Home » Blog » व्हायरल क्लिपमधील आवाज आमचा नाही

व्हायरल क्लिपमधील आवाज आमचा नाही

नाना पटोले, सुप्रिया सुळे यांचा भाजपावर घणाघात

by प्रतिनिधी
0 comments
Nana Patole Nana Patole file photo

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या पूर्व रात्री भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी बिटकॉइन प्रकरणात एका कथित माजी आयपीएस अधिकाऱ्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप जारी करून खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पटोले आणि सुळे यांनी हे आरोप फेटाळून लावले. या क्लिपमधील आवाज आपला नसल्याचे जाहीर करीत याप्रकरणी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

विधानसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्याने भाजपाकडून आमची बदनामी करण्यासाठी हे कुभांड रचल्याचा आरोपही त्यांनी केला. माध्यमांनी याबाबत योग्य वार्तांकन करावे. विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पटोले यांनी दिला आहे.

पटोले म्हणाले की, मतदानाच्या दिवशी माध्यमांना हाताशी धरून बिटकॅाईन प्रकरणी माझ्यावर खोटे आरोप करून काँग्रेस पक्षाची व माझी बदनामी करण्याचा खोडसाळपणा भाजपाने केला आहे. माध्यमांनी या प्रकरणाची व्यवस्थित माहिती घेऊन वार्तांकन केले पाहिजे. दुर्देवाने भाजपच्या इशाऱ्यावर  खोडसाळपणे आमची बदनामी करण्याचा प्रयत्न काहीजणांकडून सुरु आहे तो माध्यमांनी तत्काळ थांबवावा अन्यथा खोट्या बातम्या देणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही .

सुप्रिया सुळे यांनीही आपल्यावरील आरोपाचा इन्कार करताना म्हणाल्या की, निवडणुकीत पराभव दिसत असल्याने भाजपाकडून जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. राज्यात आणि देशात त्यांचे सरकार असताना ते या प्रकरणाचा सविस्तर तपास का करत नाहीत?, त्या कथित संभाषणातील आवाज हा माझा नाही. आपण कोणत्याही चौकशीला आपण तयार आहोत. विनोद तावडे पैसे वाटप प्रकरणामुळे भाजपाचा खरा चेहरा समोर आल्याने ते लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असले प्रकार करत आहेत याचा आरोपी त्यांनी केला.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00