मेलबर्न : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी बरेच विक्रम नोंदवले गेले. यातील काही ठळक विक्रमांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप. (Bumrah)
१९ वर्षे ८५ दिवस – ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सॅम कॉन्स्टसचे गुरुवारचे वय. तो ऑस्ट्रेलियाचा सर्वांत कमी वयाचा पदार्पणात अर्धशतक झळकावणारा सलामीवीर ठरला, तर इयान क्रेग यांच्यानंतरचा ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वांत तरुण पदार्पणातील अर्धशतकवीर ठरला.
५२ – कॉन्स्टसने ५२ चेंडूंत अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियातर्फे पदार्पण करणाऱ्या खेळाडूचे हे तिसरे सर्वांत वेगवान अर्धशतक ठरले. यापूर्वी, ॲडम गिलख्रिस्टने ४६ चेंडूंमध्ये, तर ॲश्टन ॲगरने ५० चेंडूंमध्ये पदार्पणात अर्धशतक झळकावले होते.
१८ – बुमराहच्या सहाव्या षटकात १८ धावा फटकावण्यात आल्या. बुमराहच्या कसोटी कारकिर्दीतील हे सर्वांत महागडे षटक ठरले. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२० मध्ये, तर इंग्लंडविरुद्ध २०२४ मध्ये त्याने एका षटकात १६ धावा दिल्या होत्या.
१३.१ षटके – डावातील १३.१ षटके झाली असतानाच कॉन्स्टसने अर्धशतक पूर्ण केले. पदार्पणात सर्वांत कमी षटकांत केलेले हे अर्धशतक ठरले. त्याने भारताच्या पृथ्वी शॉचा विक्रम मोडला. पृथ्वीने २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात १७.४ षटके झाली असता अर्धशतक पूर्ण केले होते.
४५६२ – कसोटीमध्ये बुमराहच्या गोलंदाजीवर तब्बल ४५६२ चेंडूंनंतर षटकार खेचण्यात आला. कॉन्स्टसअगोदर २०२१ साली सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरॉन ग्रीनने बुमराहला षटकार लगावला होता. बुमराहने कसोटीत आजवर केवळ ९ षटकार दिले असून त्यांपैकी जोस बटलर आणि कॉन्स्टस यांनी त्याला प्रत्येकी २ षटकार लगावले आहेत.
हेही वाचा :