मेलबर्न : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील चौथी कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याच्या दिशेने कूच केले. भारतासाठी मात्र हा पराभव जिव्हारी लागला असून संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीचा मार्ग अधिक खडतर बनला आहे. (World Championship)
रविवारीच दक्षिण आफ्रिकेने पाकवर विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीतील प्रवेश निश्चत केला. त्यामुळे उर्वरित एका जागेसाठी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये चुरस आहे. सध्या गुणतक्त्यात दक्षिण आफ्रिका अग्रस्थानी असून त्यांच्या गुणांची टक्केवारी ६६.६७ इतकी आहे. दुसऱ्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाची टक्केवारी मेलबर्न कसोटी जिंकल्यानंतर ६१.४६, तर तिसऱ्या स्थानावरील भारताची टक्केवारी ५२.७८ इतकी झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे अद्याप भारताविरुद्ध एक व श्रीलंकेविरुद्ध दोन असे एकूण तीन कसोटी सामने शिल्लक आहेत. भारताचा मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकच सामना बाकी आहे. (World Championship)
भारताला अंतिम फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सिडनी येथे होणारी अखेरची कसोटी जिंकणे आवश्यक आहे. ही कसोटी जिंकल्यास भारताची टक्केवारी ५५.२६ इतकी होईल. तथापि, भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-० किंवा १-० असा विजय मिळवणे आवश्यक असेल. असे झाल्यास ऑस्ट्रेलियाची टक्केवारी अनुक्रमे ५१.७५ व ५३.५१ इतकी खाली येऊ शकते व त्या परिस्थितीत भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित होईल. सिडनी येथील पाचवी कसोटी अनिर्णित राहिल्यास मात्र भारताची टक्केवारी ५१.७५ इतकी होणार असून या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात येणार आहे. (World Championship)
ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरी गाठण्यासाठी उर्वरित तीनपैकी कोणतीही एक कसोटी जिंकणे पुरेसे आहे. त्यांनी तीनही कसोटी अनिर्णित राखल्या, तरीही त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित होईल. तथापि, सिडनी येथे भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यास त्यांना श्रीलंकेविरुद्ध किमान एक कसोटी जिंकणे आवश्यक असेल. (World Championship)
श्रीलंकेलाही अंतिम फेरी गाठण्याची पुसटशी आशा आहे, मात्र त्यासाठी भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानची सिडनी कसोटी अनिर्णित राहावी लागेल. त्यानंतर, ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका २-० अशी एकतर्फी जिंकल्यास श्रीलंकेची टक्केवारी ५३.८५, तर ऑस्ट्रेलियाची टक्केवारी ५३.५१ अशी होईल. परिणामी, श्रीलंका अंतिम फेरीत प्रवेश करेल. (World Championship)