जमीर काझी : मुंबई : राज्यात पाण्याचा गंभीर प्रश्न असताना राज्य सरकार केवळ पक्ष आणि आमदार-खासदार फोडण्यात व्यस्त आहे. त्यांना जनतेच्या समस्याबाबत काहीही देणेघेणे राहिलेले नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शुक्रवारी केली.
पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जिल्हास्तरावर काही बदल करण्यात येणार आहेत. पक्ष पुन्हा एकदा नवीन जोमात उभा करण्याकरिता पक्ष संघटनेत लवकरच बदल करण्यात येणार असून त्यानंतर राज्यभर दौरा केला जाणार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्व घटक पक्षांनी एकत्रित आंदोलन आणि संयुक्त दौरे करावेत, अशी सूचना आपण केल्याचे त्यांनी सांगितले. केवळ निवडणुकीपुरते नव्हे, तर सातत्याने एकत्रितपणे जनतेसमोर जाणे गरजेचे आहे,असेही शिंदे यांनी सांगितले. (Shashikant Shinde criticizes the government)
पत्रकारांना दाबण्याचा प्रयत्न
संजय दिना पाटील यांच्या पत्रकारांवरील केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर ते म्हणाले की, सत्तेची धुंदी चढल्यानंतर काही जण कोणालाही न जुमानणारी भाषा वापरतात. पत्रकारांनाही दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संजय राऊत बॉम्ब किंवा मारून टाकण्याची भाषा करत नाहीत. मात्र सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांकडूनही अशा प्रकारची वक्तव्ये होत आहेत, आमदार रोहित पवार यांचे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी होते. मंत्री गिरीश महाजन यांनी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्यावर दबाव आल्यामुळे बैठक झाली नसावी, असे सांगून शिंदे म्हणाले की,राम मंदिराच्या नावावर राजकारण होत असल्याचा आरोप करत त्यांनी मंदिरासाठी जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीचा हिशोब सार्वजनिक करावा. (Shashikant Shinde criticizes the government)
आमच्या खासदारांचे ऑपेरेशन होणार नाही : निलेश लंके
ठाकरे गटाच्या खासदाराच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या खासदारांनाही फोडण्यात येणार असल्याच्या चर्चेबाबत खासदार निलेश लंके म्हणाले की, ‘पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई यांच्या नेतृत्ववात आम्ही कामं करतो. आमचे चालक शरद पवार साहेब असून ते आम्हाला सुरक्षित ठेवतील, त्यामुळे आमच्या पक्षाच्या खासदारांचे ऑपेरेशन कधीही होणार नाही, असे सांगितले
खासदार निलेश लंके बोलताना म्हणाले की, खासदारांच्या चुका ज्या घडल्या त्यामुळे ते जनतेसमोर येत नाहीत.आम्ही कायम बोलतो, पवार साहेबांबरोबर आम्ही कायम असणार आहोत, असेही खासदार निलेश लंके म्हणाले.
खासदार निलेश लंके म्हणाले की,संसदेत कामकाज करत असताना,आम्ही सगळे एकत्र असतो, विकासकामांसाठी कोण सत्तेत आणि विरोधात आहे त्याचा विचार केला जातो पण विकासनिधी मिळत नसेल तरी,मी काम करणारा कार्यकर्ता आहे, निधी खर्च करण्यापेक्षा विकासकामे प्रत्यक्ष पूर्ण करण्यावर माझा भर असतो, असेही खासदार निलेश लंके यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.