कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शिर्षकावरुन शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या प्रकाशकाला फोनवरुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली. गायकवाडांच्या धमकीचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. तसेच ज्येष्ठ नेते पानसरे यांच्याबाबत गैरउद्गारही काढले. आमदार गायकवाड यांच्या धमकीचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले असून पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्या विरोधात तक्रार देणार असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक १९८८ मध्ये लिहिले आहे. या पुस्तकाच्या हजारो प्रती खपल्या असून वाचक आणि शिवप्रेमींनी या पुस्तकाचे स्वागत केले आहे. पानसरे यांच्या पश्चात ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रशांत आंबी यांनी केली आहे. अनेक कार्यक्रमात या पुस्तकांच्या प्रतींचे वितरण होते. आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नीला एका व्यक्तीने शिवाजी कोण होता? हे पुस्तक भेट दिले होते. हे पुस्तक हाती पडल्यानंतर आमदार गायकवाड यांनी पुस्तकाच्या शिर्षकावरुन प्रकाशक आंबी यांना फोन करुन अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली. (MLA Gaikwad Threatens Publisher with Death)
एकीकडे आमदार गायकवाड शिविगाळ करत असताना प्रकाशक प्रशांत आंबी यांनी गायकवाड यांना पुस्तक वाचावे अशी विनंती केली. तसेच हे पुस्तक मी लिहिले नसून १९८८ मध्ये गोविंदराव पानसरे यांनी लिहिले असल्याचे सांगितले. त्यावर आमदार गायकवाड यांनी अरे गोविंद पानसरे हा छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरीत शिवाजी म्हणणारा कोण होता? तुमच्यासारखे नालायक लोक शिवाजी महाराजांचा एकेरी भाषेत बोलतात. तुला माहितीये ना, त्या गोविंदराव पानसरे यांचे काय झालं. त्याची काय अवस्था झाली. मी तुलाही घरात घुसून मारेन, तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन अशी धमकी प्रशांत आंबी यांना दिली. (MLA Gaikwad Threatens Publisher with Death)
प्रशांत आंबी यांनी आमदार गायकवाड यांना पुस्तक वाचण्याची विनंती केली तरीही त्यांनी धमकी देण्यास सुरुवात केली. जीवे मारण्याची, जीभ कापण्याची धमकी दिल्यानंतरही प्रशांत आंबी यांनी न डगमगता आमदार गायकवाड यांना ‘तुम्ही उद्या माझी जीभ कापायला या’ असे ठाम उत्तर दिले. या संदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करुन स्पष्टीकरण दिले आहे. (MLA Gaikwad Threatens Publisher with Death)