Home » Blog » Vaishanavi Hagavane Tragedy: वैष्णवीची आत्महत्या आणि मरणोत्तर राजकारण

Vaishanavi Hagavane Tragedy: वैष्णवीची आत्महत्या आणि मरणोत्तर राजकारण

by प्रतिनिधी
0 comments
Vaishanavi Hagavane Tragedy

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे रोजी वैष्णवी शशांक हगवणे या विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची वैष्णवी ही सून होती. सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ केल्यामुळे वैष्णवीने आत्महत्या केल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य वाढले आणि या प्रकरणामुळे महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण आणि समाजकारण हादरून गेले. (Vaishanavi Hagavane Tragedy)

  • विजय चोरमारे

न्यायालयात हगवणे कुटुंबीयांमार्फत याप्रकरणी वकिलांनी केलेल्या युक्तिवादाने हा वाद नव्या वळणावर पोहोचला आहे. हयातीत तिचा छळ करणाऱ्या लोकांनी वैष्णवीच्या मृत्यूपश्चात तिचे चारित्र्यहनन सुरू केले असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.

वकिली व्यवसाय आहे ! आणि वकिलांनी जर सत्याची बाजू लढायची ठरवली तर निम्मे पक्षकार न्यायापासून वंचित राहतील! आणि ज्यांना खरोखरच न्यायाची गरज आहे असेही अनेक लोक न्यायापासून वंचित राहतील. (Vaishanavi Hagavane Tragedy)

डॉक्टरांप्रमाणेच वकिलांनासुद्धा त्यांच्याकडे आलेल्या क्लाएंटला नाही म्हणण्याची सूट नाही! जसे डॉक्टर Hippocratic Oath ला म्हणजे वैद्यकीय नैतिकता आणि जबाबदारीला बांधील असतात! तसेच वकीलसुद्धा वकिली व्यवसायाच्या नीतिमत्तेला बांधील असतात! त्यामुळे त्यांच्याकडे आलेल्या पक्षकारांना योग्य तो सल्ला देणे, त्यांची बाजू निर्भीडपणे मांडणे हे त्यांचे कर्तव्य आहे. ही गोष्ट खरी आहे. परंतु तरीसुद्धा त्यांना काही सामाजिक बंधने असावीत की नाही, असा प्रश्न अलीकडच्या काही घटनांवरून निर्माण झाला आहे.

वैष्णवी हगवणेच्या वकिलाच्या संदर्भाने हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

हगवणे कुटुंबीयांची वृत्ती समोर आली आहे. त्यांचा सामाजिक व्यवहार समोर आला आहे. दोन्ही सुनांच्यासंदर्भात त्यांनी केलेले वर्तन समाजासमोर आले आहे. एका सुनेने – वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्यानंतर म्हणजे तिच्या मृत्यूनंतर जाहीरपणे प्रसारमाध्यमांसमोर तिचे चारित्र्यहनन करण्याचा अधिकार वकिलांना मिळतो का? (Vaishanavi Hagavane Tragedy)

हा प्रश्न वकिलांच्या संदर्भाने मर्यादित नाही. प्रसारमाध्यमांशीही संबंधित असा हा प्रश्न आहे. कोणत्याही गुन्हेगारीविषयक घटनेनंतर पोलिस तपास हा थ्री डब्ल्यूच्या अनुषंगाने तपास सुरू असतो. म्हणजे वाईन, वेल्थ आणि विमेन. म्हणजे मद्य, संपत्ती आणि स्त्री. संपत्तीचा वाद आणि स्त्री-पुरुष संबंध हे प्रमुख भाग असतात. तो पोलिस तपासाचा भाग असतो. परंतु दरम्यानच्या काळात अनेक प्रसारमाध्यमे तशा शक्यता व्यक्त करून व्यक्त होतात. त्यातून संबंधित व्यक्तिसंदर्भात संशय निर्माण होतो. संबंधितांच्या नातेवाईकांसाठी मृत्यूपेक्षा ते भयंकर वेदनादायक असते. परंतु प्रसारमाध्यमांमधील स्पर्धा त्यांना या पातळीवर घेऊन जाते. डिजिटल माध्यमांमध्ये तर क्लिकबेट्सचा खेळ असतो त्यामुळे तिथे सगळ्या मर्यादा पार केलेल्या असतात. संवेदनशील प्रकरणामध्ये प्रसारमाध्यमे अत्यंत हीन पातळीवर काम करतात. सभ्यतेचे संकेत, मर्यादा काही पाळल्या जात नाहीत. जी गत प्रसारमाध्यमांची आहे, तीच गत वकिलांची आहे. वकिलांनी आपल्या अशिलाला वाचवण्यासाठी युक्तिवाद करावा. परंतु जाहीरपणे मृत व्यक्तिचे चारित्र्यहनन करू नये, एवढे तरी संकेत पाळायला हवेत. (Vaishanavi Hagavane Tragedy)

पतीने रागाच्या भरात पत्नीला मारणे हा कौटुंबिक हिंसाचार ठरत नाही, असा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा संदर्भ देऊन वकिलांनी केला आहे. ज्या विवाहितेचा मारहाणीमुळे मृत्यू झाला, तिच्यासंदर्भात असा युक्तिवाद करणे हा निर्लज्जपणाचा कळस म्हणावा लागेल.

एकीकडे राजकारणातील महिला नेत्यांनी विषयाचे गांभीर्य सोडून नळावरच्या भांडणाप्रमाणे एकमेकींची उणीदुणी काढून प्रकरणाचे गांभीर्य घालवले आहे. त्यात वकिलांनी ताळतंत्र सोडल्यामुळे आपण नेमके कुठे चाललो आहोत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी संपूर्ण हगवणे कुटुंबीयांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कोठडीच्या संदर्भाने कोर्टात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान हगवणे कुटुंबाच्यावतीने त्यांच्या वकिलांनी वैष्णवीवर गंभीर स्वरुपाचे आरोप केलेत. हगवणे कुटुंबाचे वकिल विपुल दुशिंग यांनी थेट वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत. आपल्या अशिलाला वाचवण्यासाठी कोर्टापुढे युक्तिवाद करणे आणि बाहेर येऊन प्रसारमाध्यमांसमोर बोलणे यात काही एक मर्यादांचे भान वकिलांनी ठेवायला हवे. परंतु ते भान इथे ठेवलेले दिसत नाही.

हे पहिल्यांदाच घडले आहे असे नाही. स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर बलात्कार झाला तेव्हासुद्धा आरोपीच्या वकिलांनी संबंधित तरुणीवर आरोप केले होते. परस्पर संमतीने गोष्टी घडल्याचे जाहीरपणे सांगितले होते. आणि स्वारगेटच्या घटनेमुळे सरकारची पुरती नाचक्की झाली असल्यामुळे सत्ताधारी मंडळींनी त्याचाच आधार घेतला होता. आता हगवणे कुटुंबाचे प्रकरणही अजितदादांच्या पक्षाच्या पुढाऱ्यांशी संबंधित आहे. स्वारगेटच्या प्रकरणावेळी अजितदादांच्या पक्षाच्या एका महिला पदाधिकाऱ्याने अत्यंत बेजबाबदारपणे संबंधित तरुणीवर बलात्कार झाला नाही, तर ते परस्पर संमतीने आर्थिक व्यवहार ठरवून प्रकरण जाहीरपणे सांगितले होते. खरेतर संवेदनशील प्रकरणात महिला नेत्या-कार्यकर्त्यांकडून संवेदनशील आणि जबाबदार व्यवहाराची अपेक्षा असते. दुर्दैवाने राजकारणातल्या या महिला असे काही निमित्त सापडले की आपले जुने हिशेब चुकते करायच्या मागे लागतात. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्राने महिला नेत्यांचे सुमार राजकारण पाहिले. एकीकडे स्त्रियांच्या संदर्भात कायद्यानुसार अनेक आचारसंहिता आहेत. तरीसुद्धा स्त्रियांच्या चारित्र्यहननाचे प्रकार निर्लज्जपणे घडत आहेत. आपली सामाजिक संवेदना बोथट झाल्याचे आणि राजकारणाच्या गटारगंगेत आपण वाहात चालल्याचेच हे निदर्शक आहेत. हगवणे कुटुंबाचा न्याय न्यायालयात होईल, परंतु प्रचंड छळ सहन करून जीव गमावलेल्या वैष्णवीची मरणोत्तर बदनामी करून, चारित्र्यहनन करून संबंधित वकिलांनी काय साधले? हा प्रश्न उरतोच. (Vaishanavi Hagavane Tragedy)

हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीच्या संदर्भाने बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. मात्र हगवणेंच्या वकिलांनी केलेले सगळे दावे वैष्णवी कस्पटेच्या वडिलांनी फेटाळून लावले आहेत. वैष्णवीच्या कुटुंबाकडे हगवणेंनी कोणतीही मागणी केलेली नव्हती. त्यांनी स्वखुशीनं त्यांच्या लेकीला भेटवस्तू दिल्या, असा दावा हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांनी न्यायालयात केला. तो दावा वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी खोडून काढला.

वैष्णवी कुणासोबत तरी चॅटिंग करत होती. तिचं चॅटिंग पकडण्यात आलेलं होतं, असा दावा हगवणेंचे वकील दुशिंग यांनी केला. मुलीच्या चारित्र्यावर बोलणं हगवणेंना शोभत नाही, असं प्रत्युत्तर कस्पटे यांनी दिलं. ‘त्या वकिलांलादेखील पोरीबाळी असतील. त्यांच्या घरी लेकी असतील. त्यांनी माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नये. माझं लेकरु आता या जगात नाही. ते कधीच परत येणार नाही. किमान तिचं चारित्र्यहनन करु नका. तिची बदनामी थांबवा,’ अशी विनंती कस्पटे यांनी हात जोडून केली.

हगवणे कुटुंबाकडे पाच कोटींच्या कार आहेत. त्या गाड्यांना कोणी हातही लावत नाही. ते कशाला कस्पटे कुटुंबाकडे फॉर्च्युनर मागतील, असा सवाल वकील हगवणेंच्या वकिलांनी न्यायालयात उपस्थित केला होता. त्यावर हगवणे कुटुंबाकडे एकच कार आहे आणि ती मी दिलेली आहे. त्यांच्याकडे असलेली दुसरी कार त्यांची नाही. ती चंद्रकांत बुचडे नावाच्या व्यक्तीची आहे, असं वैष्णवीचे वडील म्हणाले. वैष्णवीच्या सासरच्या मंडळींनी लग्नात ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर कार मागितली. आम्ही त्यांना एमजी हेक्टर कार देणार होतो. त्या कारसाठी बुकिंगदेखील केलं होतं. पण ही बाब समजताच शशांक संतापला. मला फॉर्च्युनरच हवी. हेक्टर दिलीत तर ती कार पेटवून देईन, अशी धमकी त्यानं दिली. मग मी हेक्टरचं बुकिंग रद्द केलं. त्यांच्याकडून मला बुकिंगची रक्कम परत करण्यात आली, असा घटनाक्रम सांगत कस्पटेंनी पैसे परत आल्याची पावतीदेखील दाखवली. प्रकरण खूप गंभीर आहे. हुंड्यासाठीच्या छळाचे आहे. माणुसकीला काळिमा फासणारे आहे. माणसांतील श्वापदांचे दर्शन घडवणारे आहे. राजकारण करून प्रकरणाचे गांभीर्य कमी केले जाऊ नये, एवढीच अपेक्षा.


You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00