मुंबई : विशेष प्रतिनिधी : लाडक्या बहिणींच्या मताला व्होट चोरी म्हणणाऱ्यांची डोके चोरी आणि बुद्धी चोरीला गेली आहे, तेच सर्वांत मोठे चोर आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला. (CM attacks Oppositions)
भारतीय जनता पार्टीच्या ‘माझा भाऊ देवाभाऊ’ या अभियानाचा भाग म्हणून जिल्हाभरातील लाडक्या बहिणींनी फडणवीस यांच्यासाठी प्रेमपूर्वक पाठविलेल्या हजारो राख्या सुपूर्द करण्याचा सोहळा शनिवारी (२३ ऑगस्ट) झाला. त्यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्रात एक कोटी लखपती दीदी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही तसेच महिलांसाठीची एकही योजना पुढील पाच वर्षे बंद होणार नाही, अशी ग्वाही दिली.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी व इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचा पक्षपाती कारभार आणि ‘व्होट चोरी’विरोधात अभियान सुरू केले आहे. त्याचा समाचार घेत फडणवीस म्हणाले की, माझ्या लाडक्या बहीणींना विनंती आहे की अशा निर्बुद्धांसाठी २५ टक्के आशीर्वाद मागा, जेणेकरून त्यांना अक्कल येईल. परदेशात जाऊन भारताची बदनामी करणारे आता बिहारमध्ये महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. पण यांना ना परदेशात ना बिहारमध्ये कोणी विचारणार आहे. महाराष्ट्रात जी यांची गत झाली तीच गत बिहारमध्ये होणार आहे. मातृशक्ती मोदी यांच्या पाठीशी आहे. बहिणींची मान अभिमानाने उंचावेल असेच कार्य आम्ही करू. (CM attacks Oppositions)
लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात येत्या काळात एक कोटी बहिणींना लखपती दीदी केल्याशिवाय राहणार नाही. महिलांना सक्षम करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करायचे आहे. यासाठी केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार विविध योजना आखत आहेत. विरोधक कितीही टीका करोत पण महिलांसाठी सुरु केलेली एकही योजना पुढची पाच वर्षे बंद होणार नाही, असे ते म्हणाले. (CM attacks Oppositions)
ते म्हणाले की, ‘राज्यभरातील बहिणींच्या राख्या माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम राबवण्यात आला त्याबद्दल धन्यवाद. मला जन्मभर या बहिणींच्या ऋणातच रहायचे आहे, त्यांचे उतराई व्हायचे नाही. या राख्यांना भाषा, धर्म, पंथ, जात नाही, निरपेक्ष प्रेमाच्या ह्या राख्या प्रतिक आहेत. इतक्या बहीणींचे प्रेम ज्याच्यापाशी आहे अशा माझ्यासारख्या भावाला कुणाचीही भीती नाही,
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की राजकारणाच्या पलिकडे जाऊन दिवसाचे १८ तास केवळ महाराष्ट्र आणि प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी जे आवश्यक गरजेचे आहे ते घडवण्याचा प्रयत्न करतो अशा लाखमोलाच्या भावाला अनोखी भेट द्यायला हवी या विचाराने हा राखी प्रदान सोहळा आखला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ३६ लाख ७८ हजार राख्या राज्यभरातून आल्या. यावेळी सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ. विद्या ठाकूर, मंदा म्हात्रे, कालीदास कोळंबकर, अमित साटम, संजय उपाध्याय, कॅप्टन तमिळ सेल्वन, सुलभा गायकवाड, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, आ. संजय केनेकर, माधवी नाईक, राजेश पांडे, ज्येष्ठ नेत्या कांता नलावडे, नीता केळकर, प्रा. वर्षा भोसले आदी उपस्थित होते.