सतीश घाटगे : कोल्हापूर : राज्यात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत पदाधिकारी निवडीत भाजपची साम,दाम, दंड, भेद, निती सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीतही भाजपने राष्ट्रवादीवर दबाव ठेवला होता. पण भाजपचा प्रचंड दबाव असतानाही जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावण्यात मंत्री हसन मुश्रीफ यशस्वी झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदचे अध्यक्षपद शिल्पा शशिकांत खोत यांच्या निवडीने खेचून आणले. त्यामुळे या निवडीत मंत्री मुश्रीफ धुरंदर ठरले आहेत.
भाजप जनसुराज्यकडून मुश्रीफांच्या कोंडीचे प्रयत्न
कोल्हापूर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६८ असून महायुतीचे ५१ सदस्य विजयी झाले आहेत. सर्वाधीक मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत तब्बल वीस सदस्य निवडून आणल्याने त्यांचा जिल्हा परिषदेवरील अध्यक्षपदाचा दावा पक्का होता. भाजपचे बारा सदस्य निवडून आले होते तर जनसुराज्यचे सहा सदस्य विजयी झाले आहेत. भाजप आणि जनसुराज्य पक्ष वेगळे असले तरी त्यांचा आत्मा एक आहे असे वक्तव्य भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील करत भाजपचे बारा आणि जनसुराज्यचे सहा असे १८ सदस्य असल्याने भाजपला अध्यक्षपद मिळावे, अशी मागणी केली. भाजप आणि जुनसुराज्यकडून राष्ट्रवादीची आणि पर्यायाने मुश्रीफांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. (Mushrif Proves to be a ‘Master Strategist’ in ZP President Election)
काँग्रेसची राष्ट्रवादीला पाठिंब्याची तयारी?
शिवसेनेचे आठ आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचे चार असे १२ सदस्य असल्याने भाजप, शिवसेना, जनसुराज्य आणि यड्रावकर गट एकत्र येऊन राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न सुरू झाला. काँग्रेसचे १५ सदस्य निवडून असल्याने त्यांनी विरोधी पक्षात बसावे लागले. पण अध्यक्षपदाच्या निवडीत टिव्स्ट आला तर भाजप सोडून कोणत्या पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार असेल तर काँग्रेस पाठिंबा देण्यासाठी तयारी काँग्रेसची असल्याने महायुतीतील भाजप, शिवसेना, जनसुराज्य पक्ष सावध होते.
मुश्रीफांच्या पुढाकाराने दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची प्रक्रिया थांबली असली तर अजित पवार हयात असताना राज्यात सर्वात प्रथम राष्ट्रवादीचे दोन्ही गट कोल्हापुरात एकत्र आले होते. मुश्रीफांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र येण्याची प्रक्रिया गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यात घेण्यात आली. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नंदिनी बाभूळकर आणि अजित पवार गटाचे माजी आमदार राजेश पाटील एकत्र आले होते. त्यामुळे तिथे भाजपला रोखण्यात यश मिळाले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेने जोर धरला. हाच पॅटर्न जिल्हा परिषदेतही राबवण्यात आला. दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी महानगरपालिका निवडणुकीत एकत्र आल्या. तिथे राष्ट्रवादीला माफक यश आले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनेक जिल्ह्यात दोन्ही गट एकत्र लढत घड्याळ चिन्हावर लढले. कोल्हापूर जिल्ह्यात हाच पॅटर्न राबवण्यात आला. (Mushrif Proves to be a ‘Master Strategist’ in ZP President Election)
राहूल पाटील यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढली
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे चिरंजीव राहूल पाटील यांना पक्षात आणून पक्षाची ताकद वाढवली. त्यांचा फायदा जिल्हा परिषद निवडणुकीत झाला. राष्ट्रवादीने महायुती म्हणून अनेक तालुक्यात निवडणूक लढवत तब्बल वीस जागा जिंकल्या. पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यात राष्ट्रवादीने यश मिळवल्याने त्याचा फटका आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्यला बसला. त्यामुळे मुश्रीफ आणि कोरे यांच्या मैत्रीत दुरावा आला. कोरे भाजपच्या जवळ गेल्याने मुश्रीफांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू झाले.
मुश्रीफांकडून महानगरपालिकेच्या फॉर्म्युल्याची आठवण
भाजप आणि जनसुराज्यने जिल्हा परिषद अध्यक्षपदावर दावा केल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या फॉर्म्युल्याची आठवण भाजपला करुन दिली. महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. एकेकाळी सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीचे चार नगरसेवक निवडून आल्याने त्यांना पदाधिकारी वाटपात संधी दिली नाही. महानगरपालिकेत सर्वात जास्त जागा भाजपच्या निवडून आल्याने महापौर भाजपच्या रुपाराणी निकम यांची निवड झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेत सर्वात जास्त सदस्य संख्या राष्ट्रवादीची असल्याने राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार यावर मुश्रीफ ठाम राहिले. तब्बल महिनाभर या घडामोडी सुरू होत्या. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी सव्वा वर्ष अध्यक्षपदाचा फॉर्म्युला मान्य करण्यात आला. अध्यक्षपद पहिल्यांदा राष्ट्रवादीला की भाजपला याचा खल सुरू झाला. हा निर्णय घेण्याचा अधिकारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे देण्यात आला. पण आगामी गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढायची असल्याने मुश्रीफांना नाराज करणे परवडणारे नसल्याने फडणविसांनी मुश्रीफांच्या इच्छेला मान दिला. अध्यक्षपदाच्या निवडीच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीला हिरवा कंदील दाखवला. (Mushrif Proves to be a ‘Master Strategist’ in ZP President Election)
पुन्हा कागलकडेच महत्वाचे पद
राष्ट्रवादीचे अध्यक्षपद कागल तालुक्याला की अन्य तालुक्यांना मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कागलमधून शिल्पा पाटील, शोभाताई फराकटे, गडहिंग्लजमधून शैलजा पाटील, पन्हाळा तालुक्यातून पूजा पाटील, शाहूवाडीतून राजकुंवर गायकवाड यांची नावे आघाडीवर होते. पन्हाळा आणि शाहूवाडीला अध्यक्षपदाची संधी दिली तर आमदार विनय कोरे नाराज होतील. गोकुळच्या निवडणुकीतही त्यांचा उपद्रव होण्याची शक्यता होती. त्यामुळे या बाबी मुश्रीफांच्या पथ्थ्यावर पडल्या आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा लाल दिवा कागलला मिळाला. सेनापती कापशी येथून निवडून आलेल्या शिल्पा खोत यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली.
शिल्पा खोत यांच्या निवडीने मुश्रीफ यांची बाजू भक्कम झाली असली तरी सर्व पदे कागललाच अशी टीका होत आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मुश्रीफांकडे असून त्यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ गोकुळचे अध्यक्ष आहेत. बाजार समितीचे अध्यक्षपद कागलकडेच आहे. पण भविष्यात सहकार कायद्यातील नवीन नियमानुसार मुश्रीफांना जिल्हा बँकेची निवडणूक लढवता येणार नाही. गोकुळच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपद कुणाला मिळणार हे सांगता येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद कागल तालुक्याला आणत मुश्रीफांनी पुढील विधानसभा निवडणुकीची जोडणी करुन आपणच धुरंदर असल्याचे सिद्ध केले आहे. (Mushrif Proves to be a ‘Master Strategist’ in ZP President Election)