एका बाजूला भारतीय उपखंडातील बहुजनांमधील बहुसंख्य स्रिया या पुरुषांसोबत जमेल तसे कष्टप्रद अर्थार्जन करताना दिसतात तर दुसऱ्या बाजूला श्रीमंत एक टक्का उच्चभ्रू समाजांमधील स्रियासुद्धा “मालकीतील हिस्सेदार” म्हणून संचालक मंडळावर विराजमान झालेल्या दिसतात. बाकी गेली शेकडो वर्षे येथील “संस्कृतीरक्षक” (!) म्हणवणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांमधील स्रिया “घर सांभाळत” राहिल्या ज्या प्रथा, परंपरा, सण व मुलांवरील धार्मिक संस्कारांसाठी जबाबदार धरल्या गेल्या.
डॉ. गिरीश जाखोटिया.
बुद्धीजीवी समाजांमधील स्रिया या फुले दाम्पत्याच्या क्रांतिकारी प्रयत्नांमुळे शिकू लागल्या नि नंतर नोकऱ्याही करु लागल्या. (गमतीचा भाग असा की तथाकथित संस्कारी गप्पा मारणाऱ्या बहुतांश उच्चवर्णीय स्रियांना स्वतःच्या बौद्धिक स्वातंत्र्यासाठी त्या काळात विद्रोह करावासा नाही वाटला !) आजही भारतीय सामाजिक व सांस्कृतिक परीघात स्रीच्या स्वातंत्र्याची चौकट व तिचे स्थान हे बहुतांशी पुरुषाच्या स्वाधीन आहे. ‘पुरूषाशिवाय स्री ही अपूर्ण’ अशीच धारणा आजही (काही मोठी शहरे सोडल्यास) कार्यरत आहे. मजेशीर प्रकार म्हणजे स्रीशिवाय पुरूष मात्र अपूर्ण नसतो ! अर्थात या सर्व व्याख्या, नियम, परंपरा, प्रथा, श्रद्धा या उच्चभ्रू पुरुषांनी साडेतीन हजार वर्षांपूर्वी तयार केल्या जेव्हा त्यांना इथे चातुर्वर्ण्यव्यवस्था रुजवायची होती. स्री म्हणजे वामांगी, कमी बुद्धीमत्तेची, अबला, परावलंबी इ. विशेषणांनी पुरुषरेखित वर्तुळात बंदिस्त केली गेली. पुरुषाच्या तुलनेत मग स्रीचे चारित्र्य खूप नाजुक मानले गेले. उच्चभ्रू पुरुषांनीच लेखन केले की स्री ही स्खलनशील असते. (मनुस्मृती या अन्यायी ग्रंथात अशाच प्रकारचे लेखन दिसते.) यातून योनीशुद्धतेचा आग्रह बळावला. “लिंगशुद्धता”मात्र पावित्र्याच्या अर्थाने पुरुषांनी महत्त्वाची नाही ठरवली. सांडासारखा पुरुष वागू शकतो, किंबहुना अशा वागण्यातच पुरुषार्थ आहे असा भ्रम पसरवला व प्रचलित केला गेला. शुद्ध चारित्र्याचे जोखड स्रियांच्या मानेवर पुरुषांनी असे करकचून बसवले की अग्निपरीक्षा देऊनही तिला राहते घर नि संसार सोडून वनवासाला जावे लागले. स्रियांच्या बाबतीतल्या अनेक निरर्थक व अन्यायी प्रथांचे येथील उच्चवर्णीय पुरुषी चातुर्वर्ण्यव्यवस्थेने कपटाने असे आणि इतके उदात्तीकरण केले की “पुरुषाच्या अधीन राहणे” यातच स्रिया आपल्या जीवनाची इतिश्री मानू लागल्या. माता ही आपल्या पाल्याचा “प्रथम गुरू” असते परंतु ती धार्मिक संस्कारांच्या नावाखाली “तार्किक विश्लेषण” करणे शिकवणार नसेल तर काय उपयोग ? अनुकरणात पटाईत होणारी मुले ही स्वतंत्र किंवा चिकित्सक विचार करेनाशी झाली नि म्हणून भारत “संशोधकीय क्षेत्रा”त मागे पडत गेला. (Women of the Indian subcontinent)
साडेतीन हजार वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात पुरुषांच्या तोडीसतोड स्रिया काम करीत असत. किंबहुना स्थानिक गणसमुहांचे नेतृत्व करणाऱ्या “गणनायिका” या विविध क्षेत्रातील उत्तम निर्णय घेत असत. “निऋती” ही अशीच एक अत्यंत आदरणीय ‘कृषीनायिका’ होती. हिच्याच नावावरून “नैऋत्य” हे एका दिशेचे नाव पडले. याच दिशेत स्रियांचा प्रचंड आदर करणारे केरळ हे आजचे राज्य आहे. चातुर्वर्ण्यव्यवस्थेची सामाजिक कीड लावणाऱ्या अहंकारी पुरुषांनी निऋतीची बरीच अवहेलना करणारे लेखन नंतरच्या काळात केले. निऋतीच्याच ओजस्वी परंपरेतून पुढे आलेल्या द्रौपदीने पांडवांच्या इंद्रप्रस्थ नगरीचे प्रशासन सांभाळले होते. नियोगाद्वारे याच परंपरेतील कुंतीने आपली तीन मुले व माद्रीने दोन मुले होऊ दिली आणि अशा नियोगास पांडू या त्यांच्या पतीने तेव्हा संमती दिलेली होती. कुंतीने आपली व माद्रीची मुले उत्तमरित्या सांभाळली जी “पांडव” म्हणून नंतर विख्यात झाली. यापूर्वी कुरूवंशाला वारसदार मिळावा म्हणून स्रीसत्ताक परंपरेत वाढलेल्या सत्यवतीने आपल्या “द्वैपायन व्यास” (महर्षी व्यास) या विवाहपूर्व झालेल्या पुत्राकडून नियोगाद्वारे आपल्या विधवा सुनांना मुले होऊ दिली होती जी पांडू व धृतराष्ट्र म्हणून ओळखली गेली. ही “स्रीमहत्ता” वर्चस्ववादी पुरुषांनी नंतर कधी लबाडीने तर कधी क्रूरतेने नष्ट केली. तरीही या स्रीवादी संस्कृतीची जनुके भारतीय उपखंडाच्या मातीत तग धरून राहिली. याच जनुकांचा परीपाक म्हणून हिंदू, बौद्ध किंवा इस्लाम अशा धार्मिक संदर्भांच्या पलिकडे जाऊन भारत, श्रीलंका, पाकिस्तान व बांगलादेशच्या प्रधानमंत्री या महिला होत्या, हा अनुभव आम्ही घेतलाय. “स्री – पुरुष समानता” पाळणाऱ्या प्रगत अमेरिकेचा अध्यक्ष मात्र अजूनही एक स्री झालेली नाही, हे अनाकलनीय वास्तव आम्ही दुसऱ्या बाजूला पाहतो.
भारतीय उपखंडात सर्वत्र असणाऱ्या छोट्या गणसमुहांमध्ये महावैज्ञानिक शंकराची व त्याच्या जीवनोपयोगी संशोधन करणाऱ्या सहकाऱ्यांची खूप महती होती. या शंकराची अर्धांगिनी होती “पार्वती”. स्री – पुरुष समानतेचे प्रतीकात्मक प्रगटीकरण करणाऱ्या “शिवलिंगा”ची अध्यात्मिक थोरवी ही आसेतुहिमाचल प्रस्थापित होत गेली. “पुरुष – प्रकृती” अशी मांडणी करणाऱ्या नास्तिक कपिल मुनींनी आपल्या सांख्य तत्वज्ञानाद्वारे शिवशक्तीचाच संदर्भ त्या काळात घेतला असणार. शिव आणि शक्ती हे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत अशी “एकात्मिक मांडणी” नंतर केली जाऊ लागली. चातुर्वर्ण्यव्यवस्था स्थापित करणाऱ्या उच्चवर्णीय पुरुषांनी आस्तेकदम ही “Gender Equality” संपवली आणि स्रीला अगदी दुय्यम स्थान देऊ केले. अधेमधे ही मंडळी आपली स्रीविरोधी कपटकारस्थाने झाकण्यासाठी स्रीबद्दलची अगदी अपवादात्मक आदरार्थी उदाहरणे सांगत राहतात परंतु रोजच्या व्यवहारात स्री ही “पुरुषावलंबीत”च ! लेखन – संभाषण – संबोधन इ. सर्व प्रकारांद्वारे स्रीचे गौणत्व या पाखंडी पुरूषांनी पुनःपुन्हा अधोरेखित केले. नवरा आपल्या बायकोला एकेरी हाक मारणार नि बायको मात्र नवऱ्याला आदरार्थी (अहो) संबोधणार. स्रियांची महती समजू नये म्हणून वंश, कुळ, कौटुंबिक प्रमुखांचे संदर्भ, गोत्र, आचार्यांचे संदर्भ, प्रमुख मानले गेलेल्या ईश्वराचे नानाविध उल्लेख हे सर्व “पुरूषी” होऊ लागले. यातूनच पुढे ‘खानदानी स्री’ म्हणजे “सदोदितपणे आपल्या नवऱ्याला समर्पित असणारी बायको आणि नवऱ्याच्या कुटुंबियांसाठी सर्व काही माहेरी सोडून येणारी व स्वतःचे नावही बदलून घेणारी मर्यादशील महिला” अशी व्याख्या आचरणात आणण्यात आली. मनुस्मृतीमध्ये स्रीने आयुष्यभर पुरूषाच्या अधीन असावे असे आग्रही प्रतिपादन केले आहे. बालपणी आपला पिता, नंतर पती आणि शेवटी पुत्र, अशा पुरुषांच्याच आधारे तिने जगले पाहिजे, हा मनुस्मृतीचा अट्टहास. थोडक्यात असे की स्रीचे स्वतंत्र असे अस्तित्वच नाही. विधुर पुरुष प्रत्येक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सन्मानाने भाग घेऊ शकतो परंतु विधवेने मात्र अलिप्तपणे जगले पाहिजे, ही प्रथा पुरुषी दुढ्ढाचाऱ्यांनी अशी स्रियांच्या गळी उतरवली की मूर्ख स्रिया अशा अन्यायी प्रथांना “धर्मसंमत” मानू लागल्या. पुन्हा धर्माची व्याख्या कोण करणार – तर हेच तथाकथित संस्कृतीरक्षक वर्चस्ववादी पुरूष ! सुदैवाने हिंदू समाजामध्ये अनेक मातब्बर सुधारक नंतर होऊन गेल्याने स्रियांची स्थिती काही अंशी सुधारत गेली. इस्लाममध्ये मात्र पुरेसे सुधारक नसल्याने काही अपवाद सोडता “पुरूषी वर्चस्व” वेगवेगळ्या प्रकारे आजही कार्यरत आहेच. (Women of the Indian subcontinent)
“ऋषीचं कूळ नि नदीचं मूळ शोधू नये” अशी एक लबाडीची म्हण इथे प्रचलित करण्यामागे स्रियांचे वांशिक योगदान नाकारण्याचाच अमानवी हेतू होता. महर्षी व्यासांची आई ‘सत्यवती’ ही बहुजन समाजातील होती. द्रोणाचार्यांची आई ‘घ्रिताची’ सुध्दा अशीच. वंश – जात – धर्म इ. बाबींची ओळख ही वडिलांकडून ठरलेली. आजही मी पाहतो की काही ‘मूर्ख’ शिकले – सवरलेले पुरुष हे ‘मुलगा’ हवा म्हणून अपत्यांवर अपत्ये होऊ देतात. काही दुसरा विवाह करतात. काही बायकोलाच दोष देतात. अपत्याचे लिंग बाप ठरवतो, आई नाही. हे वैज्ञानिक सत्य माहीत असूनही “चूल नि मूल” म्हणत बाईला ‘फक्त जननी’ मानणारी विचित्र संस्कृती आजही उत्तर भारतीय पट्ट्यात कार्यरत आहे. कट्टरपंथी उच्चवर्णीय पुरुषांनी धार्मिक परंपरांच्या नावाखाली नंतर इतका हैदोस घालायला सुरुवात केली की सतीप्रथा, बालविवाह, केशवपन इ. अनेक स्रीविरोधी भयंकर गोष्टी इथे रुजवल्या गेल्या. आपले प्राथमिक मानवी अधिकार मागणाऱ्या स्रियांना कपटाने “धर्मविरोधी” ठरवले जाऊ लागले. एखादा विवेकी पुरुष आपल्या बायकोच्या विवेकी विचारांना मान्यता देऊ लागला की त्या कुटुंबाला जातीबाहेर काढण्याची धमकी मिळू लागली. कट्टरपंथी पुरूषांची जातपंचायत स्रियांचे सामाजिक – सांस्कृतिक स्थान ठरवू लागली. पंचायतीतले हे अनाडी महाभाग सोयीस्कर अंधश्रद्धांना स्रियांच्या माथी मारु लागले. या साऱ्या “कपट रचनां”मध्ये जातीच्या उतरंडीनुसार पुरुषांचे फायदे बघितले जाऊ लागले. उच्चवर्णीय स्रिया या खालच्या वर्णातील स्रियांपेक्षा आपण वरच्या स्थानावर आहोत यावर समाधान मानून पुरुषकेंद्रित अशा आपापल्या वर्तुळात सारं जीवन कंठू लागल्या. प्रत्येक स्रीला एक स्वतंत्र व्यक्तीमत्व असू शकतं ही अगदी नैसर्गिक बाबच अमान्य केली गेली. यामुळेच युधिष्ठीराने द्रौपदीला द्युतात पणास लावण्याचा अपराध केला. “स्री ही पुरुषाच्या अधीन असणारी मालमत्ता आहे” हे तेव्हाचे अन्यायी धर्मसूत्र मानत मग भीष्म, द्रोणाचार्य व कृपाचार्य हे मूढ द्रौपदीची विटंबना पहात बसले. स्रीसत्ताक संस्कृतीतून आलेल्या द्रौपदीच्या तर्कनिष्ठ प्रश्नांची उत्तरेही या मूढांना देता नाही आली. (Women of the Indian subcontinent)
युरोपीय – उत्तर आशियाई संस्कृतीमधील तीन वर्णांमध्ये शूद्र या अगदी खालच्या वर्णाची भर घालून चातुर्वर्ण्यव्यवस्थेच्या रचनेत “स्री” ही नगण्य ठरवली गेली. प्रतिलोम – अनुलोम अशा आंतर्जातीय विवाहांना निषिद्ध मानताना सर्व वर्णातील स्रिया व खालच्या वर्णातील पुरुषांना (विशेषतः शूद्रांना) गंभीर अपराधी मानले गेले. ही अमानवी रचना मांडण्यात मनुस्मृती हा ग्रंथ आघाडीवर होता. युरोपीय धाटणीचे राजा, राणी व राजकुमार जेव्हा इथे आणले गेले तेव्हा या ‘रॉयल फॅमिली’ची सेवा करायला शूद्र स्रियांचा “दासी” म्हणून उपयोग सुरू झाला. महर्षी व्यासांपासून नियोगाने उत्पन्न झालेल्या दासीपुत्र विदुराला मात्र तो हुशार व सज्जन असूनही उच्चवर्णीय पुरुषी वर्चस्व गाजविणाऱ्या कौरवांच्या परीघात हेटाळणीच नशिबी आली. गमतीचा भाग म्हणजे ‘कुरुवंशीय’ रक्ताचे यापैकी कुणीही नव्हते. निष्कर्ष असा की स्रियांना कस्पटासमान मानत वर्णाभिमानी पुरुषांनी वेळोवेळी ‘सवडशास्र’ वापरले व त्यांस फसव्या तत्वज्ञानाचा मुलामा चढवला. या वर्णाभिमानी पुरूषांची ऐतिहासिक – सांस्कृतिक पार्श्वभूमी ही युद्धावधारीत असल्याने यांनी आपल्या बहुतेक देवदेवतांच्या हाती शस्रे सोपवली. परावलंबी स्रियांच्या समाधानासाठी अधेमधे टोकनीजम वापरीत “स्री ही शक्तीरुपा” आहे असे पालूपद हेच पुरुष विविध अवडंबरांच्या माध्यमातून आळवीत राहिले. प्रत्यक्षात मात्र कोणत्याही निर्णयप्रक्रियेत स्रियांची भूमिका आणि सहभाग हा दुय्यमच. यांच्या लेखी ‘देवता’ सुद्धा ‘देवा’च्या तुलनेत द्वितीय स्थानी. अगदीच कधी ‘समर्पणा’चा उल्लेख अधूनमधून केला गेला ज्यामुळे स्रियांना आपले आयुष्य धन्य धन्य झाल्याची खात्री पटावी. पुरुषी वर्चस्व पुढे नेताना या मंडळींनी स्रियांबाबतीत चुकीची भूमिका घेणाऱ्या आपल्याच ‘पुरुष नायकां’ना आदरणीय बनवले नि या आदराचे समर्थन करणारे भरपूर लेखनही केले. या लेखनाचेच नंतर “संस्कृतीजन्य तत्वज्ञान” म्हणून नामाभिधान केले गेले जे आजपर्यंत अनेक सुशिक्षित उच्चवर्णीय स्रियांनी मानले, स्विकारले नि आचरणातही आणले.
चातुर्वर्ण्यव्यवस्थेतील कट्टरपंथी पुरुषांनी केलेल्या भारतीय स्रियांच्या उपमर्दाचा प्रखर विरोध पौराणिक संदर्भानुसार कृष्णाने केला होता कारण यदुवंशाची पार्श्वभूमी ही मातृसत्ताक होती. नंतरच्या ज्ञात इतिहासात बव्हंशी वैज्ञानिक विचारांची बैठक मानणाऱ्या जैन व बौद्ध या दोन तत्वज्ञानांमध्ये मानवी संबंधांचे सुलभीकरण करताना स्री – पुरुष समानता मानली गेली. अर्थात भारतीय उपखंडातील कट्टरपंथी पुरुषी रचना या दोन्ही विचारधारांसमोर अधिक आक्रमक ठरली. बाराव्या शतकात संत बसवण्णांनी स्री – पुरुष असमानता नाकारली. त्यांच्या स्रीवादी कार्यात अक्कमहादेवी ही शिष्या आघाडीवर होती. सतराव्या शतकात संत तुकारामांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्रीचे सर्व क्षेत्रांमधील महत्त्व अधोरेखित केले. याबाबतीत दृश्य इतिहासातील अत्यंत आदरणीय व्यक्तीत्व म्हणजे माता जिजाऊ. नंतर अहिल्याबाई होळकर आणि भारतीय स्रीवादाच्या प्रथम जनक सावित्रीबाई फुले या लढाऊ स्रीनायकांनी स्रियांच्या एकूणच ओजस्वी स्वातंत्र्याला असिमीत केले. अर्थात त्या त्या काळातील समाजोद्धारक पुरुष नायकांची यांना सार्थ साथ मिळाली. स्रियांचे सर्व स्थरांवरील मानवी स्वातंत्र्य व अधिकार अगदी स्पष्टपणे अधोरेखित केले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. “हिंदू कोड बिल” हे भारतीय उपखंडातील स्रियांच्या एकूण उन्नतीचे देदीप्यमान दस्तावेज ठरले ! आज भारतीय स्रिया सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने पराक्रम गाजवताहेत. डॉ. रुखमाबाई राउत, डॉ. आनंदीबाई जोशी, अरुणा असफअली, महादेवी वर्मा, इरावती कर्वे, दुर्गा भागवत ते अगदी अलिकडच्या कल्पना चावला – या महान भारतीय स्रियांची यादी वाढतच जाणारी आहे. अर्थात अजूनही मोठी वाटचाल बाकी आहेच !