महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानविरुद्धच्या मुलतान कसोटीत इंग्लंडच्या जो रूटने शतक झळकावले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे ३५ वे शतक होते. या शतकासह रूटने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. तो इंग्लंडचा कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला, तर तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला. रुटचा कसोटीतील उत्कृष्ट फॉर्म कायम आहे आणि तो महान सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडेल असा अंदाजही क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत. (Joe Root)
रूटने आठ महिन्यात झळकावली पाच कसोटी शतके
फेब्रुवारी महिन्यात रांचीत भारत आणि इंग्लंड यांच्यात रांची येथे झालेल्या कसोटी सामन्यात रूटने नाबाद १२२ धावांची खेळी केली होती. यानंतर त्याने जुलैमध्ये ट्रेंट ब्रिज येथे वेस्ट इंडिजविरुद्ध १२२, ऑगस्टमध्ये लॉर्ड्सवर श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही डावात १४३ आणि १०३ धावांची खेळी केली होती. विराटने डिसेंबर २०१८ साली पर्थ येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात १२३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २५४ धावा आणि नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध १३६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने मार्च २०२३ मध्ये अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८६ धावा आणि जुलै २०२३ मध्ये क्वीन्स पार्क ओव्हलमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १२१ धावा केल्या. म्हणजेच विराटने सहा वर्षांत पाच शतके झळकावली, तर रुटने आठ महिन्यात पाच शतके झळकावली.
एकाचवेळी या चार दिग्गजांना टाकले मागे
रुटने पाकिस्तानविरूद्ध कसोटीतील हे ३५ वे कसोटी शतक झळकावले. इंग्लंडकडून सर्वाधिक शतके झळकावणारा तो फलंदाज आहे. यासह कसोटीमध्ये सर्वाधिक शतके झळकवण्याच्या बाबतीत सहाव्या स्थानावर आहे. या यादीत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडलूकर ५१ शतकांसह अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानी ४५ शतकांसह जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग ४१ शतकांसह तिसऱ्या, कुमार संगकारा ३८ शतकांसह चौथ्या आणि राहुल द्रविड ३६ शतकांसह पाचव्या स्थानावर आहे. मुलतान कसोटीत शतक झळकावून रूटने सुनील गावस्कर, ब्रायन लारा, महेला जयवर्धने आणि युनूस खान यांना मागे सोडले. चौघांनीही कसोटीत ३४-३४ शतके झळकावली होती. (Joe Root)
इंग्लंडबाहेर १४ शतके
घराबाहेर सर्वाधिक कसोटी शतके झळकावणाच्या बाबतीत रुट ॲलिस्टर कुकनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडबाहेर त्याच्या नावावर १४ कसोटी शतके आहेत. या बाबतीत त्याने माजी क्रिकेटर केन बॅरिंग्टनची बरोबरी केली. कुकने घराबाहेर १८ कसोटी शतके झळकावली होती.
यावर्षी कसोटीत रुटने १२ सामन्यांच्या २१ डावांमध्ये ११०० हून अधिक धावा केल्या आहेत. यात त्याची सरासरी ६१.३८ इतकी आहे. पाच शतकांव्यतिरिक्त त्याने चार अर्धशतकेही झळकावली आहेत. या कॅलेंडर वर्षात श्रीलंकेच्या कमिंडू मेंडिसने कसोटीत तितकीच शतके झळकावली आहेत. मेंडिसनेही पाच शतके झळकावली आहेत. त्याने सात कसोटी सामन्यांच्या १२ डावात ९४.३० च्या सरासरीने ९४३ धावा केल्या आहेत.
पाच शतकांव्यतिरिक्त मेंडिसच्या नावावर तीन अर्धशतकेही आहेत. भारताचा यशस्वी जैस्वाल यावर्षी कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आठ कसोटी सामन्यांच्या १५ डावात ९२९ धावा केल्या आहेत. या काळात त्याने दोन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली आहेत. तर, या यादीत विराट कोहली खूप मागे आहे. कोहलीने यावर्षी तीन कसोटी सामन्यांच्या सहा डावात ३१.४० च्या सरासरीने अवघ्या १५७ धावा केल्या आहेत. (Joe Root)
रूटने २०१३ ते २०२० पर्यंत कसोटीत १७ शतके झळकावली होती, तर २०२१ ते २०२४ पर्यंत त्याने एकूण १८ कसोटी शतके झळकावली आहेत. कसोटीमध्ये एका कॅलेंडर वर्षात पाच किंवा त्याहून अधिक शतके झळकावण्याचा पराक्रम रुटने तिसऱ्यांदा केला आहे. या बाबतीत त्याने जॅक कॅलिस आणि स्टीव्ह स्मिथची बरोबरी केली आहे. एका कॅलेंडर वर्षात पाच किंवा अधिक कसोटी शतके झळकावण्याचा विक्रम मॅथ्यू हेडन आणि रिकी पाँटिंग यांच्या नावावर आहे. या दोघांनी प्रत्येकी पाच वेळा अशी कामगिरी केली आहे. रूटने ऑस्ट्रेलिया वगळता जगाच्या कानाकोपऱ्यात कसोटी शतके झळकावली आहेत, जिथे त्याने चार किंवा अधिक कसोटी खेळल्या आहेत. रूटने ऑस्ट्रेलियात 14 कसोटी सामने खेळले असून त्यात एकही शतक झळकावलेले नाही.
&
He keeps on climbing 📈 pic.twitter.com/pcupd52LI8
— England Cricket (@englandcricket) October 9, 2024
nbsp;
हेही वाचा :
- महाराष्ट्र महिला फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी कोल्हापूरच्या आर्या मोरेची निवड
- आजपासून पावसाचा जोर वाढणार
- अंबाबाईची महाप्रत्यांगिरा देवी रुपात पूजा