Home » Blog » RIJIJU’S ALLEGATIONS: रिजिजूंचा किरणोत्सर्ग

RIJIJU’S ALLEGATIONS: रिजिजूंचा किरणोत्सर्ग

by प्रतिनिधी
0 comments
RIJIJU’S ALLEGATIONS

भांडवलशहांच्या लुटीबद्दल बोलले की तो सोरोसचा हस्तक. सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप हे सारे डीप स्टेटचे कारस्थान. आणि हे सारे मिळून देशद्रोही. असे हे सारे कथन, अशी सध्या देशात परिस्थिती आहे. त्यास वेळोवेळी बादरायण छापाचे मसाले लावून चमचमीत केले जाते. उजवी इकोसिस्टिम ती कथने चघळत एकेका व्यक्तीवर देशद्रोहाचे ठप्पे लावत सुटतात. रिजिजू यांनीही तेच केलेले आहे. (RIJIJU’S ALLEGATIONS)

– रवि आमले

लष्करापासून गुप्तचरसंस्थांपर्यंत आणि पोलिसांपासून सीबीआय, ईडी पर्यंतच्या तमाम यंत्रणा ज्यांच्या ताब्यात आहेत अशा सरकारमधील मंत्री जेव्हा एखादी व्यक्ती देशविरोधी कारवाया करते असे सांगतात आणि तरीही ती व्यक्ती बाहेर मोकळी फिरत असेल, तर त्याचे दोनच अर्थ होतात. एक म्हणजे ते सरकार नेभळे आहे किंवा मग ते मंत्री राजकीय कुबुद्धीने तसे आरोप करीत आहेत. सीबीआय, ईडी, आयटी आदी सर्व यंत्रणांचा मोदी सरकारकडून सत्ताकारणासाठी होत असलेला विनाचाड वापर पाहता, त्यास अन्य काहीही म्हणता येईल. पण कोणी नेभळट म्हणू शकणार नाही. तेव्हा मग त्या सरकारमधील ते मंत्री म्हणजे किरण रिजिजू यांचे हेतू आणि बुद्धी याविषयी शंका घेणे भाग पडते. याचे कारण रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेले आरोप. (RIJIJU’S ALLEGATIONS)

‘एशियन न्यूज इंटरनॅशनल’ (एएनआय) या मोदीसमर्थक वृत्तसंस्थेस २३ ऑगस्ट रोजी दिलेल्या खास मुलाखतीत केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आरोपांचा सरबत्ती केली. त्या किरणोत्सर्गाचे सार असे, की काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी हे देशविरोधी आहेत. ते भारतविरोधी शक्तींशी संगनमत करून सरकार आणि संस्था यांवर हल्ला करतात. आता या आरोपांत नवे असे काही नाही. रिजिजूंप्रमाणे भाजपमध्ये अनेक थोर थोर नेते आहेत. ते सातत्याने विरोधी पक्षांवर असे देशविरोधी कारवायांचे आरोप करीत असतात. ‘जो जो भेटला विरोधक तो तो मानावा देशविघातक’ असे काहीसे त्यांचे मत असावे. काही सत्ताधीशांना आपण म्हणजेच देश असा भ्रम होतो. त्यास कोण काय करणार? रिजिजू यांनी त्या मुलाखतीत राहुल गांधी यांचे, सोरोस, डाव्या संस्था आणि परदेशातील खलिस्तानवादी यांच्याशी संगनमत असून, ते ‘देशविरोधी काम करण्यासाठी षड्‌यंत्र रचत आहेत’, असा आरोप केला. या देशात उजवे सत्तेवर आहेत. त्यांच्याविरोधात जे आहेत ते अर्थातच डावे(RIJIJU’S ALLEGATIONS)

या देशातील लोकशाहीवादी, उदारमतवादी, समता आणि बंधुतावादी वगैरे सारेच डावे आहेत. अद्याप देशाची राज्यघटना बदललेली नाही. तेव्हा या सर्व बाबी घटनामान्यही आहेत. त्यांच्या संस्थांशी राहुल गांधी यांचे ‘संगनमत’ असणे याचा अर्थ राहुल हे लोकशाहीवादी, उदारमतवादी, तसेच अतिरेकी धर्मवादविरोधी ठरतात. त्याचा रिजिजू व तत्समांनी रागराग करणे हे समजण्यासारखे आहे. राहुल हे खलिस्तानवाद्यांशी संगनमत राखून आहेत हा आरोप मात्र तद्दन खोडसाळ. इंदिरा गांधी या राहुल यांच्या आजी. त्यांची हत्या ज्या खलिस्तानवाद्यांनी केली, त्यांच्याशी राहुल गांधी हातमिळवणी करतात असे म्हणण्यासाठी मनात गांधी घराण्याविषयी पराकोटीचा द्वेषच हवा. हास्यास्पद, व्हॉट्सॲप विद्यापीठ प्रेरित फेकन्यूज म्हणून या सर्व आरोपांची वासलात लावता येणे शक्य आहे. पण या आरोपांमागे उभा असलेला षड्‌यंत्र सिद्धांत दुर्लक्षिता येणार नाही. सारेच षड्‌यंत्र सिद्धांत हे कर्करोगग्रस्त पेशीसारखे असतात. ते हळुहळू समाजाचा मेंदू पोखरत जातात. ते दुर्लक्षिणे याचा अर्थ त्यांना बळ देणे. तेव्हा त्यांची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे ठरते. रिजिजू यांनी या मुलाखतीतून जो षड्‌यंत्र सिद्धांत रेटला आहे, तो आहे जॉर्ज सोरोस यांच्याविषयीचा. (RIJIJU’S ALLEGATIONS)

हे सोरोस कोण हे उजव्यांना, त्यांच्यातील जल्पकांना आणि टूलकिट टोळ्यांना वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांची ही बौद्धिके आधीच झालेली असतात. इतरेजनांसाठी त्यांची थोडक्यात माहिती अशी, की ते अमेरिकेतील एक अब्जाधीश गुंतवणूकदार आहेत. ते जन्माने हंगेरियन ज्यू. विचाराने नास्तिक, उदारमतवादी आणि लोकशाहीवादी. लहानपणी हिटलरचे अत्याचार त्यांनी अनुभवले होते. धर्मवेड, फॅसिझमचा जुळा भाऊ असलेला अतिराष्ट्रवाद यातून एखादे राष्ट्रच्या राष्ट्र कसे विखाराच्या गर्तेत ढकलले जाते हे त्यांनी पाहिले होते. त्यामुळे आपल्या कमाईतील काही भाग ते फॅसिस्ट, अतिराष्ट्रवादी यांच्या विरोधात लढणाऱ्या, लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी झटणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना साह्य म्हणून देत असतात. ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ ही त्यांची संस्था याबाबत काम करते. या कार्यासाठीच जो बायडेन यांनी त्यांचा ‘प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम’ देऊन गौरव केला होता. अशी व्यक्तीच्या विरोधात जगभरातील एकाधिकारशहा, हुकूमशहा असणे हे साहजिकच. सोरोस यांना शत्रू मानणारे सत्ताधीश रंगपटलाच्या दोन्ही टोकांवर आहेत हे विशेष. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची ‘मागा’ नामक बिनडोक फौज यांच्यासाठी सोरोस हे सैतान असतातच, पण व्लादिमीर पुतीन, तुर्किएचे तय्यिप एर्दोगन यांनाही ते नकोसे असतात. सोरोस हे नव भांडवलशाहीला पायातील काटा वाटतात. त्याच बरोबर युरोपातील कट्टर कम्युनिस्टांना ते भांडवलदारांचे हस्तक वाटतात. सोरोस हंगेरीतील. त्या देशाचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बान हे सोरोस यांना शत्रू मानतात. इतके की त्यांनी तेथे जो स्थलांतरविरोधी कायदा केला, त्याला ‘स्टॉप सोरोस’ असे नाव दिले. पाश्चात्य जगतास एकंदरच षड्‌यंत्र सिद्धांतांचे मोठे आकर्षण. त्यातही ‘न्यू वर्ल्ड ऑर्डर’ हा त्यांची लाडकी कटकाल्पनिका. कोणी तरी गट वा व्यक्ती सर्व जगाचे नियंत्रण करीत असते, ही या कटकाल्पनिकेची आधारशिला. यात मग ‘इलुमिनाती’ असतात, तर कधी ‘फ्री मेसन्स’. कधी रॉथशिल्ड नामक उद्योजक असतात, तर कधी जे. पी. मॉर्गन. या यादीतील सध्याचे नाव आहे सोरोस.

साधारणतः २०१६ मध्ये सरकारने सोरोस यांच्या ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ला ‘वॉच लिस्ट’मध्ये टाकले. यानंतर एकाच वर्षात पाकिस्तानने मोदी सरकारचा कित्ता गिरवला. आरोप तोच. सोरोस हे देशविघातक कारवाया करीत असल्याचा. भारत आणि पाकिस्तान यांचे याबाबतीतील एकमत हे उठून दिसणारे. मात्र सोरोस यांचे नाव आपल्याकडे पहिल्यांदा जनचर्चेत आले ते २०२३मध्ये. तत्पूर्वी २०२० मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मंचावरून ट्रम्प, पुतीन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याबरोबरच मोदींवर टीका करण्याचे महत्पाप त्यांनी केले होते. लोकशाही मार्गाने निवडून आलेले मोदी हे भारतास हिंदुत्त्ववादी राष्ट्र बनवत आहेत. हा खुल्या समाजासाठी मोठा भयंकर धक्का आहे, अशा आशयाचे विधान केले होते. पण त्यावरून फार काही गदारोळ झाला नाही. तो झाला २०२३ मध्ये. यावेळी सोरोस यांनी मोदींबरोबर अदानींचे नाव घेतले. एका श्वासात हे जोडनाव घेतले तर श्वास अडकतो हा भारतातील अनेकांचा अनुभव. सोरोस यांनी त्याची पर्वा न करता, अदानी प्रकरण मोदींना कमकुवत करील असे भाकीत केले. परिणामी मोदी खवळले आणि त्यांच्यावतीने पहिली तोफ डागली सु.श्री. स्मृती इराणी यांनी. त्यानंतर लगेचच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे ते प्रसिद्ध लेझर डोळे वटारले. सोरोस ‘हा एक वृद्ध, श्रीमंत, पूर्वग्रहदूषित आणि धोकादायक गृहस्थ’ आहे असे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या साह्यास उजवी टूलकिट गँग आणि अर्थातच गोदी मीडिया होताच. पण सोरोस यांच्या टीकेतून या उजव्या इकोचेंबरला एक मोठा लाभही झाला. (RIJIJU’S ALLEGATIONS)

 प्रोपगंडामध्ये भयभावना ही फार महत्त्वाची. लोकांना कायम भयभीत ठेवायचे, तर त्यांच्यासमोर सतत एक शत्रू ठेवायला हवा. पाकिस्तान, मुस्लिम लोकसंख्या, कम्युनिस्ट, खलिस्तानी हे वापरून गुळगुळीत झालेले शत्रू. सोरोस यांच्या रूपाने त्यांना नवा शत्रू लाभला. हा शत्रू देश अस्थिर करू पाहतोय. त्यास येथील काँग्रेसची साथ आहे, असा एक नवा सिद्धांत तयार करण्यात आला. संस्कृतात एक प्रसिद्ध सुभाषित आहे. ‘अस्माकं बदरीचक्रं युष्माकं बदरीतरूः’ – तुझ्या दारापुढे बोरीचे झाड. माझ्या रथाला बोरीच्या लाकडाचे चाक. त्यामुळे आपण संबंधित आहोत. यास बादरायण संबंध म्हणतात. असाच संबंध काँग्रेस आणि सोरोस यांच्यात, येथील उजव्यांचे विरोधक आणि सोरोस यांच्यात जोडण्यात येत आहे. आज तो येथील उजव्यांच्या नॅरेटिव्हचा – कथनाचा – भाग बनलेला आहे. पर्यावरणाचा विषय काढला की तो विकासविरोधी. शेतकऱ्यांचा विषय काढला की तो खलिस्तानवादी. भांडवलशहांच्या लुटीबद्दल बोलले की तो सोरोसचा हस्तक. सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप हे सारे डीप स्टेटचे कारस्थान. आणि हे सारे मिळून देशद्रोही. असे हे सारे कथन. त्यास वेळोवेळी बादरायण छापाचे मसाले लावून चमचमीत केले जाते. उजवी इकोसिस्टिम ती कथने चघळत एकेका व्यक्तीवर देशद्रोहाचे ठप्पे लावत सुटतात. रिजिजू यांनीही तेच केलेले आहे. ते मसाले लावणारे की चघळणारे हे समजणे कठीण. मात्र त्यांच्यासारखे लोक जे षड्‌यंत्र सिद्धांत पसरवत आहेत, त्यांचे उद्दिष्ट अंतिमतः लोकांस विचारांध करणे हेच आहे, हे नीट समजून घ्यायला हवे. कारण अखेरीस विचारांधता हीच देशास बुडवणारी महाशक्ती असते. त्या शक्तीवर देश चालवू पाहणाऱ्यांपासून सावध राहणे गरजेचे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00