मुंबई : प्रतिनिधी : अशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी, १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने तीव्र विरोध दर्शवला आहे. सामन्याच्या दिवशीच शिवसेनेकडून ‘माझं कुंकू, माझा देश’ अभियान राबवण्यात येणार आहे. (Shivsena Oppose India Pak Cricket)
आशिया चषक क्रिकेट 2025 स्पर्धेला नऊ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. आखातातील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याला शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्यादिवशी शिवसेना ठाकरे गटाकडून “माझं कुंकू माझा देश अभियान” राबवण्यात येणार आहे. अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी यांनी दिली.
खासदार राऊत म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमधील सामना लोकभावना डावलून घेतला जात आहे. पहलगाममधील जे २६ निरपराध लोक मारले गेले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश संपलेला नाही. अतिरेकी सापडले नाहीत. ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या विरोधात सुरू आहे, ते आजही संपलेलं नाही, असं सांगितलं जात आहे. तसेच पाकिस्तानच्या कारवाया काश्मीरमध्ये संपलेल्या नाहीत. अशावेळेला पाकिस्तानचं कंबरडे मोडण्याची आणि पाकिस्तान बरोबरचे सर्व संबंध तोडून टाकण्याची भाषा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व असली नकली हिंदुत्ववादी नेत्यांनी हा विषय वारंवार मांडला आहे. पाकिस्तानबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही, असे त्या सर्वांनी सांगितलं असल्याचे म्हणत राऊत यांनी भाजपावर टीका केली. (Shivsena Oppose India Pak Cricket)
रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. सिंदू नदीचं पाकिस्तानला जाणारं पाणी रोखण्यात आलं. मग आमचा प्रश्न आहे की, रक्त आणि क्रिकेट एकत्र कसे होत आहे? आमच्या महिलांचं उजाडलेलं सिंदूर तुम्ही इतक्या लवकर विसरलात? का असा सवाल खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. आमचा प्रश्न भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भाजपाच्या मोठ्या नेत्यांची भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याविषयी काय भूमिका आहे? हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध केला आहे. यासाठी आमची महाराष्ट्रात महिला आघाडी रस्त्यावर उतरणार आहे. “माझं कुंकू, माझा देश” अशा प्रकारचं आंदोलन करण्यात येणार आहे. ठाकरे गटाची महिला आघाडी १४ सप्टेंबर रोजी “सिंदूर रक्षा” आंदोलन करणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरातून पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवलं जाईल, असे देखील संजय राऊत यांनी सांगितले.