कोल्हापूर : प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्गावरुन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यातच आज गुरुवारी शिवाजी चौकात शिवसैनिक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. स्वाभिमानीचे कार्यकर्ते आंदोलन करत असताना शिवसैनिकांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवल्याने एकच खळबळ उडाली आहे. हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Shiv Sainiks and Swabhimani activists clashed)
शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून मोठा विरोध होत आहे. त्याविरोधात राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात आहे. तर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासासाठी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा दिला आहे. त्यावरुन दोन्ही नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. शक्तीपीठसाठी लागणाऱ्या जमिनीच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी नांगराच्या फाळाच्या तलवारी कराव्या असे आवाहन राजू शेट्टी यांनी जमिनबाधित शेतकऱ्यांना केले आहे. तर राजू शेट्टी हे राक्षसी विचार मांडत आहेत. सरकारने जर मनात आणले तर त्यांना उलटे टांगेल अशी टीका राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. (Shiv Sainiks and Swabhimani activists clashed)
राजेश क्षीरसागर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राजू शेट्टी यांनी क्षीरसागर हे टक्केवारीत अडकले असून हिंमत असेल तर त्यांनी उलटे टांगून दाखवावेच असा पलटवार केला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेट्टी यांच्या निषेध करताना त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात आंदोलन केले. आंदोलन करुन ते परत जात असताना त्यांच्या वाहनांवर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेत शिवसैनिकांना रोखले. तसेच शिवसैनिकांना ताब्यात घेतले. (Shiv Sainiks and Swabhimani activists clashed)