Home » Blog » खासगीपणाच्या अधिकारांबाबत सामाजिक बेफिकिरी

खासगीपणाच्या अधिकारांबाबत सामाजिक बेफिकिरी

by प्रतिनिधी
0 comments
Social disinterest in privacy rights

कौटिल्यांनी त्या काळात पाळतीचाहेरगिरीचा विचार किती बारकाईने केलेला आहेहे पाहिले तर आज थक्क व्हायला होते. पाळतशाहीमध्ये विदा‘ म्हणजेच डेटाला अनन्यसाधारण महत्त्व. शस्त्र आहे ते पाळतशाहीचे. पण हे महत्त्व आजचेच नाही. आज डेटा इज न्यू ऑइल‘ वगैरे म्हटले जातेते तो डेटा उपयोगात आणायची नवनवी तंत्रे निर्माण झाली आहेत यास्तव. अशी तंत्रे पूर्वी नव्हती. तरीही नागरिकांचा डेटा‘ जमा केला जात होता…

 रवि आमले

 यम आणि यमी हे जुळे भाऊ-बहीण. यांची एक अत्यंत विचित्र कथा ऋग्वेदात आहे. सनातन वैदिक आर्य धर्मातील पवित्र असा हा वेद. त्याच्या दहाव्या मंडलातील एक संपूर्ण सूक्तच या कथेस वाहिलेले आहे. आपल्याला त्याच्याशी देणेघेणे आहे, ते फक्त पाळतशाहीच्या संदर्भात.

ती कथा अशी, की यम आणि यमी एका निर्जन, विस्तीर्ण बेटावर गेले आहेत. यमी अतिशय कामविव्हल झालेली आहे. तिला तिच्या भावापासून पुत्र हवा आहे. ती त्याला म्हणते, ‘एकाच शय्येवर झोपताना पत्नी ज्या प्रमाणे पतीसमोर आपला देह प्रदर्शित करते, त्या प्रमाणे मी माझे शरीर दाखवीन. ये, आपण एकाच रथाच्या दोन चाकांप्रमाणे एकच कार्य करू.’ यम तिला समजावतो, ‘हे योग्य नाही. सूर्य आणि सरण्यू हे आपले माता-पिता आहेत. आपण सख्खे भाऊ-बहीण आहोत. तू बहीण असल्याने या संबंधांस योग्य नाहीस.’ यमी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. ती म्हणते, ‘सर्वात्मक प्रजापतीने गर्भातच आपल्याला पती-पत्नी बनवलेले आहे आणि पहिल्या दिवशीचा संभोग कोण जाणतो? तो कोणी पाहिला आहे?’ यानंतर यम जे म्हणतो, ते अत्यंत महत्त्वाचे आहे. तो म्हणतो, ‘येथे जे देवांचे गुप्तचर फिरत असतात. ते ना कधी विश्रांती घेतात, ना कधी डोळे बंद करतात!’

‘न तिष्ठन्ति न नि मिषन्त्येये देवानां स्पश इह ये चरन्ति

अन्यने मदाहनो याहि तूयं तेन वि वृह रथ्येव चक्राः (ऋग्वेद, १०.१०.८)-

ही ती ऋचा. यात ‘स्पश’ हा शब्द आला आहे. चतुर्वेदी द्वारकाप्रसाद शर्मा यांच्या ‘चतुर्वेदीकोश’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘संस्कृत-हिंदी कोषा’त (१९१७) स्पशचा अर्थ आहे गुप्तचर. तेव्हा या ऋचेचा काही वेगळा अर्थ काढणे कठीण. (Social disinterest in privacy rights)

वेदकालीन पाळतशाही

आता या सूक्ताचा प्रारंभ पाहा. त्यात उल्लेख आहे, की हे दोघे जण अशा द्वीपावर आहेत, की जेथे अन्य कोणीही नाही. त्यांच्या संवादातून समजते, की ते तेथे काही तत्कालीन व्यवस्थेविरोधात षड्यंत्र रचत नव्हते. ते आर्यशत्रू दस्यूंसाठी हेरगिरी करीत नव्हते, की पणींसाठी गौ तस्करी करीत नव्हते. त्यांचे बोलणे अत्यंत खासगी होते. तरीही यम सांगत आहे, की आपले कर्म देवांच्या हेरांपासून लपून राहणार नाही. ते हेर तेथे आहेत की नाहीत हेही त्याला माहीत नाही. पण त्याच्या मनात त्यांचे भय मात्र आहे. ते कशामुळे? तो म्हणतो, बहीण भावाच्या संबंधांना पूर्वी असलेली मान्यता व्यवस्थेने काढून घेतलेली आहे. तो नियम मोडल्यास ते व्यवस्थेला, देवांना कळेल. ही यमाची भीती आहे. कोणी पाहात असो वा नसो, आपण मात्र व्यवस्थेने ठरवून दिलेल्या नियमांचे नीट पालन करणे आवश्यक आहे, ही जाणीव त्याच्या मनात आहे. हे संपूर्ण सूक्त नीट पाहिल्यावर लक्षात येते, की हा केवळ पाळतीचा सर्व्हेलन्सचा प्रकार नाही. ही केवळ हेरगिरी नाही.

ऋग्वेदात या गुप्तचरांचा स्वामी स्पशराज आहे वरूण. त्याला आपण समुद्र वा पर्जन्यदेवता मानतो. पण ऋग्वेदात तो व्यवस्थेचा (ऋत) संरक्षकही आहे. लोक नियम पाळतात, की नाही हे पाहणारा आहे. अथर्ववेदात त्याचे कार्य अधिक स्पष्टपणे मांडलेले आहे. अथर्ववेदाच्या चौथ्या कांडात ‘सत्यानृतान्वीणम्’ नावाचे एक सूक्त आहे. ते सांगते, की हा वरुण सर्व काही जाणत असतो. लोक काय करतात ते जवळून पाहात असतो. पृथ्वीवर जाहीर वा गुप्तपणे जे काही व्यवहार चालतात ते त्याला माहीत असतात. एवढेच काय, दोन व्यक्ती गुपचूप काही बोलत असतील, तरी त्याला त्यांचे बोलणे समजते. तो जणू त्यांच्यात तिसरा होऊन ते ऐकत असतो. त्याचे हेर पृथ्वीवर सतत फिरत असतात. ते हेर म्हणजे त्याचे हजार नेत्रच. त्यांद्वारे तो या भूमीचे निरीक्षण करीत असतो. आणि तेही कसे, तर एखाद्याची पापणी किती वेळा लवते, याकडेही त्याचे लक्ष असते. तो सर्व काही मापत असतो, जाणत असतो, पाहत असतो. ही केवळ पाळत नाही. पाळत विशिष्ट लोकांवर, गटांवर ठेवली जाते. हे सर्व्हेलन्स स्टेट पाळतशाही आहे. येथे सगळेच पाळतीखाली आहेत. लोकांना त्याची जाणीवही आहे. पाळतशाहीत ही जाणीव गरजेची असते. ऑर्वेलच्या ‘१९८४’ मध्ये सर्वत्र पाट्या लावलेल्या असतात, की ‘बिग ब्रदर इज वॉचिंग यू’. ‘तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आहात’, हा त्याचाच किरकोळ प्रकार. हा एवढासा इशाराही लोकांस नियंत्रणात, दाबात ठेवण्याकरीता पुरेसा असतो.

ऋग्वेद रचनेचा काळ साधारणतः इ.स.पूर्व दोन हजार ते चौदाशे मानला जातो. आता वेदांचा आणि वेदांचाच का, कोणत्याही धर्मग्रंथांचा विषय आला, की त्या ग्रंथाचा काळ अधिकाधिक मागे नेण्याची आपली प्रवृत्ती जुनीच आहे. ग्रंथ जेवढा प्राचीन, तेवढा थोर, तेवढी आपली संस्कृती थोर वगैरे न्यूनगंडात्मक अहंगडातून येते ते. पण अभ्यासकांच्या मते, सुमारे चार हजार वर्षांपूर्वी ऋग्वेदाची रचना झाली. बाकीचे वेद त्यानंतरचे. त्या काळी अशा प्रकारची पाळत का ठेवली जात असेल, तिचे नेमके तंत्र काय असेल, ते वरूणाचे हजार नेत्र ही केवळ कवी कल्पना की वास्तव, हे सांगता येणे कठीण. यावर काही लोक असेही म्हणू शकतील, की हा साराच प्रकार पारलौकिक, अध्यात्मिक वगैरे अर्थाने घ्यावा. जेथे जेथे अशा प्रकारच्या अडचणीच्या बाबी येतात, त्या ठिकाणी नेहमी असाच सल्ला दिला जातो.

पण यम-यमी संवाद, वरुणाचे वेदांत वर्णिलेल्या त्या विविध युद्धांत भाग घेणे अशा कथांना कितीही धार्मिक संकल्पनांच्या गडबडगुंड्यात गुंडाळले, तरी वास्तवाचे तुकडे मागे राहतातच. त्या वेदकालीन समाजव्यवस्थेचे वास्तव काय होते? कशी होती ती? ती जातीभेदात्मक नव्हती हे खरे. पण तिच्यात व्यवसायभेद नक्कीच होते. ब्रह्म, क्षत्र आणि विश् असे तीन व्यवसायनुरूप वर्ग त्या काळी होते. त्यातील पौरोहित्य करणारा आणि राज्य करणारा हे दोन वर्ग अर्थातच प्रमुख होते. बाकीचा तिसरा विश् हा वर्ग म्हणजे सामान्य प्रजा. वरूणाचे ते हजार नेत्र नजर ठेवत असणार ते या सामान्य प्रजेवर. अखेर वरूण ही व्यवस्थेची संरक्षक देवता आहे. एवढेच नव्हे, तर वेदांत वरूणाचा राजा म्हणूनही उल्लेख आलेला आहे. ही राज्यव्यवस्था, तिचे कायदे नियम अबाधित राहावेत; त्या व्यवस्थेला धोका देण्याचे काम कोणी करू नये, हे पाहण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. ती तो उत्तमरित्या सांभाळत असल्याचे दिसते. शिवाय अशी हेरगिरी चालते, पाळत ठेवली जाते, याची जाणीव लोकांना आहे. अशी जाणीव असणे हे व्यवस्थेच्या फायद्याचे असते. (Social disinterest in privacy rights

रामायण-महाभारतकालीन पाळत व्यवस्था…

वेदकाळाप्रमाणेच पुढे रामायण-महाभारतातही पाळतीचे, हेरगिरीचे उल्लेख आढळतात. वाल्मिकींच्या रामायणात प्रजेवर सर्वकष पाळत ठेवण्याचे उल्लेख नाहीत, हे खरे. मात्र राज्ययंत्रणेशी संबंधित असलेल्या सेनापती, अंतःपुराचा प्रमुख, खजिनदार, नगराध्यक्ष, बांधकामप्रमुख, धर्माध्यक्ष आदी प्रमुख लोकांवर मात्र राजाने बारीक नजर ठेवावी असे सांगितलेले आहे. वाल्मिकींनी भरतभेटीचा जो प्रसंग रंगवलेला आहे, त्यात हा उपदेश आलेला आहे. तेथे राम भरताला म्हणतो, की ‘तुला आणि तुझ्या अमात्यांना इतरांच्या गुप्त विचारांचा पत्ता लागतो ना? तू तुझ्या शत्रुपक्षाच्या १८ आणि स्वपक्षाच्या १५ तीर्थांची तीन-तीन गुप्तचरांद्वारे तपासणी, चौकशी करत असतोस ना?’ तीर्थे म्हणजे राज्ययंत्रणेतील विविध अधिकारी. सामान्य प्रजेवरीलपाळतीबाबत वाल्मिकींचा काय विचार होता, हे मात्र रामायणातून समजत नाही. महाभारत मात्र याबाबतीत अधिक स्पष्ट आहे.

पं. श्रीपाद दामोदर सातवळेकरांनी संपादित केलेल्या महाभारताच्या शांतिपर्वातील एका श्लोकात भीष्म सांगतात –

‘उदासीनारिमात्राणां सर्वमेव चिकीर्षितम्।

पुरे जनपदे चैव ज्ञातव्यं चारचक्षुषा ।।’ (शांतिपर्व, ८६.२१)

याचा अर्थ असा, की ‘नगरांमधील, छोट्या गावांतील, खेड्यांतील आपले शत्रू, मित्र, तसेच तटस्थ लोक केव्हा काय करू पाहत आहेत. याकडे राजाने गुप्तचररूपी नेत्रांनी नेहमी लक्ष ठेवावे. आणखी एका श्लोकात तर थेटच प्रजेवरील पाळतीचा उपदेश आहे.

‘बाह्यामाभ्यन्तरं चैव पौरजानपदं तथा।

चारैः सुविदितं कृत्वा ततः कर्म प्रयोजयेत् ।।’ (शांतिपर्व, ८६.१९).

येथे भीष्म सांगत आहेत, की राजाने ‘नगरात तसेच छोट्या छोट्या गावांतील जाहीर आणि अंतर्गत बातम्या गुप्तचरांद्वारे व्यवस्थित माहिती करून घ्याव्यात आणि त्यानुसार कार्य करावे.’ याचा अर्थ स्पष्ट आहे. हा पाळतीचा इशारा आहे.

कौटिल्याचे ‘अर्थशास्त्र’ही हेच सांगते. ते इसवी सनाच्या चौथ्या शतकातले, सतराशे वर्षांपूर्वीचे. ते तर आजच्या पाळतशहांचे प्राथमिक पाठ्यपुस्तक ठरावे. त्यात, राजाने हेरांच्या साह्याने ‘कंटकशोधन’ करावे हा जसा त्यांचा सल्ला आहे, तशीच ‘राजाने नागरिक आणि जानपद यांच्यावरही हेरांची नेमणूक करावी’, म्हणजे नागरिकांवर पाळत ठेवावी अशीही सूचना आहे. (Social disinterest in privacy rights)

पाळतखोरीचे तंत्रमंत्र

  कौटिल्यांनी त्या काळात पाळतीचा, हेरगिरीचा विचार किती बारकाईने केलेला आहे, हे पाहिले तर आज थक्क व्हायला होते. पाळतशाहीमध्ये ‘विदा’ म्हणजेच ‘डेटा’ला अनन्यसाधारण महत्त्व. शस्त्र आहे ते पाळतशाहीचे. पण हे महत्त्व आजचेच नाही. आज ‘डेटा इज न्यू ऑइल’ वगैरे म्हटले जाते, ते तो डेटा उपयोगात आणायची नवनवी तंत्रे निर्माण झाली आहेत यास्तव. अशी तंत्रे पूर्वी नव्हती. तरीही नागरिकांचा ‘डेटा’ जमा केला जात होता. अर्थशास्त्राच्या ५६व्या अध्यायातील खानेसुमारीचा उल्लेख या दृष्टीने पाहण्यासारखा आहे. कौटिल्य सांगतात, राजाने स्त्रियांची, पुरूषांची खानेसुमारी करावी. आणि त्यात कशाकशाची नोंद घ्यावी, तर लहानापासून थोरापर्यंत प्रत्येक माणसाचा वर्तनक्रम, धंदा, उत्पन्न आणि खर्च. लोकांची घरे, जमीनजुमला. झालेच तर त्यांच्याकडील जनावरांची संख्या अशा विविध गोष्टींची. या खानेसुमारीला केवळ अर्थकारणाचा संदर्भ नाही. ती पाळतीच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. याच अध्यायात कौटिल्य सांगतात, राजाने लोकांच्या हालचालींवर नजर ठेवावी. एखादी व्यक्ती कुठे परगावी गेल्यास वा परगावातील व्यक्ती गावात आल्यास ती का आली आहे, याचा तपास करावा. आजच्या परिभाषेत सांगायचे, तर हे सर्व पाळतखोरीसाठी उपयुक्त असे ‘ऑपरेशनल डेटा पॉइंट’ आहेत. हा असा पाळतीचा विचार केवळ भारतीय परंपरेतच आहे, असे मानायचे कारण नाही. सर्वच धर्मग्रंथांत आणि परंपरांत तो सापडतो. तेथे ईश्वर ‘सर्वसाक्षी’ सर्व काही पाहणारा, जाणणारा असतो. राजा हा ईश्वराचा अंश. दैवी अधिकाराने त्यास राजगादी मिळालेली. तेव्हा परंपरेचे म्हणणे हे, की त्यानेही सर्वसाक्षी असावे. हे सर्वसाक्षी असणे ईश्वराचे असो वा राजाचे वा ख्रिश्चन विश्वात चर्चचे, ते अंतिमतः समाजहितासाठीच असते. राजाने ‘व्यवस्था’ टिकवणे आवश्यक. ती का टिकवायची, तर लोकांच्या भल्यासाठी. राजाला राज्याची आणि प्रजेची सुरक्षा पाहायची आहे. ती पाहायची, तर त्यासाठी त्याला प्रजेवरच पाळत ठेवणे आवश्यक आहे. हेरांना राजाचे नेत्र म्हटलेले आहे. त्या डोळ्यांची दोन पाखरे लोकांभोवती सतत फिरती ठेवायलाच हवीत. दैवी कार्य आहे ते, त्याचे.

हा आपला पाळतीचा इतिहास आहे. ही आपली वैचारिक परंपरा आहे. भारतीय समाजात खासगीपणाला मूल्य नाही, याचे कारण यात दडलेले आहे. एकदा हेरगिरी हे राज्ययंत्रणेने करावयाचे दैवी कार्य ठरले, ती केली जाते ती लोकहितासाठीच हे नक्की झाले, की मग त्यात नागरिकांच्या हक्कांचा, खासगीपणाचा विचार येणार कुठून? प्राचीन भारतात त्या विचारास स्थान नव्हते. आपला प्राचीन भारतीय समाज हा नेहमीच व्यक्तीपेक्षा समष्टीस महत्त्व देणारा राहिलेला आहे. तो नेहमीच कर्तव्यप्रधान राहिलेला आहे. त्यात हक्कांपेक्षा कर्तव्यास अधिक महत्त्व आहे. आपले धार्मिक ग्रंथ सातत्याने ठासून सांगत असतात, ते हेच की समाजाची व्यवस्था टिकण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या कर्तव्याचे योग्य निर्वाहन केले पाहिजे. पण मग सर्व लोक तसे करतात की नाही हे कसे पाहायचे? त्यासाठी हेरगिरी आवश्यक. पाळत आवश्यक. राज्ययंत्रणेकडे प्रत्येक नागरिकाचा अधिकाधिक ‘डेटा’ असणे आवश्यक. यात खासगीपणाचा मुद्दाच येत नाही. हक्कांना महत्त्व नाही म्हटल्यावर खासगीपणाच्या हक्काचा प्रश्नच येत नाही. कौटिल्य याचेच संकेत देत आहेत. यम-यमी संवादसूक्तातून हेच दिसत आहे. पाळतखोरीबाबत, खासगीपणाच्या अधिकारां-बाबतची सामाजिक बेफिकिरी ही आपल्या या अशा वैचारिक परंपरेची निर्मिती आहे. ती आजच्या पाश्चात्य समाजात नाही. त्यामुळेच तेथे ‘स्नोडेन’ जन्मू शकतात. तो सारा इतिहास पाहण्यासारखा आहे.

…………………………..

(रवि आमले हे ज्येष्ठ पत्रकार संपादक, प्रथितयश लेखक आणि भाष्यकार आहेत. त्यांची प्रोपगंडा, रॉः भारतीय गुप्तचर संस्थेची गूढ गाथा, मॅनहंट (अनुवादित), परकीय हात, वरुण ते बहिर्जी आदी पुस्तके वाचकप्रिय ठरली आहेत.)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00