील एका नोकरीसाठी मला कॉलेजकडून पत्र हवं होतं. मी कॉलेजचा विद्यार्थी होतो, एवढंच पत्र हवं होतं. परंतु मला कॉलेजनं जात विचारली. आणि त्यानंतर वेळेत पत्र दिलं नाही. त्यामुळं माझी नोकरी गेली. यापूर्वी कॉलेजनं विद्यापीठाच्या प्रवेशावेळी लेटर ऑफ रिकमंडेशन दिलं होतं. परंतु यावेळी त्यांनी पत्र दिलं नाही. माझ्या परिवाराचा, माझ्या समाजाचा अनेक वर्षांचा संघर्ष होता. त्या संघर्षातून मी नोकरी मिळवली, परंतु पुण्याच्या कॉलेजमुळं गेली, असं बिरहाडेनं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

त्यानंतर मॉडर्न कॉलेजच्या जातीयवादाचे अनेक किस्से सोशल मीडियावर अनेकांनी जाहीर केले. मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य निवेदिता एकबोटे यांनीही तक्रार दिली आहे. माजी विद्यार्थी प्रेमवर्धन नरोत्तम बिरहाडे यांच्याकडून छळ, बदनामी आणि सोशल मीडियाच्या गैरवापराबद्दल त्यांनी तक्रार केली आहे. संबंधित विद्यार्थ्याला महाविद्यालयानं तीन वेळा लेटर ऑफ रिकमेंडेशन दिलं आहे. तसेच एक बोनाफाईड प्रमाणपत्र देण्यात आले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (Shaniwarwada)

निवेदिता एकबोटे हिंदुत्ववादी

प्राचार्य निवेदिता एकबोटे या भाजपशी आणि हिंदुत्ववादी गटांशी संबंधित आहेत. त्यांचे वडिल संस्थेचे प्रमुख आहेत आणि पात्रता नसताना त्यांना प्राचार्य केल्याचे आरोप होत आहेत. हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे हे त्यांचे काका आहेत. अशी सगळी पार्श्वभूमी असल्यामुळं प्रेम बिरहाडेने केलेले आरोप खरे असावेत, असेच लोक मानत आहेत.

जैन वसतिगृहाच्या जागेचा वाद

दुसरी घटना आहे, पुण्यातील मॉडेल कॉलनीतील जैन संस्थेची जागा स्वस्तात पदरात पाडून घेतल्यासंदर्भातली. पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील सेठ हिराचंद नेमचंद दोशी मेमोरियल ट्रस्ट (SHND ट्रस्ट) आणि गोखले लँडमार्क्स एलएलपी यांच्यात ट्रस्टच्या तीन एकर जागेच्या विक्रीचा व्यवहार झाला. या जागेवर सेठ हिराचंद नेमचंद दोशी जैन वसतिगृह,  ६५ वर्ष जुने भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर आणि मैदान, सांस्कृतिक हॉल आदींचा समावेश आहे. हा ट्रस्ट १९५८ मध्ये गरीब जैन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवण्याच्या उद्देशाने स्थापन झाला होता. चॅरिटी कमिशनरनी ४ एप्रिल २०२५ रोजी ट्रस्टला ही जागा गोखले लँडमार्क्स एलएलपी या बांधकाम कंपनीला विकण्याची परवानगी दिली. विक्री करार १५ मे २०२५ रोजी झाला, आणि विक्री डीड ८ ऑक्टोबर २०२५ रोजी नोंदवले गेले.

 गोखले लँडमार्क्स एलएलपीच्या म्हणण्यानुसार, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा व्यवहार झाला आहे. ट्रस्टच्या उद्देशाला अनुरूप असा हा पुनर्विकास आहे. ट्रस्टच्या ट्रस्टींनींही यामध्ये निधीचा दुरुपयोग नसल्याचे आणि नवीन वसतिगृह ट्रस्टच्या तत्त्वांनुसार चालवले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप झाले. ज्या धर्मादाय आयुक्तांनी व्यवहाराला कायदेशीर मान्यता दिली, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. जैन समाजाने याप्रश्नी पुण्यात मोठा मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. मुरलीधर मोहोळ यांनी याप्रश्नी आपला काहीही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. मात्र भाजपभोवतीचे संशयाचे वादळ शमत नाही

भाजपला वाचवण्यासाठी शनिवारवाडा प्रकरण

वेगवेगळ्या निमित्तांनी भाजप अडचणीत येत असल्यामुळेच खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यातील नमाज पठणाचे प्रकरण बाहेर काढल्याचा आरोप होत आहे.पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा येथे नमाज पठणाच्या एका व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला आहे. १९ ऑक्टोबरला सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात शनिवारवाड्याच्या आवारातील उद्यानात मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचे दिसत आहे. हा परिसर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे आणि ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून ओळखला जातो. येथे एक छोटीशी मजार (दर्गा) देखील आहे, त्यासंदर्भात हिंदुत्ववाद्यांच्या आधीपासून काही तक्रारी आहेतच.

नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खासदार मेधा कुलकर्णी यांनी मोठा कांगावा केला. पतित पावन संघटना आणि सकल हिंदू समाजासारख्या संघटनांनी ‘ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य भंग’ झाल्याचा आरोप करत आंदोलन केले. आंदोलकांनी नमाज पठण केलेल्या जागेवर गोमूत्र शिंपडले, भगवा झेंडा फडकावण्याचा प्रयत्न केला आणि शिववंदना केली. (Shaniwarwada)

एकीकडे भाजपच्या मेधा कुलकर्णी या प्रकरणाचे राजकारण करीत असताना महायुतीतल्याच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांना प्रत्त्युत्तर देताना ‘समाजात तेढ निर्माण केल्याचा’ आरोप केला आहे. मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा प्रकार हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे.

शनिवारवाडा म्हणजे तीर्थस्थान आहे का?

शनिवारवाडा म्हणजे तीर्थस्थान नाही. इथे बराच काळ मस्तानीचा वावर होता. शनिवारवाड्याच्या दरवाजावर छत्रपतींचा भगवा जरीपटका होता, तो खाली उतरवून पेशव्यांनी युनियन जॅक फडकावला होता. लगतच पेशवेकालीन दर्गा आहे. पेशव्यांना अडचण नव्हती. त्याची यांना का अडचण होते? काका मला वाचवा, अशा हाका शनिवारवाड्यातून ऐकू येतात., असं लोक म्हणतात. तिथं जाऊन विधात्याचं नाव घेतलं तर चांगलंच आहे. तुम्हीही रामनामाचा जप करा. जिथं इतकं काही घडून गेलं आहे. गोमूत्र शिंपडून ते शुद्ध होणार असेल तर शनिवारवाडा धुवून काढायला पाहिजे, असं सचिन सावंत म्हणाले.

मेधा कुलकर्णी यांनी मागे एके ठिकाणी हिरवा रंग होता, त्यावर भगवा रंग फासला. त्यावेळीही त्यांना भाजपच्या झेंड्यावरील हिरव्या रंगालाही भगवा रंग फासा, असा सल्ला अनेकांनी दिला होता.

मागे पुण्यातील गांधी स्मारक निधीच्या एका संमेलनाची जाहिरात करणारी रिक्षा फिरत होती. त्या रिक्षात ईश्वर अल्ला तेरो नाम, हे भजन लावले होते. तर ती रिक्षा मेधा कुलकर्णी यांनी अडवून ठेवली होती. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी तंबी दिल्यावर त्यांनी रिक्षा सोडून दिली.

तर मेधा कुलकर्णी यांच्यामार्फत सातत्याने मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू आहेत. हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करून काहीतरी मोठा धमाका करावा, असं त्यांना वाटत असावं. पण त्यांना कुणी गांभीर्यानं घेत नाही, त्यामुळं त्यांची अडचण झालेली दिसते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00