गुवाहाटीः आसामचे प्रसिद्ध गायक, संगीतकार झुबिन गर्ग यांच्या सिंगापूरमधील संशयास्पद मृत्यूचे गूढ वाढत चालले आहे. पोलिसांनी शेखरज्योति गोस्वामी आणि अमृतप्रभा महंता या दोन संगीतकारांना अटक केली आहे. आसाम सीआयडीने या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याआधी गर्गचे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे आयोजक श्यामकानू महंता यांनाही अटक झाली आहे. सध्या या गुन्ह्यात चार जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. विशेष तपास पथक आणि सिंगापूर पोलिस संयुक्त तपास करत आहेत. (zubin garg death)
सरकारच्या हस्तक्षेपानंतर दुसरे शवविच्छेदन
सिंगापूरमधील सेंट जॉन्स आयलंडजवळ यॉटवर पोहताना १९ सप्टेंबर रोजी जुबिन गर्ग अचानक बेशुद्ध पडल्याचे सांगितले गेले. सुरुवातीला सिंगापूर पोलिसांनी ही बुडून मृत्यूची घटना असल्याचे सांगितले होते. पण आसाम सरकारच्या हस्तक्षेपानंतर झालेल्या दुसऱ्या शवविच्छेदनात संशयास्पद बाबी उघडकीस आल्या. गर्ग यांच्या पत्नी गरिमा सैकिया गर्ग यांनी तक्रार दाखल केली. झुबिन गर्ग यांना यॉट पार्टीबद्दल काहीच माहिती नव्हती. पतीला जबरदस्ती तिथे नेण्यात आले, अशी तक्रार त्यांच्या पत्नीने केली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत हत्या, कटकारस्थान, निष्काळजीपणे मृत्यू घडवून आणणे असे गंभीर आरोप लावले आहेत. (zubin garg death)
यॉट पार्टीवेळी दुर्घटना
झुबिन गर्ग हे भारत-आसियान पर्यटन वर्ष आणि भारत–सिंगापूरच्या साठ वर्षांच्या राजकीय संबंधांच्या निमित्ताने आयोजित नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी गेले होते. वीस सप्टेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी आयोजकांनी यॉट पार्टी केली होती. उपलब्ध व्हिडिओनुसार, गर्ग यांनी लाईफ जॅकेट घालून पाण्यात उडी मारली, पण काही मिनिटांत जॅकेट काढून टाकले आणि पुन्हा उडी मारली. त्यावेळी यॉटवर १७ जण उपस्थित होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. (zubin garg death)
सिंगापूर पोलिसांनी झुबिन गर्ग यांचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र आसाम सीआयडीने दुसऱ्या शवविच्छेदनाच्या आधारे तपासाचा वेग वाढवला. एसआयटीने सिंगापूर पोलिसांना पत्र लिहिले असून त्यांची टीम लवकरच तिथे जाणार आहे झुबिन गर्ग यांना मिर्गीचा त्रास असल्याने डॉक्टरांनी त्यांना पाणी व आगीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. तरीही आवश्यक खबरदारी न घेता त्यांना यॉटवर नेण्यात आले.
सहा दिवस चौकशीनंतर कारवाई
गुरुवारी अटक झालेले शेखरज्योति गोस्वामी आणि अमृतप्रभा महंता यॉट पार्टीदरम्यान गर्गसोबत होते. गेल्या सहा दिवसांपासून एसआयटीमार्फत त्यांची चौकशी सुरू होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोघांच्या जबाबांमध्ये विरोधाभास आढळला. त्यांना गुवाहाटीत १४ दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. याआधी गर्गचे मॅनेजर शर्मा यांना गुरुग्राममधून तर आयोजक श्यामकानू महंता यांना दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली होती. दोघांनी आसामला परतण्यात उशीर केला आणि सुरक्षेची कारणे सांगितली. पण मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी त्यांना सहा ऑक्टोबरपर्यंत उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता. (zubin garg death)
सीआयडीच्या माहितीनुसार, चौकशीत नवे पुरावे समोर आल्याने हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. सिंगापूरकडून व्हिडिओ व इतर पुरावे मागवले आहेत. गर्ग यांच्या पत्नी गरिमा यांनी सांगितले की, व्हिडिओत स्पष्ट दिसते की लाईफ जॅकेट काढण्याआधीच त्यांना बरे वाटत नव्हते. (zubin garg death)
आसाम सरकारने आयोजक श्यामकानू महंता यांना कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घातली आहे. मुख्यमंत्री सरमा म्हणाले – “आमच्या सांस्कृतिक राजकुमाराच्या मृत्यूबाबत कोणतीही ढिलाई केली जाणार नाही.” तर विरोधी पक्षनेते गौरव गोगोई यांनी मुख्यमंत्री संशयितांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.