कोल्हापूर; प्रतिनिधी : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि राजर्षी शाहू खासबाग मैदान नूतनीकरणासाठी २५ कोटी १० लाख रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला. दरम्यान, नाट्यगृहाची उभारणी हेरिटेज नियमानुसारच होणार असल्याचे महापालिकेने नियुक्त केलेल्या स्ट्रक्टवेल कंपनीने स्पष्ट केले आहे. राज्य सरकार आणि महापालिकेने तांत्रिक बाबी पूर्ण केल्यास सव्वा ते दीड वर्षात बांधकाम पूर्ण होऊ शकेल, असा विश्वासही स्ट्रक्टवेल कंपनीचे चेअरमन चेतन रायकर यांनी व्यक्त केला. (Sangeetsurya Keshavrao Bhosale Natyagruha)
नाट्यगृहाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम स्ट्रक्टवेल डिझायनर्स आणि कन्सल्टंट या सल्लागार कंपनीला दिले होते. दरम्यान, नाट्यगृहाच्या जतन व दुरुस्ती प्रस्तावाचे सादरीकरण जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात करण्यात आले. यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार जयश्री जाधव, महापालिका आयुक्त मंजूलक्ष्मी, यांच्यासह नाट्यकर्मी, आर्किटेक्ट, बांधकाम व्यवसायिक, इतिहास संशोधक, सामाजिक आणि पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेल्या या नाट्यगृहाचा समावेश ग्रेड वन हेरिटेज गटात असल्याने नाट्यगृहाची उभारणी पूर्वीप्रमाणेच होणार आहे, असे या कंपनीचे चेअरमन चेतन रायकर यांनी स्पष्ट केले. या कंपनीने सीएसटी रेल्वे स्टेशन, मुंबई महापालिका इमारत, गेटवे ऑफ इंडिया, राज्यपालांचे निवासस्थान, पुण्यातील नाना वाडा, पुणे विद्यापीठ, मोरवी राजवाडा, इंदोर राजवाडा, हाजी अली दर्गा, ताज हॉटेल, दिल्ली विज्ञान भवन या इमारतीचे या वास्तूंची फेरउभारणी केली आहे. (Sangeetsurya Keshavrao Bhosale Natyagruha)
रायकर म्हणाले, नाट्यगृह आणि मैदान या कला आणि क्रीडा संबधित एकत्रित वास्तू जगामध्ये कुठेही पाहायला मिळत नाही. या वास्तूची पुनर्बांधणी करता येत नाही. पण आहे त्या स्थितीतील वास्तू वापरून नाट्यगृहाची उभारणी करता येईल. लागलेल्या आगीमुळे अन्य नुकसान झाले असले तरी वास्तूच्या सहा ते आठ मीटर उंचीच्या भिंती मजबूत आहेत. स्टेजही दणकट आहे. नाट्यगृहाचा किमान ५० टक्के भाग अजूनही चांगला आहे आहे. पूर्वी बांधकामात ज्या ठिकाणी लाकूड, स्टील, कौले वापरली आहे त्याच ठिकाणी त्याच वस्तूंचा वापर करण्यात येईल. नाट्यगृहाची आसनक्षमताही ८०० पर्यंत वाढवता येणे शक्य असल्याचे रायकर यांनी सांगितले.
खासबाग मैदानातून पावसाचे पाणी बाहेर पडणाऱ्या जागा बुजवण्यात आल्या आहेत. त्यामुळे भिंतींना धोका उत्पन्न झाला आहे ते काम ही पूर्ण करण्यात येईल. नाट्यगृहाभोवती असलेल्या जागेवर अंडरग्राउंड तीन मजली पार्किंग व्यवस्था करण्यात येईल . त्या ठिकाणी किमान २६० दुचाकी आणि ६५ चार चाकी वाहने पार्क करता येतील, अशी व्यवस्था करता येणे शक्य आहे. रायकर यांनी केलेल्या प्रेझेंटेशनवर अर्किटेक्ट, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, रंगकर्मी, सामाजिक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. (Sangeetsurya Keshavrao Bhosale Natyagruha)
यावेळी माजी महापौर महादेवराव आडगुळे, अर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, आनंद माने, वसंतराव मुळीक, संदीप घाटगे, सदानंद सबनीस, सुनील घोरपडे, रवी माने, दिलीप देसाई, प्रसाद जमदग्नी, मिलिंद अष्टेकर, आनंद काळे, इंद्रजीत सावंत, प्रशांत हडकर, गिरीश फोंडे, धनंजय पाटील, किरणसिंह चव्हाण यांनी चर्चेत भाग घेतला. दरम्यान, सरकारने निधी जाहीर केल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सरकारचे आभार मानले.
हेही वाचा :
- Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजे यांच्या ‘स्वराज्य’ला मिळाले चिन्ह
- Govinda Bullet Injury : रिव्हॉलव्हरमधून चुकून गोळी उडाली; अभिनेता गोविंदा जखमी
- राहुल गांधी ४, ५ ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर