मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्याची घोषणा करणाऱ्या भाजपने उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र झाल्याने सावध पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पामध्ये हे संकेत दिले आहेत. ठाण्यात महायुतीचा निर्णय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवला आहे. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहे. अन्य ठिकाणी स्थानिक पक्षांची ताकद लक्षात युती केली जाणार आहे. (Mahayuti united in Mumbai)
मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी गेली काही दशके भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. मागिल निवडणुकीत शिवसेनेपेक्षा एक जागा कमी मिळालेल्या भाजपने शिवसेनेला बाय दिला होता. पण शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतल्यानंतर भाजपने मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकावण्यासाठी गेली तीन वर्षे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाल्यानंतर भाजपला मुंबईत दणकून विजय मिळण्याची आशा वाटत होती. पण तब्बल दोन दशकानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने भाजपकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. आज दीपावली पाडव्या दिवशी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूकीत महायुती म्हणून लढण्याचे संकेत दिले आहेत. (Mahayuti united in Mumbai)
ठाण्यात महायुती की स्वबळावर याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवला आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गेल्यावेळच्या निवडणुकीत शिवसेनेचे ६७ तर भाजपचे २३ नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले होते. यावेळी शिवसेनेचे दोन शकले झाल्याने एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटाने मोठी आघाडी उघडली आहे. त्यांना राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेसची साथ आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहेत. त्यातच ठाण्यामध्ये शिंदे यांच्या विरोधात मंत्री गणेश नाईक आणि संजय केळकर भाजपची ताकद आजमावून पहात आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपने स्वबळावर लढण्याचे निश्चित केले आहे. (Mahayuti united in Mumbai)