नवी दिल्ली : भारत कालबाह्य शस्त्रांनी आधुनिक युद्धे जिंकू शकत नाही, असे सांगत संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी स्वदेशी शस्त्रांवर लक्ष केंद्रित करून भविष्यासाठी सुसज्ज तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज अधोरेखित केली. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताचे कसलेही नुकसान झाले नसल्याचा नवा दावाही त्यांनी केला. पाकिस्तानचा ड्रोन आणि इतर युद्धसामग्रीचा वापर यशस्वीरित्या कसा रोखला त्याचे वर्णनही त्यांनी केले. (Defence Strategy)
दिल्लीतील एका संरक्षण कार्यशाळेत बुधवारी (१६ जुलै) ते बोलत होते. म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरदरम्यान, १० मे रोजी पाकिस्तानने ड्रोन आणि युद्धसामग्रीचा वापर केला. त्यामुळे भारतीय लष्करी किंवा नागरी पायाभूत सुविधांना कोणतेही नुकसान केले नाही. त्यांचे बहुतेक ड्रोन निष्क्रिय करण्यात आले.” (Defence Strategy)
“कालची शस्त्रे आजची युद्धे जिंकू शकत नाहीत, आजच्या लढाया लढण्यासाठी उद्याची तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे,” असे ते म्हणाले. पीटीआयच्या हवाल्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने हे वृत्त दिले आहे.
‘‘आपण आपल्या मोहिमांसाठी आयात केलेल्या विशिष्ट तंत्रज्ञानावर अवलंबून राहू शकत नाही; परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्याने तयारी कमकुवत होते,’’ असे चौहान म्हणाले. (Defence Strategy)
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओजेके) मधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर हवाई हल्ले केले.
भारताने त्यानंतरच्या आक्रमणालाही परतवून लावले आणि पाकिस्तानी हवाई तळांना लक्ष्य केले.
चौहान यांनी मानवरहित हवाई वाहनांचा (यूएव्ही) धोरणात्मक वापर आणि स्वदेशी काउंटर-ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज यावरही भाष्य केले.
‘‘जेव्हा आपण ड्रोनबद्दल बोलतो तेव्हा मला वाटते की त्यांचा विकास उत्क्रांतीवादी आहे. युद्धात त्यांचा वापर खूप क्रांतिकारी ठरला आहे. त्यांच्या तैनाती आणि व्याप्तीची जाणीव वाढत असताना, लष्कराने क्रांतिकारी पद्धतीने ड्रोनचा वापर सुरू केला. याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे,’’ असे चौहान म्हणाले.
हेही वाचा :
चुकीच्या पद्धतीने तुरूंगात टाकण्याच्या प्रकरणात भरपाईसाठी कायदा हवा
दीपक काटेचा गॉडफादर बावनकुळेच : प्रविण गायकवाडांचा आरोप