पुणे : प्रतिनिधी : केसरी वृत्तपत्राचे संपादक डॉ. दीपक जयंत टिळक (वय ७४ ) यांचे पुण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले . ते लोकमान्य टिळकांचे पणतू आहेत. ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील होते. त्याचबरोबर अनेक संस्थांचे ते विश्वस्त होते. (Deepak Tilak)
आज बुधवारी ( दि. १६ जुलै) रोजी पहाटेच्या सुमारास त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. डॉ. दीपक टिळक यांच्या पश्चात काँग्रेस नेते असलेले सुपुत्र रोहित टिळक, कन्या, नातवंडे असा परिवार आहे.
डॉ. दीपक टिळक हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू होते. ‘केसरी’चे विश्वस्त संपादकपद देखील त्यांनी भूषवलं आहे. डॉ. दीपक टिळक हे काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील राहिले होते. २०२१ मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रायलयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. (Deepak Tilak)
‘लोकमान्य टिळक यांचा महाराष्ट्रातील समाजकारणातील विविधांगी क्षेत्रातील वारसा समर्थपणे चालविणारे लोकाभिमुख, मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व डॉ. दीपक टिळक यांच्या निधनामुळे अनेक सामाजिक संस्थांचा आधारस्तंभ हरपला आहे,’ अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. दीपक टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘केसरी’चे विश्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे नेत, ‘केसरी’सारख्या ऐतिहासिक दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार आणि लोकशिक्षणाचा ध्यास जपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Deepak Tilak)