Home » Blog » कायदा आणि नैतिकता यांच्यातील चर्चात्मक फेरफटका

कायदा आणि नैतिकता यांच्यातील चर्चात्मक फेरफटका

६३ वे महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा

by प्रतिनिधी
0 comments
State Drama Competition

– प्रा. प्रशांत नागावकर : कायदा आणि नैतिकता यांच्या नात्याबद्दल सातत्याने चर्चा होत असते. नैतिकता आणि कायदा वेगवेगळे असले तरी त्यांच्यात एक आंतरिक संबंध आहे. नैतिकता कायद्याच्या बंधनकारक शक्तीचा स्त्रोत आहे. कायदे प्रत्येक व्यक्तीला, नागरिकाला त्यांचे पालन करण्यास बांधील आहेत. तथापि नैतिक मानके व्यक्तीचे संगोपन मूल्य, धार्मिक पार्श्वभूमी आणि संस्कृती यावर अवलंबून असतात. कायद्याच्या अनेक मर्यादा आहेत. कायदा लोकांना प्रामाणिक काळजी घेणारा किंवा नि:पक्ष बनवू शकत नाही. उदाहरणार्थ, खोटे बोलणे किंवा विश्वासघात करणे बेकायदेशीर नाही. परंतु ते अनैतिक आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या आचरणात आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक नसले तरी सर्वांना कायद्याचे पालन करणे हे बंधनकारक असते. शक्यतो नैतिक आणि कायदा समान सातत्याचे निराकरण करतात. लोकांना कायद्याचे बंधन नसले तरी त्यांची कृती नैतिकदृष्ट्या आक्षेपार्ह आणि अनैतिक असू शकते. (State Drama Competition)

एकूणच कायदा आणि नैतिकता यांच्यामधील द्वंद्व यांच्या संदर्भात केलेली चर्चा म्हणजे ‘वॉक इन’ नाटक. डॉ. श्रद्धानंद ठाकूरना या विषयावर नाटक लिहिण्याचं, यासंदर्भात चर्चा करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सलमान खान ते पोर्श कार अपघात प्रकरण, नागपूरला झालेला अशाच स्वरूपाचा प्रकार. ही सगळी ‘हिट अँड रन’ व ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ या प्रकरणातील आरोपी सर्वसामान्य नागरिकांच्या रडारवर असली तरी केवळ अनैतिक वर्तन करून कायद्याच्या पळवाटांचा फायदा घेत स्वतःला निर्दोष म्हणून सिद्ध करण्यात ते यशस्वी झाले आहे. सर्वसामान्य माणसाला हेच कुठेतरी अस्वस्थ करणारे आहे. तेच डॉ. ठाकूर यांना अधिक बोचल्याने नाटकाची त्यांच्याकडून निर्मिती झाली आहे.

‘वॉक इन ‘ हे डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले तसेच नित्यश्रद्धा फाउंडेशन, आजरा या संस्थेने सादर केलेले नाटक.

या नाटकाच्या माध्यमातून डॉ. श्रद्धानंद ठाकूर यांनी कायदा आणि नैतिकता यांच्यातील द्वंद्व नाटक या माध्यमातून कलात्मक पद्धतीने व्यक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. याला त्यांचे सहकारी कलाकार आणि तंत्रज्ञानानी उत्तम साथ दिली आहे. आपल्याकडे कायदेशीर निर्णय आणि नैतिक निर्णय पूर्णपणे वेगळे म्हणून पाहिले जातात. व्यक्ती कायदेशीर व्यवस्थेच्या बाहेर त्याचे नैतिक पूर्वग्रह ठेवतात. तथापि, सध्या आपण कायदा आणि नैतिकता यांचे मिश्रण झालेले पाहतो.  नैतिकतेने जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजावर घेतलेले कायदेशीर निर्णय हे सकारात्मक परिणाम करू शकतात. पण तसे होत नाही, हीच खंत डॉ. ठाकूर यांनी या नाटकातून नेमकेपणानी मांडली आहे. (State Drama Competition)

व्यवसायाने डॉक्टर असलेले ठाकूर हे आजऱ्यातील बहुआयामी व्यक्तिमत्व. आजऱ्यातील सांस्कृतिक वातावरण संपन्न करण्यामागे त्यांचे योगदान मोलाचे आहे. तसे पाहिले तर आजरा हे पश्चिम महाराष्ट्रातील शेवटचे टोक. अशा ठिकाणी रुजलेली नाट्यपरंपरा पुढे नेण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. ‘हृदयांकित’ हे त्यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेलं एक महत्त्वाचं नाटक. वैद्यकीय क्षेत्रातील अमानवी व्यवहार अत्यंत निर्भिडपणे त्यांनी व्यक्त केले आहेत.

‘वॉक इन’ नाटकात त्यांनी लेखन दिग्दर्शनाबरोबरच ब्रो नावाची प्रमुख व्यक्तिरेखाही साकारली आहे. तिन्ही जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत सहजतेने निभावल्या आहेत. नाट्यक्षेत्रातला त्यांचा दीर्घकालीन अनुभव या नाटकातून जाणवतो.

आपले व्यक्तिगत शारीरिक स्वास्थ बाजूला ठेवून ब्रोच्या व्यक्तिरेखेत जास्तीत जास्त जीव ओतण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक हे एक चर्चा नाट्य. सहाजिकच हालचालीवर बंधने घालून संवादाच्या माध्यमातून विचार पोहोचवण्याचं आव्हान सर्वच कलाकारांसमोर होते. पण प्रमुख व्यक्तिरेखा म्हणून साकारताना हे आव्हान डॉ. ठाकूर यांच्यासमोर जास्त होते. तेही त्यांनी तितक्याच ताकदीने साकारले.

ब्रो च्या व्यक्तिरेखेत त्याच्या वर्तनात एक प्रकारचा विक्षिप्तपणा जाणवत असला तरी वैचारिकदृष्ट्या तो समतोल आहे. हेच त्यांनी अभिनयाच्या माध्यमातून नेमकेपणाने व्यक्त केले आहे. ही भूमिका त्यांनी शांत आणि संयमाने केली आहे. शारीरिक अभिनयापेक्षा वाचिक अभिनयावर विशेष घर दिला आहे. एकूणच ब्रो त्यांनी व्यवस्थित साकारला आहे.

डॉ. ठाकूर यांना मिस जेनिफर झालेल्या वृषाली केळकर-वाळके यांनी चांगलीच साथ दिली आहे. वकिलांचे सहायक असली तरी कायद्याच्या पळवाटा तिला नेमकेपणाने ठाऊक आहेत. कोणत्या केसमध्ये मॅनेज करायचे याची पक्की जाणीव असलेली असिस्टंट. कायदा आणि नैतिकता या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि कायद्याच्या शिक्षेपासून वाचायचं असेल तर अनैतिक गोष्टी करणे किती गरजेचे आहे हे ती ठामपणे सांगते. पर्यायाने अभिनयातून व्यक्त करते. रंगमंचावरील वावर आणि अभिनयात एक प्रकारचा आत्मविश्वास दिसून आला. (State Drama Competition)

मंदार बापट यांनी फ्रँक आणि ॲडव्होकेट डिकॉस्टा अशा दोन्ही भूमिका साकारल्या आहेत. दोन भूमिकांमधील वेगळेपण त्यांनी पुरेपूर जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या अभिनयाचं महत्त्वाचे वैशिष्ट्ये.

तांत्रिक बाजूंमध्ये नेपथ्य आणि प्रकाश योजना अत्यंत आशयपूर्ण स्वरूपाची झाली आहे. गोव्यातील एका सदन व्यक्तीचं निवासस्थान अत्यंत चकचकीतपणे मांडण्यात नेपथ्यकार यशस्वी झाला आहे. तरी त्यातील अनेक वस्तूंच्या मांडणीमुळे रंगमंचावर काहीशी गर्दी दिसते. यामुळे पात्रे कुठेतरी हरवल्याचे जाणवत होते. डोळ्यांच्या पेंटिंग्सचा नाटकाच्या आशयानुसार नेपथ्यात वापर मोठ्या खुबीने वापर करण्यात आला आहे.

प्रकाश योजनेत ऑपरेटिंगबाबत कमालीचा सफाईदारपणा जाणवला. पण मागील बॅटनवरील स्पॉट थेट प्रेक्षकागृहात येत असल्याने आस्वादात अडथळा निर्माण होत होता. नाटकाचे सादरीकरण त्यावरील पकड ज्या घट्टपणे जाणवायला हवी होती तितकी जाणवत नव्हती. दीर्घ लांबीचे प्रसंग संथगतीने पुढे जात असल्याने प्रेक्षकांचीही नाटकावरची पकडा सैल झालेली दिसली.

. . . . .

नाटकाचे नाव :  वॉक इन

लेखक, दिग्दर्शक : डॉ. श्रद्धानंद ठाकूर

सादरकर्ते : नित्यश्रद्धा फाउंडेशन, आजरा

नेपथ्य : प्रा. सुधीर मुंज, स्वप्नील कोगेकर

रंगभूषा : राहुल नेवरेकर

वेशभूषा : बाळासाहेब आपटे

प्रकाश योजना : रोशन कुंभार, राकेश करमळकर

भूमिका आणि कलावंत State Drama Competition

ब्रो : डॉ. श्रद्धानंद ठाकूर

फ्रँक आणि ॲड. डिकोस्टा : मंदार बापट

मिस जेनिफर : वृषाली केळकर-वाळके

सिल्व्हिया : ओवी रेळेकर

गायक : अभिजीत देशपांडे

हेही वाचा :

 

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00