कोल्हापूर : प्रतिनिधी : नवरात्रोत्सवाच्या आज सहाव्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची स्कंदमाता रुपातील अलंकार पूजा बांधण्यात आली होती. आज शुक्रवार देवीचा वार असल्याने मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून रात्रीपर्यंत तुडुंब गर्दी केली होती. मुख्य रांग आणि मुखदर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. (Worship of Karvir-nivasini Ambabai in the form of Skandamata)
अंबाबाईची स्कंदमाता रुपातील पूजा बांधण्यात आली. धार्मिक अभ्यासकांनी स्कंदमातेची अशी माहिती दिली आहे की, तारकासूर नावाच्या राक्षसाने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले की, त्याचा वध केवळ भगवान शिवाच्या पुत्राच्याच हाताने होईल. शिवाने सती देवीच्या देहत्यागानंतर कठोर वैराग्य पत्करले होते. त्यामुळे आपल्याला कोणीही मारू शकणार नाही, असा तारकासुराचा समज होता. देवांच्या विनंतीवरून जगदंबेने हिमालयाच्या पोटी शैलपुत्री (पार्वती) म्हणून जन्म घेतला आणि कठोर तपश्चर्या करून शिवाशी विवाह केला. (Worship of Karvir-nivasini Ambabai in the form of Skandamata)
शिव आणि पार्वतीच्या तेजातून एका बालकाचा जन्म झाला, ज्याचे पालनपोषण कृत्तिकांनी केले. त्यामुळे त्याला कार्तिकेय म्हटले गेले. याच पुत्राला पुराणांमध्ये स्कंद (तसेच मुरुगन, सुब्रह्मण्य) या नावानेही ओळखले जाते. देवांच्या सैन्याचा सेनापती म्हणून स्कंदाने तारकासुराचा वध केला. अशा पराक्रमी ‘स्कंद’ बालकाला आपल्या मांडीवर घेऊन त्याचे वात्सल्याने पालनपोषण करणाऱ्या आणि विश्वाला मातृत्वाचे दर्शन घडवणाऱ्या देवीच्या रूपाला ‘स्कंदमाता’ असे नाव मिळाले.
आज बांधण्यात आलेल्या पूजेत स्कंदमाता ही त्रिनेत्रा व चतुर्भुजा असून ” पद्मद्वयविभूषिता ” आहे. देवीच्या वरच्या दोन हातात कमळ, खालील उजवा हात वरदहस्त व डाव्या हातात मांडीवरील बाळाला ( स्कंदाला ) धरलेले आहे, असे हे वरदायी व वात्सल्यपूर्ण ध्यान आहे. स्कंद हा देवगणांचा सेनापती आणि बुद्धीची देवता आहे, असे वर्णन विविध धार्मिक ग्रंथात केले आहे. (Worship of Karvir-nivasini Ambabai in the form of Skandamata)