इस्लामपूर; प्रतिनिधी : भाजपा महायुतीने राज्याची मोठी अधोगती केली आहे. मुलांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. महागाईने कळस गाठला आहे, भ्रष्टाचार सर्वत्र बोकाळला आहे. महिला सुरक्षित नाहीत. कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळली आहे. हे राज्य वाचवण्यासाठी भाजपा महायुतीस सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केले. गेल्या १० वर्षापासून राज्यात व देशात भाजपाचे सरकार आहे. मग पेठ-सांगली रस्त्याच्या विलंबास दुसऱ्याला दोष कसा देता? असा सवालही त्यांनी केला. आ. पाटील यांच्या प्रचाराचा प्रारंभ तुंग येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
मी एकदा विना टोल पेठ-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण-तीन पदरीकरण केले होते. त्यानंतर भाजपा सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी हा रस्ता केंद्राकडे वर्ग केला. त्यामुळे आपले २०१९ ला काही वर्षे सरकार आल्यानंतर हा रस्ता करता आला नाही. मी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटून या रस्त्याची मागणी केली आणि पाठपुरावा केला, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. हा मतदारसंघ तुमच्या हवाली करून आजपासून राज्याच्या प्रचार दौऱ्यावर जात आहे. प्रत्येकाने आपले गांव, बूथ सांभाळा, विजय आपलाच आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी श्री हनुमानाचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, आष्ट्याचे नेते वैभव शिंदे, युवा नेते प्रतिक पाटील, आनंदराव नलवडे, उद्योजक भालचंद्र पाटील, माजी सभापती वैभव पाटील, माजी महापौर मैमुद्दीन बागवान, सरपंच विमल सूर्यवंशी, भास्करराव पाटील, सचिन पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, अॅड. चिमण डांगे, शहाजी पाटील, नेताजीराव पाटील, विनायक पाटील, बी. के. पाटील, डॉ. प्रताप पाटील, संजय पाटील, सुस्मिता जाधव, सुनिता देशमाने, शिवसेनेचे शकील सय्यद, आरपीआयचे प्रताप मधाळे, दलित महासंघाचे शंकर महापुरे प्रामुख्याने उपस्थित होते. दिलीप पाटील म्हणाले, एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष उमेदवारी मिळण्यासाठी दुसऱ्या पक्षात गेला आहे. जॅकेट घालून आमदार होता येत नाही. वैभव शिंदे, बी. जी. पाटील, अॅड. चिमण डांगे, भालचंद्र पाटील, सुस्मिता जाधव यांची भाषणे झाली.