पुरंदर : प्रतिनिधी : एक दिवसाची परवानगी दिली आहे तर एका दिवसातच अंमलबजावणी करा. नाही तर आताच मागणी मान्य करा. आम्ही शिवनेरीवरुनच गुलाल उधळणार. मात्र ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर आता मागे हटणार नाही. असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. (Manoj Jarange PC)
मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर मनोज जरांगे मुंबईकडे निघाले आहेत. २९ ऑगस्टपासून आझाद मैदानात ते बेमुदत उपोषण करणार आहे. आझाद मैदानावर त्यांना एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. आज गुरुवारी संध्याकाळी ते मुंबईत पोहोचणार आहेत. अंतरवाली सराटीतून त्यांनी मुंबईपकडे कूच केल्यानंतर गावागावात त्यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. आज गुरुवारी सकाळी ते पुरंदर मध्ये पोहोचल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
समाजाच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घ्याव्या, आणि गोरगरीब मराठ्यांना न्याय द्यावा, त्यांनी जर आज सरसकट आरक्षणाची अंमलबजावणी केली तर आम्ही शिवनेरीवरुनच गुलाल उधळू आणि मागे जाऊ. मात्र मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही मुंबईत येणारच आणि आझाद मैदानात आंदोलन करणार, असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. (Manoj Jarange PC)
मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझादा मैदानात उपोषणाची परवानगी दिली आहे. मात्र फक्त एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली. त्यासोबतच पाच हजारांपेक्षा जास्त आंदोलक मैदानात नको, अशीही अट घातली आहे. आंदोलनाला फक्त एक दिवसाची परवानगी हे मुख्यमंत्री फडणवीसांचे षडयंत्र आहे. आंदोलनाला परवानगी दिली, असे दाखवण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे. मात्र गोरगरीब मराठ्यांविरोधातील आडमुठी भूमिका फडणवीसांनी सोडून द्यावी आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी द्यावी, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदरपूर्वक सांगतो की आम्हाला अट घालू नका. कारण हे लोक मला सोडायला आले आहेत. ज्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावे. कारण मला मुंबईत सोडल्यानंतर ते गावात, तालुक्यात जाऊन आंदोलन करणार आहेत. आम्ही आमच्या आंदोलनाचे टप्पे केले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अटीशर्ती काढून टाकाव्यात, अशी विनंती मनोज जरांगे यांनी केली आहे.
मंगळवारी रात्री १२ वाजता राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांनी मनोज जरांगे यांना फोन केला मात्र तेव्हा ते झोपलेले होते. अंतरवालीच्या सरपंचानी सकाळी त्यांना फोन करण्यास सांगितले, तेव्हा विखे पाटील यांनी म्हटले की, जर जरांगे पाटील आता चर्चेसाठी तयार असतील तर मी आताही येण्यास तयार आहे, अशी माहिती जरांगे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. मात्र आता राजकीय नेतेही चर्चेला यायला तयार नाहीत. त्यांना त्याचे राजकीय आयुष्य डावावर लावायचे नाही असे दिसत आहे. गोरगरीब मराठ्यांची नाराजी घेण्याची राजकीय नेत्यांची तयारी नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे मुंबईत येण्यावर ठाम आहेत. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस कोणाला थांबवणार नाहीत. गोरगरीबांचा सन्मान करतील. एक दिवसाची परवानगी देणे ही गोरगरीब मराठ्यांची चेष्टा आहे. त्यांना असे सिद्ध करायचे होते की, मी परवानगी दिली माझी काय चूक आहे. तुम्ही न्यायालय-न्यायालय म्हणत होते, पण परवानगी देण्याचा अधिकार तुमच्याकडेच होता. तुम्ही मोठं मन दाखवून गोरगरीबांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे. आम्हाला आंदोलनासाठी पूर्ण वेळ तुम्ही दिला पाहिजे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधीचे सोने करण्याची वेळ आली आहे, असे सांगत मनोज जरांगे म्हणाले, शिवनेरी गडाच्या पायऱ्यावरुन सांगतो संधीचं सोनं करण्याची तुम्हाला योग्य वेळ आहे. तुम्ही दिलेल्या आरक्षणाचे उपकार गोरगरीब मराठे विसरणार नाहीत. तुम्ही तुमची मराठा विरोधी आडमुठी भूमिका सोडून द्या. तुम्ही काही आमचे शत्रू नाही, तुम्हाला संधी आली आहे. त्याचं सोनं करा. आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची भूमिका बदला. एक दिवसाची परवानगी दिली आहे तर एका दिवसातच अंमलबजावणी करा. नाही तर आताच मागणी मान्य करा. आम्ही शिवनेरीवरुनच गुलाल उधळणार. मात्र ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर आता मागे हटणार नाही. असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. (Manoj Jarange PC)