Home » Blog » Mahakumbh PM : महाकुंभ : पंडित नेहरू ते मोदी

Mahakumbh PM : महाकुंभ : पंडित नेहरू ते मोदी

पंतप्रधानांनी लावली होती उपस्थिती

by प्रतिनिधी
0 comments
Mahakumbh PM

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभमेळा सुरू आहे. देश-विदेशातील भाविक गंगेत डुबकी मारुन पवित्र स्नानाची अनुभूती घेत आहेत. राजकीय नेत्यापासून बड्या उद्योगपतीपर्यंत, परदेशातील उद्योगपती, साधू, संत, सर्वसामान्य नागरिक महाकुंभचा लाभ घेत आहेत. दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याचा योग येतो. यापूर्वी झालेल्या महाकुंभ मेळ्यात पंडित जवाहलाल नेहरू, इंदिरा गांधी, सोनिया गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवित्र स्नान केले आहे. (Mahakumbh PM )

 

पंडित नेहरूंचे अलाहाबाद

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जन्मगाव अलाहाबाद असल्याने त्यांच्या आयुष्याची जडणघडण प्रयागराजच्या गंगाकिनारी झाली. पंडित नेहरुंचे वडील बॅरिस्टर मोतिलाल नेहरू यांनी अलाहाबादला स्वत:ची आनंद भुवन वास्तू बनवली होती. मोतीलाल नेहरू आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे दोघेही काँग्रेसचे नेते होते. त्यामुळे अलाहाबादवरून देशातील काँग्रेसची सूत्रे हलत. इंदिरा गांधी यांनी १९७० मध्ये आनंद भुवन भारत सरकारला दान केले होते. देश स्वतंत्र झाल्यावर १९५४ मध्ये प्रयागला महाकुंभचे आयोजन केले होते. तीन फेब्रुवारी १९५४ रोजी प्रयागच्या तीर्थावर झालेल्या महाकुंभ मेळाव्यात पंडित नेहरू, तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी स्नान केले होते. पंडित नेहरूंची मोठी लोकप्रियता असल्याने महाकुंभ मेळ्यात त्यांना पाहण्यासाठी मोदी गर्दी झाली होती.(Mahakumbh PM )

शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाकुंभ मेळ्यात

११ जानेवारी १९६६ ला तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे ताश्कंदला निधन झाले. शास्त्रींच्यानंतर पंतप्रधान कोण होणार, याकडे देशाचे लक्ष होते. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष के. कामराज, मोरारजी देसाई यांची नाव अग्रस्थानावर होते. पण ‘गुंगी गुडिया’ म्हणून ज्यांची संभावना केली जात होती म्हणजेच इंदिरा गांधी यांचे नाव काँग्रेसच्या सिंडिकेटने सुचवले. १९ जानेवारी १९६६ रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई यांच्यात पंतप्रधानपदासाठी निवडणूक झाली. त्यामध्ये इंदिरा गांधींना ३५५ तर मोरारजी देसाई यांना १६९ मते मिळाली. त्यानंतर २४ जानेवारी रोजी इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या. ज्यावेळी त्या पंतप्रधान बनल्या त्यावेळी प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरु होता. पंतप्रधान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी २५ जानेवरीला मौनी अमावस्या होती. इंदिरा गांधी लालबहाद्दूर शास्त्री यांच्या अस्थी घेऊन प्रयाग संगमावर पोहोचल्या. त्यांच्यासोबत राष्ट्रपती राधाकृष्णन, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष के. कामराज आणि झाकिर हुसेन होते. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी महाकुंभमध्ये स्नान केले होते. पण त्याचा राजकीय फायदा इंदिराजींना झाला नाही. १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जेमतेम २८३ जागाच जिंकल्या. १९५२ नंतर प्रथम काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्या होत्या.

आणीबाणीत पुन्हा कुंभमेळ्यात

इंदिरा गांधी यांनी १८ जानेवारी १९७७ मध्ये देशात आणीबाणी जाहीर कली. त्यानंतर चार दिवसानंतर त्या २२ जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी महाकुंभला पोचल्या. तिथे त्यांनी प्रयागसंगमावर स्नान करुन साधूसंतांची भेट घेतली. त्यांनी तिथे भाषण केले आणि दिल्लीत परतल्या. आणिबाणीमुळे त्यांच्या विरोधात जनमत तयार झाले होते. त्याचे पडसादही कुंभमेळ्यात उमटले होते. जयप्रकाश नारायण यांनीही कुंभमेळ्यात स्नान  करुन साधूसंतांची भेट घेतली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी सत्तेतून पायउतार झाल्या.(Mahakumbh PM )

राम मंदिर उभारणीची घोषणा

१९८९ मध्ये झालेल्या प्रयागराज कुंभमेळ्यासाठी राजीव गांधी येणार होते. ‘पिलग्रीमेज एंड पावर : द कुंभ मेला इन इलाहाबाद फ्रॉम १७७६-१९५४’ या पुस्तकात कामा मॅकलिन यांनी लिहिले आहे की ‘राजीव गांधी कुंभमेळ्यात येणार होते. त्यासाठी प्रयागमध्ये हॅलिपॅडही बनवले होते, पण त्यावेळी तामिळनाडूत झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्यांना फक्त २६ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे राजीव गांधी यांनी कुंभमेळ्याचा दौरा रद्द केला होता. याच कुंभमेळ्यात १ फेब्रुवारी १९८९ रोजी विश्व हिंदू परिषेदेने संत संमेलन आयोजित केले होते. त्या संमेलनात नऊ नोव्हेंबर १९८९ या दिवशी राम मंदिराचा शिलान्यास करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपच्या पालमपूर येथील अधिवेशनात निवडणूक घोषणापत्रात राम मंदिर उभारण्याच्या समावेश करण्यात आला होता. लालकृष्ण आडवाणी यांनी हा प्रस्ताव तयार केला होता. डिसेंबर १९८९ च्या निवडणूकीत भाजपच्या जागा दोन वरुन ८५वर पोहोचल्या.(Mahakumbh PM )

पापा वन, पापा टू, पापा थ्री

सोनिया गांधी राजकारणात सक्रीय झाल्यानंतर देशात भाजपची सत्ता आणि आणि अटलबिहारी वायपेयी पंतप्रधान झाले. त्यानंतर ११ महिन्यांनी २००१ मध्ये प्रयागमध्ये कुंभमेळा झाला. २२ जानेवारी २००१ मध्ये सोनिया गांधी कुंभमेळासाठी प्रयागला पोहोचल्या. तत्पूर्वी आनंद भवनला गेल्या. राजीव गांधी यांचे ते आजोळ होते. आनंद भुवनातून सोनिया गांधी सरस्वती घाटावर पोहोचल्या. तिथे खास नावेने संगमासाठी रवाना झाला. नावेत त्यांच्यासाठी चेजिंग रुम बनवली होती. प्रयाग संगमावर स्नान केल्यानंतर त्या वीस मिनिटे तिथे थांबल्या होत्या. त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, ‘मी माझ्या घरी आले आहे. मी सासरी आले आहे.’ सोनिया गांधी प्रयागला आल्या त्यावेळी एक वायरलेस मेसेज आला होता. त्याबद्दल काँग्रेसचे नेते अभय अवस्थी यांनी सांगितले की, वायरलेस मेसेज ‘पापा वन, पापा टू, प्रापा थ्री’ असा होता. त्याबद्दल मी सुरक्षा अधिकाऱ्यांना या मेसेजबद्दल विचारले असता सोनिया गांधी यांचा तो प्रोटोकॉल कोड असल्याचे सांगण्यात आले. प्रयागस्नानानंतर त्या ज्या तीन ठिकाणी जाणार होत्या त्या जागासाठी कोडवर्ड केला होता. स्नानानंतर सोनिया गांधी टीकरमाफी आश्रम, सतपाल महाराज, शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती आश्रमात गेल्या होत्या. सोनिया गांधींच्या कुंभमेळा उपस्थितीबद्दल भाजपने पॉलिटिकल अंजेडा म्हणून टीका केली होती. त्यानंतर तीन वर्षानी झालेल्या निवडणुकीत एनडीए पायउतार झाली आणि यूपीएची सत्ता आली.(Mahakumbh PM )

नरेंद्र मोदींचे अर्ध महाकुंभात स्नान

२०१९ मध्ये प्रयागराजमध्ये अर्ध महाकुंभाचे आयोजन केले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी २४ फेब्रुवारी २०१९ रुद्राक्ष घालून प्रयागात डुबकी मारली हेती. मोदी यांच्यासाठी खास व्यवस्था केली होती. काळ्या रंगाचा कुर्ता आणि गळ्यात रुद्राक्ष माळा घालून मोदींनी महाकुंभात स्नान केले होते. स्नान केल्यानंतर मोदींनी भगवा कुर्ता, पिवळे जॅकेट घालून मंडपात पोहोचले आणि त्यांनी पाच सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले. त्यानंतर तीन महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे २०१९ ला जाहीर झाला. भाजपने ३०३ जागा जिंकून दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली आणि मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले. (Mahakumbh PM )

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00