मुंबई : विशेष प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या खा. सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दिलेल्या वैयक्तिक भेटीसाठी जनतेच्या कष्टाचे लाखो रुपये का वापरलेत?, पाहिजे तर त्यांना सोन्याच्या ताटात जेवू घाला, पण ते आमच्या कष्टाच्या पैशाने कशासाठी? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. (Damania Criticized CM)
गेल्या आठवड्यातील शहा यांनी रोहा येथील सुतारवाडीत तटकरेंच्या घरी जाऊन दुपारी स्नेहभोजन घेतले होते. त्यासाठी शासनाकडून तातडीने चार हेलिपॅडची उभारणी करण्यात आली होती.
त्याबाबत दमानिया यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून हेलिपॅड बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केलेली निविदा पोस्ट केली. तसेच राज्य सरकार, फडणवीस आणि तटकरेंवरही टीका केली आहे. (Damania Criticized CM)
दमानिया यांनी म्हटले आहे की, जनतेच्या कष्टाने कमावलेल्या, कराच्या पैशातून शहा -तटकरे भेटीसाठी खास हेलिपॅड? तीही चार चार हेलिपॅड? अमित शहा यांची भेट वैयक्तिक होती. तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी? अमित शहा यांना जेवायला घालायचंय तर खुशाल घाला. सोन्याच्या ताटात घालायचंय तरी घाला, पण ते आमच्या कष्टाच्या पैशाने कशासाठी? तटकरेंच्या अफाट कंपन्या आहेत ना ? मग त्यांनी वैयक्तिक खर्च करावा. देवेंद्र फडणवीसांचे पुनःश्च अभिनंदन. सिंचन घोटाळा विसरून नवीन सरकारमधे खूपच चांगला ताळमेळ जाणवतोय.’ असा टोलाही दामानिया यांनी लगावला आहे. (Damania Criticized CM)
गेल्या आठवड्यात अमित शहा यांच्यासाठी खासदार तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. या कार्यक्रमातील एका फोटोवरूनही दमानिया यांनी निशाणा साधला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी ट्विट करत जोरदार हल्लोबोल केला आहे.
हेही वाचा :
सभापती ‘पक्ष प्रवक्ते’ असू शकत नाहीत
महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री आहे का?