कोल्हापूर : प्रतिनिधी : महिलांना अधिक सक्षम बनवण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व पिंक ई – रिक्षा या दोन महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. पिंक ई रिक्षा ही चार्जिंगवर चालणार असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी जीपीएस सिस्टीमसह रिक्षात बसलेल्या व्यक्तीचे छायाचित्र काढण्याची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. राज्यात यावर्षी १० हजार ई रिक्षा वितरीत करण्यात येणार आहेत. यासाठी प्राप्त झालेल्या ७०० अर्जांपैकी ४०० महिला लाभार्थी पिंक रिक्षा साठी कोल्हापूर शहरात पात्र ठरल्या आहेत. येत्या काळात विमानतळ, पर्यटन स्थळे अशा ठिकाणीही पिंक ई रिक्षाचा वापर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. (Pink E-Rickshaw)
महिला व बालविकास विभागाच्या वतीने महासैनिक दरबार हॉल येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पिंक ई रिक्षा व रुपे कार्डचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार राजेश पाटील, महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कायनेटिक कंपनीचे विक्री विभागाचे उपाध्यक्ष जोयेल जॉर्ज, फायनान्स विभागाचे उपाध्यक्ष अग्रदीप रॉय आदी प्रमुख उपस्थित होते. (Pink E-Rickshaw)
महिलांच्या विकासाबरोबरच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील तीन टक्के निधीतून महिलांच्या नाविन्यपूर्ण उद्योग निर्मितीला चालना देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह महिला कल्याणासाठीच्या सर्व योजना भविष्यातही सुरु राहतील. महिलांनी सर्वच क्षेत्रात नाव कमावले असून पिंक इ रिक्षा योजनेचा लाभ घेऊन या क्षेत्रातही महिलांनी नाव कमवावे व संसाराला हातभार लावत आर्थिक उन्नती साध्य करावी, असे त्यांनी सांगितले. (Pink E-Rickshaw)
खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले, महिलांनी एकत्र येऊन कार्य केल्यास त्यातून चांगला परिणाम घडतो. शासनाच्या योजनेचा लाभ घेतल्यास आर्थिक उन्नती कशी साध्य होते हे या योजनेच्या लाभार्थ्यांवरुन दिसून येईल. प्रदूषण मुक्त ई रिक्षा असल्यामुळे प्रदूषण रोखले जाईल. कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. (Pink E-Rickshaw)