जयसिंगपूर; शुभम गायकवाड : शिरोळ विधानसभेसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा चाळीस हजार ८१६ इतक्या मताधिक्याने विजय झाला. गत निवडणुकीत त्यांना ९०,००० मध्ये मिळाली होती. त्यात २७ हजारांचे मताधिक्य होते. गेल्या पाच वर्षात शिरोळ तालुक्यात १९०० कोटी रुपयांची कामे झाली आहेत. शिवाय कोणावरही टीकाटिप्पणी न करता आणि विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर न देता मी विकासाचेच राजकारण करणार हा मुद्दा तालुक्यातील जनतेला पटला असल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे. यावेळी मिळालेल्या मताधिक्याने इथून पुढच्या वाटचालीत यड्रावकरांना आणखी बळ मिळाले आहे.
२०१९ मध्ये यड्रावकर प्रथमच निवडून आले होते. त्यांचे वडील दिवंगत शामराव पाटील यड्रावकर यांचा दोन वेळा पराभव झाला होता. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा दोन वेळा पराभव झाला होता. कोणतेही पद नसले तरीही सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांचे शिरोळ तालुक्यात मोठे जाळे होते. २०१९ मध्ये शिरोळची जागा महाविकास आघाडीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली होती. परंतु संवैधानिक पदाशिवाय सहकारी संस्थांना आर्थिक बळकट येणार नाही म्हणून यड्रावकरांनी ‘माझं काय चुकलं,’ अशी भावनिक साद घालत अपक्ष उमेदवारी दाखल केली. आणि साम-दाम-दंड-भेद नीती वापरत विजय मिळवला. २७०००चे मताधिक्य त्यांना मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांना आरोग्य राज्यमंत्रीपद मिळाले होते. सुरुवातीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात कोरोना कालावधीत केलेली कामगिरी विसरता येण्यासारखी नव्हती. जी आरोग्य साधने राज्यात उपलब्ध होत होती ती शिरोळ तालुक्यातही तत्काळ पोहोचत होती. त्याचा फायदा तालुक्यातील बऱ्याच रुग्णांना झाला होता.
त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना मंत्रिपद मिळाले नसले तरी हजारो कोटीचा निधी त्यांना मिळाला. त्या माध्यमातून प्रत्येक गावात कोट्यावधींचा विकास झाला होता. संजय गांधी निराधार योजना, वृद्ध पेन्शन, गावोगावातील रस्ते, गटार, सामाजिक सभागृह, बस स्थानके, पादचारी पूल, कामगारांसाठी योजना, क्षारपडमुक्तीसाठी अनुदान, मनोरुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, औद्योगिक वसाहत अशा कामांमुळे त्यांचा पाया विस्तारत गेला. लाडकी बहीण योजनेने त्यावर कळस चढवल्याने मताधिक्य मोठ्या प्रमाणात वाढले.
संजय यड्रावकरांच्या जोडण्या
राजेंद्र पाटील यांचे छोटे बंधू संजय पाटील यड्रावकर राजकारणात व्यवस्थापनासाठी ओळखले जातात. ते प्रचाराच्या स्टेजवर दिसत नसले तरी जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ शहरातील आपल्या हक्काच्या समर्थकांच्या ते नेहमीच संपर्कात होते. विरोधी गटातील आपल्या बाजूने कोण येऊ शकतो, विरोधी गटाची कोणत्या गावात किती ताकद आहे याचा अंदाज घेत होते. कोणत्या गावातील काम अपुरे राहिले आहे. कोणती कामे पूर्ण केली आहेत या सर्वांचा लेखाजोखा त्यांच्याकडे होता. त्यामुळे विजय सोपा झाला.
महायुतीसह इतर पक्षांचा पाठिंबा
शिरोळ तालुक्यात यड्रावकर गटाशिवाय भारतीय जनता पक्ष, अजित पवारांची राष्ट्रवादी, खासदार धैर्यशील माने यांचा गट, शिवसेना शिंदे गट यांची कमीअधिक प्रमाणात मते आहेत. शिवाय शेतमजूर संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक गट यांसारख्या इतर पक्षांनी त्यांना उघड पाठिंबा दिला. सर्वांनी एक दिलाने काम केले.