जमीर काझी : मुंबई : भारतीय संगीतातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका आशा भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह मंत्रीमंडळातील मंत्री, आमदार, बॉलीवूडमधील कलाकार उपस्थित होते.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले (वय ९२) यांचे रविवारी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्यावर आज सोमवारी सकाळी परळ येथील घराबाहेर आशा भोसलेंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मान्यवरांसह चाहत्यांनी गर्दी केली होती. मुंबई पोलिसांकडून आशा भोसलेंना मानवंदना देण्यात आली. आशा भोसलेच्या पार्थिवाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, मोहम्मद सिराज, अभिनेता सचिन पिळगाव, राकेश रोशन, गायक नितिन मुकेश, अभिनेत्री तब्बू यांनी अंत्यदर्शन घेतले. दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांच्या चाहत्यांची रीघ लागली होती.
दुपारी सव्वातीन वाजता त्याच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. साडेचार वाजता अंत्ययात्रा दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत पोहोचली. आशा भोसलेची बहीण उषा मंगेशकर, मीन खडीकर यांच्याह मान्यवरांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी अभिनेता अमिर खान, विकी कौशल, गायक शान, सुदेश भोसले, अनुप जलोटा, नंदेश उमप, विवेक ओबेरॉय यांनी श्रध्दांजली वाहिली. पावनेपाच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्काराच्या विधीस सुरुवात झाली. पोलिसांकडून सलामी देण्यात आली. सलामीनंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
२० भाषांत १२ हजार गाणी गायिली
तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादीदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली. आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह २०भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये बारा हजार वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’ आणि ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणं नाही. (Fans line up to pay their last respects to veteran singer Asha Bhosle)
पंतप्रधान मोदीकडून दु;ख व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स मीडियात मराठीत पोस्ट करत आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की ,” भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण संगीत रचनांपर्यंत, त्यांच्या आवाजात कालातीत तेज होते. त्यांच्याशी झालेल्या संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन. त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना माझ्या भावपूर्ण संवेदना. त्या पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी सदैव लोकांच्या आयुष्यात गुंजत राहतील”.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पोस्टमध्ये म्हटले , आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी—आणि विशेषतः माझ्यासारख्या प्रत्येक संगीतप्रेमीसाठी—अत्यंत दुःखद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,’अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्हीसोबत होतो. त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर…’ हे गाणं माझ्याकडून गाऊन घेतलं होतं आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले ‘, असं त्या म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशा आठवणींना उजाळा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शरद पवारांकडून श्रध्दाजंली
संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला : “आशाताईंच्या रूपानं भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला आहे. त्यांच्या निधनामुळं संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला आहे. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतविश्वासाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे. आज त्यांचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील. आशाताईंनी प्रत्येक भारतीय संगीतप्रेमींच्या मनात निर्माण केलेलं अढळ स्थान कायम राहील. राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा असंख्य पुरस्कारांच्या मानकरी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, असं म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली.
संगीत क्षेत्रात मोठी पोकळी
“सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या, आपल्या सुमधुर आवाजानं संगीत क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. पद्मविभूषण, ग्रॅमी, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित आशाताई म्हणजे भारतीय संगीताचा जगप्रसिद्ध आवाज होत्या. त्यांच्या निधनानं संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली!,” अअशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार आदीसह उद्योग,बॉलीवूड, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनीआशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Fans line up to pay their last respects to veteran singer Asha Bhosle)