कोल्हापूर : प्रतिनिधी : ‘रंगबहार’च्या वतीने कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर आणि विश्वरंग विश्वनाथ नागेशकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘मैफल रंगसुरांची’ हा कार्यक्रम येथील टाऊन हॉल बागेत संपन्न झाला. यानिमित्ताने रंगसुरांची मैफल कलारसिकांना अनुभवता आली. (Rangbahar)
याप्रसंगी श्यामकांत जाधव रंगबहार जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ कला संघटक श्रीकांत डिग्रजकर यांना ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शरद भुताडिया यांच्या हस्ते गौरवण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. याप्रसंगी विजयमाला पेंटर, आदित्य बेडेकर, व्ही. बी. पाटील, इंद्रजीत नागेशकर, धनंजय जाधव, संजीव संकपाळ आदी उपस्थित होते. (Rangbahar)
तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाशिक्षक सागर बगाडे, विवेक चंदालिया, सचिन सूर्यवंशी, कोल्हापूरचे युवा कलाकार यश दरेकर यांचाही गौरव करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना डॉ. शरद भुताडीया यांनी कलाक्षेत्रामध्ये काम करत असताना चित्रकारांच्या मैफिलीत येण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. सर्व कलाकारांनी एकत्र येऊन कला चळवळ पुढे चालवली पाहिजे. यासाठी योग्य तो समन्वय आणि प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. (Rangbahar)
सत्काराला उत्तर देताना श्रीकांत डिग्रजकर यांनी आजपर्यंत ज्या ज्या लोकांचे सहकार्य मिळाले त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
यावर्षीच्या मैफलीमध्ये केवलकुमार यांचे शिष्य रोहित फाटक यांनी शुद्ध सारंग गाऊन मैफिलीस प्रारंभ केला. त्यांनी ‘सकल बन लाग रहे,’ ही द्रुत विलंबित तीन तालातील बंदिश सादर केली. यानंतर त्यांनी तोडी रागातील तराना आणि दृतबंदीश तीन ताल सादर केला. पाठोपाठ ‘मृग नयनी यार नवल रसिया,’ ही होरी सादर केली. यानंतर संत पुरंदरदास यांची कन्नडवचन हे भजन त्यांनी सादर केले. झपताल आणि तीन तालातील बंदिश गावून भैरवीने या मैफलीची त्यांनी सांगता केली. त्यांना प्रथमेश शिंदे आणि विनीत देशपांडे यांनी संगत केली. शशी शेखर यांनी तनपुरा, भारत पाटणकर यांनी तबल्याची साथ केली.(Rangbahar)
चित्रमैफिलीमध्ये चित्रकार प्रा. बाळासाहेब पाटील यांनी अमूर्त शैलीतील कलाकृती साकार केली तर शिरीष देशपांडे बॉलपेनच्या साह्याने निसर्ग चित्र रेखाटले, स्वाती साबळे अमूर्त शैलीतील कलाकृती साकारली. प्रा.अमित सुर्वे, प्रा. शीतल बावकर, प्रा. योगेश मोरे, विवेक प्रभूकेळूस्कर, इनायत शिडवणकर, सुरेंद्र कुडपणे, प्रथमेश जोग, अशोक साळुंखे, कशिश अडसूळ,संदेश कांबळी, सुबोध कांबळे, यश कातवरे, कुलदीप जठार, शिल्पकार विशाल मसणे, युवराज चिखलकर आणि दीपक साळोखे यांनी व्यक्ती शिल्प साकारली. (Rangbahar)
मैफिलीमध्ये बालकलाकारांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सूत्रसंचालन नागेश हंकारे यांनी तर आभार व्ही. बी. पाटील यांनी मानले.