पुणे : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या गंभीर आरोपांना आधार देणारे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शनिवारी (९ ऑगस्ट) नागपुरात बोलताना केले. तसेच मत चोरीचा प्रकार होत असावा, असेही सूचित केले आहे. (Fadanvis questions Pawar)
पवार यांच्या वक्तव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच प्रत्युत्तर दिले. मतदान प्रक्रियेत अनियमितता झाली असेल आणि तसा काही संशयास्पद प्रकार होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शरद पवार त्यावेळीच का बोलले नाहीत, ते इतके दिवस गप्प का होते? असा प्रतिसवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसेच राहुल गांधी यांचाही त्यांनी ‘पळपुटे’ असा उल्लेख करत खरपूस समाचार घेतला. (Fadanvis questions Pawar)
फडणवीस म्हणाले, “राहुल गांधींना भेटल्यावरच शरद पवारांना याची आठवण का आली? इतके दिवस ते का बोलले नाहीत? राहुल गांधी ज्या प्रकारे सलीम-जावेदच्या कथा तयार करून त्याच स्क्रिप्टवर रोज कपोकल्पित सांगत आहेत, पवारांचीही तशीच अवस्था झाली नाही ना?” असा सवाल त्यांनी केला.
“ राहुल गांधी अनेक वर्षे ईव्हीएमबद्दल बोलत होते त्यावेळी शरद पवार बोलत नव्हते. पवारांनी अनेकदा स्पष्टपणे असे सांगितले की ईव्हीएमला दोष देणं आयोग्य आहे. मग आता अचानक शरद पवार असे का बोलत आहेत? राहुल गांधी यांच्या भेटीचा तो परिणाम दिसतोय,” असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. (Fadanvis questions Pawar)
खोटं बोलायचं आणि पळून जायचं
रोज काहीतरी खोटं बोलायचं आणि पळून जायचं असे हे पळपुटे लोकं आहेत, अशी टीका फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केली. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांकडून मतदान प्रक्रियेबाबत कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी भारताएवढ्या ‘फ्री अँड फेअर’ निवडणुका कुठे होत नाहीत हे सर्वांना माहिती आहे. हे सगळे बाहेर बोलतायत, पण निवडणूक आयोगाने बोलवल्यावर हे कोणी जात नाहीत, निवडणूक आयोगासमोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत. सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की आम्ही शपथपत्र देणार नाही कारण आम्ही संसदेत शपथ घेतलीय, तर चालेल का?, असा सवालही फडणवीस यांनी यावेळी केला.
हेही वाचा :
निवडणूक आयोग, ते दोघे आणि पवारांचा गौप्यस्फोट …
अदानींचा राजीनामा : मोदींसाठी धक्का आणि धोका?
ट्रम्प टेरिफमुळं भारतात कोट्यवधी रोजगारांवर कुऱ्हाड