पंडित जवाहरलाल नेहरू यांचा एक फोटो व्हायरल करून स्वामी विद्यानंद विदेह यांनी त्यांना कानशिलात लगावली होती, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. वस्तूस्थिती नेमकी काय आहे?… (Pandit Nehru)
-विजय चोरमारे
पंडित जवाहरलाल नेहरू एका समारंभात बोलताना म्हणाले होते की, ‘‘हिंदू लोक भारतात शरणार्थी आहेत.’’ हे ऐकून, समारंभाचे मुख्य पाहुणे स्वामी विद्यानंद विदेह उभे राहिले आणि व्यासपीठावरच नेहरू यांच्या जोरदार कानशिलात लगावली. त्यांच्या जवळचा माईक काढून घेत म्हणाले, ‘‘आर्य हिंदू’’ लोक निर्वासित नसून, ते आमचे पूर्वज आहेत आणि या देशाचे मूळ रहिवासी आहेत. तुमचे स्वतःचे पूर्वज ‘अरबी’ आहेत, आणि तुमच्या शरीरात ‘अरबी’ रक्त वाहत आहे. तुम्ही या महान देशाचे मूळ रहिवासी नाहीत… खरं पहायला गेलो तर आमच्या देशात तुम्ही शरणार्थी आहात.’’ वगैरे वगैरे. (Pandit Nehru)
तसेच स्वामी विद्यानंद विदेहजी पुढे असे म्हणाले, ‘‘जर सरदार वल्लभभाई पटेल या देशाचे पंतप्रधान असते, तर आपल्याला हे सगळे पाहावे लागले नसते.’’ या सर्व घडामोडी नंतर व्यासपीठावर एकच गोंधळ उडाला होता. त्या वेळी एका छायाचित्रकाराने ही दुर्मिळ प्रतिमा टिपली होती. त्यासाठी विदेह गाथा या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे.
अशी पोस्ट आणि त्यासोबत नेहरूंचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही वर्षांपूर्वी ही पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली होती. आणि आता पुन्हा भक्त मंडळी ती व्हायरल करताहेत. अर्थात ताज्या काश्मिर हल्ल्याचा त्याला संदर्भ असावा. जेणेकरून हिंदू-मुस्लिम विद्वेष पसरवता पसरवता नेहरूंचीही बदनामी करून घेता येईल. अशी खोटी माहिती वारंवार आणि पुन्हा पुन्हा पसरवण्याचे काम करणारी मोठी जमात सोशल मीडियावर सक्रीय आहे. सोशल मीडियावर बिनडोक लोकांची गर्दी आहे. त्यातल्या अनेकांना ही माहिती खरीच वाटते. आणि ते पुन्हा ती पुढे पाठवत असतात. (Pandit Nehru)
आता आपण वस्तुस्थिती जाणून घेऊया…
स्वामी विद्यानंद विदेह यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना एका समारंभात कानशिलात लगावली, असा या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे. कारण नेहरुंनी आपल्या भाषणात हिंदू लोकांना भारतातील निर्वासित (शरणार्थी) म्हटले होते. या दाव्यासोबतच हा फोटो त्या घटनेचा असल्याचे सांगितले जाते.
धादांत खोटा दावा
मुळात हा दावा खोटा आहे. या फोटोचा संदर्भ चुकीचा दिला गेला आहे.
हा फोटो जानेवारी १९६२ मध्ये पटना येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनादरम्यानचा आहे. या वेळी काही कारणाने समारंभात गोंधळ उडाला होता. पंडित नेहरू जमावाला शांत करण्यासाठी पुढे सरकले होते. त्या वेळी एका सुरक्षारक्षकाने त्यांना मागे ओढले होते. जेणेकरून त्यांना कोणतीही इजा होऊ नये. हा फोटो त्या क्षणाचा आहे. बदनामीकारक पोस्टमध्ये जो दावा करण्यात आला तशी कानशिलात मारण्याची कोणतीही घटना घडलेली नाही. (Pandit Nehru)
स्वामी विद्यानंद विदेह यांनी नेहरू यांना कानशिलात मारली, दावा केला जातो. कारण नेहरू हिंदूंना निर्वासित म्हणाले होते. मात्र, या घटनेचा कोणताही ऐतिहासिक किंवा प्रामाणिक पुरावा उपलब्ध नाही. स्वामी विद्यानंद विदेह हे वेद संस्थानचे संस्थापक होते, आणि त्यांच्या अधिकृत साहित्यात किंवा इतर कोणत्याही विश्वसनीय स्रोतांमध्ये अशा घटनेचा उल्लेख नाही. अशी घटना खरोखर घडली असती, तर तिचा उल्लेख समकालीन वृत्तपत्रांमध्ये, सरकारी कागदपत्रांमध्ये, किंवा नेहरू यांच्या समर्थक/विरोधकांकडून नोंदवला गेला असता. परंतु असा कोणताही पुरावा नाही.
दाव्यात म्हटले आहे की, नेहरू यांनी हिंदूंना भारतातील निर्वासित म्हटले. नेहरू यांची अनेक भाषणे आणि लेखन आजही उपलब्ध आहेत. त्यांनी असा कोणताही दावा केल्याचा पुरावा नाही. नेहरू हे धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी अनेकदा भारतीय संस्कृतीतील विविधतेचा आणि सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार केला आहे. हिंदूंना निर्वासित म्हणणे त्यांच्या विचारधारेच्या आणि राजकीय भूमिकेच्या पूर्णपणे विरोधी आहे.
दाव्यात “विदेह गाथा: एक आर्य संन्यासी की डायरी” आणि “नेहरू: उत्थान और पतन” या पुस्तकांचा उल्लेख आहे. मात्र, या पुस्तकांचा कोणताही पुरावा अस्तित्वात नाही.
निव्वळ कपोकल्पित
हा दावा आणि हा फोटो सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळ्या काल्पनिक कथांसह व्हायरल झाला आहे. कधी या फोटोला १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर नेहरूंना जमावाने मारहाण केल्याचे सांगितले जाते. तर कधी स्वामी विद्यानंद विदेह यांनी कानशिलात मारल्याचे सांगितले जाते. हे सर्व दावे खोटे ठरले असल्याचे विविध पडताळण्यांमध्ये स्पष्ट झाले आहे. हा फोटो १९६२ च्या युद्धापूर्वीचा (जानेवारी १९६२) आहे, तर युद्ध ऑक्टोबर १९६२ मध्ये झाले होते, त्यामुळे युद्धाशी संबंधित दावेही खोटे आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा उल्लेख करून “ते पंतप्रधान असते तर…” असे म्हणणेही संदर्भहीन आहे. कारण पटेल यांचे निधन १५ डिसेंबर १९५० रोजी झाले होते. नेहरू १९४७ पासून पंतप्रधान होते. (Pandit Nehru)
इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने त्यावेळच्या घटनेचे वार्तांकन केले आहे. त्यानुसार ५ जानेवारी १९६२च्या काँग्रेसच्या एका बैठकीत गोंधळ झाला. नेहरूंना पाहण्यासाठी लोक पुढे पुढे सरकू लागले. गोंधळ प्रचंड वाढू लागला तेव्हा नेहरू स्वतः उठले आणि जमावाला नियंत्रित करण्यासाठी पुढे जाऊ लागले. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले आणि मागे खेचले. जेणेकरून त्यांनी गर्दीत जाऊ नये. नेहरूंना पाहण्यासाठी गर्दी पुढे सरकत होती. नेहरूंनी आवाहन केल्यानंतर गोंधळ शांत झाला. यावेळी नेहरूंनी गर्दीतील महिला आणि मुलांना पुढे मंचावर येण्यास सांगितले.
यावरून एक गोष्ट लक्षात येते की, सोशल मीडियावरून नेहरूंना बदनाम करण्याची मोहीम आजही मोठ्या ताकदीने सुरू आहे. नेहरूंना बदनाम केले की राहुल गांधींवर हल्ला करणे सोपे जाते. नेहरूंना मुस्लिम किंवा मुस्लिम धार्जिणे ठरवले की काँग्रेसची धर्मनिरपेक्षतेसाठीची लढाई कमकुवत करता येते, असे त्यापाठीमागचे षङ्यंत्र आहे. नेहरूंनी हिंदूंना निर्वासित म्हटल्याचा कोणताही पुरावा नाही. स्वामी विद्यानंद विदेह यांच्याशी संबंधित ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.